Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ओवाळू आरत्या..
प्रदीप नणंदकर
लातूर, ६ एप्रिल

 

एरवी आपापल्या गटाच्या कोषात मश्गूल राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या, काँग्रेसच्या नेत्यांना सर्व गट-तट कामाला लावण्यासाठी ‘आरत्या ओवाळण्या’ची मोहीम हाती घ्यावी लागत आहे.
पक्षाची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी भा. ज. प.ने मध्यंतरी ‘घरघर चलो मोहीम’ राबविली. त्या मोहिमेत किती कार्यकर्ते किती घरापर्यंत पोहोचले, अशी लेखी माहिती प्रदेश व राष्ट्रीय कार्यालयाला पाठवून मोहिमेची सांगता झाली. निवडणुकीच्या काळात तातडीची परीक्षा असते, अभ्यासाला वेळ मिळाला नाही यासारखी कारणे चालत नसतात. त्यामुळे जिल्ह्य़ातील आमदार, विद्यमान व भावी खासदार, ज्येष्ठांचा, कनिष्ठांचा, निष्ठावंतांचा, नव्यांचा असे अनेक गट पक्षात कार्यरत आहेत. या सर्व गटप्रमुखांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या आरत्या ओवाळून कामाला लावणे सुरू आहे.
भा. ज. प. व काँग्रेसमध्ये फारसा फरक नाही. काँग्रेसमध्ये क्रीडामंत्री दिलीपरावांचा ‘हंटर’ असला, तरी निवडणुकीच्या काळात हंटरला ‘गुळ-तूप’ लावले जाते. पक्षात चाकूरकर, देशमुख, निलंगेकर हे प्रमुख गट आहेत. याशिवाय विविध तालुक्यांमध्ये छोटे-मोठे गट वेगळेच आहेत. उमेदवारी निश्चितीसाठी चाकूरकर-देशमुख गटाने भरपूर ताणले व शेवटी ‘तुला ना मला; द्या कोल्हापूरला’ असा निर्णय झाला. गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण जिल्हाभर दिलीप देशमुख आरतीचे ताट घेऊन फि रत आहेत. कोणाला बुक्का व कोणाला प्रसाद द्यायचा याची माहिती घेत प्रचार सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळीने कामाला लागावे यासाठी काँग्रेसला वेगळे स्वतंत्र आरतीचे ताट घेऊन जावे लागते आहे. तीच स्थिती भा. ज. प.ने शिवसेनेचे सर्व गट कामाला लागावेत यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र ताट पाठवावे लागत आहे.