Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानला उत्तर देण्याची ताकद युतीमध्येच - मोदी
नांदेड, ६ एप्रिल/वार्ताहर

 

दहशतवादाचे उघडपणे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानला ‘प्रेमपत्र’ लिहून भारतातला दहशतवाद संपणार नाही, त्यासाठी ‘जशास तसे’ उत्तर देण्याची गरज आहे आणि ती ताकद केवळ भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतच आहे, असे गुजरातचे मुख्यमंत्री व भा. ज. प.चे महाराष्ट्राचे प्रभारी नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
नांदेड मतदारसंघातील भा. ज. प.- शिवसेना युतीचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ गुरुगोविंदसिंग स्टेडियमवर श्री. मोदी यांची आज सभा झाली. भा. ज. प.चे नेते पांडुरंग फुंडकर, खासदार डी. बी. पाटील, शिवसेनेचे सुहास सामंत, जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, आमदार अनसूया खेडकर व सुभाष साबणे, सुरजितसिंह ठाकूर, भा. ज. प.चे शहराध्यक्ष प्रकाश कौडगे आदी या वेळी उपस्थित होते.
‘नमस्कार’ अशी भाषणाला सुरुवात करून श्री. मोदी म्हणाले, ‘‘गुजरात आणि नांदेडचे भावनिक नाते आहे. ज्या गुरुगोविंदसिंगांची समाधी येथे आहे; त्यांचे जे पाच प्रमुख जत्थेदार होते त्यापैकी एक द्वारकानगरीचे होते. त्याचा आपणास अभिमान आहे.’’ ते असे म्हणताच ‘बोले सो निहाल सत् श्रीअकाल’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
श्री. मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेसला सर्वसामान्यांचे काहीही देणे-घेणे नाही. एकाच ‘घरात’ सत्तेची सूत्रे आहेत. ज्यांना या भूमीशी आस्था नाही, त्यांच्या हातात सत्ता असल्याने गरिबी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबत काँग्रेसला कोणतेही सोयरसूतक नाही. कापसाचे उत्पादन आंध्र प्रदेश, महाराष्ट्रासह गुजरातमध्येही होते. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करतात, तर गुजरातमधील कापूस उत्पादक चीनच्या बाजारात जाऊन कापूस विकतो. सरदार वल्लभभाई पटेल आज असते आणि पंतप्रधानपदी असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. शेतकऱ्यांबद्दल काँग्रेस नेत्यांना कोणताही कळवळा नाही. गुजरातमध्ये वीजकपात माहीत नाही, गरिबांना स्वस्त दरात धान्य दिले जाते. तेथील जनता सुरक्षित आहे, बेरोजगारांच्या हाताला काम आहे, गरिबांसाठी शिक्षणाची दारे उघडी आहेत मग तुमच्याकडे का नको? केंद्रात लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर जे जे गुजरातमध्ये आहे. ते ते तुम्हाला मिळेल.’’
भा. ज. प.- शिवसेना युती अभेद्य आहे. ही युती सुखात आहे. दु:खातही आहे, सत्तेत असतानाही आहे आणि विरोधी पक्ष म्हणूनही आहे. कारण आमची जनतेसोबत युती आहे. परंतु काँग्रेसचे सर्व मित्रपक्ष त्यांच्यापासून दुरावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात काँग्रेससोबत तर गुजरातमध्ये त्यांच्या विरोधात व दिल्लीत पंतप्रधानाच्या बगलेत. हे काय आहे? त्यांना कोणतीही राजकीय मूल्ये नाहीत, अशी टीका श्री. मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.
विकास नाही, सुशासन नाही, सुरक्षा नाही. देशातल्या काही भागात दिवसेंदिवस दहशतवाद वाढत आहे आणि केंद्र सरकार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानशी पत्रव्यवहार (लवलेटर) करून आपली जबाबदारी झटकत आहे, असे सांगून श्री. मोदी म्हणाले की, पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. ती ताकद भा. ज. प.-शिवसेनेमध्येच आहे. रोजगार हिसकावणाऱ्यांचा रोजगार तुम्ही मतदानाद्वारे काढून घ्या.
भारतातल्या काही राजकीय नेत्यांचे विदेशातल्या बँकांत पैसे आहेत. २५ लाख कोटींपेक्षा जास्त असलेला हा निधी भारतात आणण्याबाबत काँग्रेस नेते का मौन बाळगून आहेत? केंद्रात आमची सत्ता आल्यावर हा सर्व पैसा भारतात आणून गोरगरिबांच्या कल्याणासाठी वापरला जाईल असे श्री. मोदी म्हणाले. आज भा. ज. प.चा वर्धापनदिन आहे. पक्षाच्या स्थापेला ३० वर्षे झाली. एकीकडे १२५ वर्षांची म्हातारी काँग्रेस तर दुसरीकडे तरुण भा. ज. प. तुमचा विकास कोण करू शकतो हे तुम्हीच ठरवा असे स्पष्ट करून विकासासाठी भा. ज. प.च्या संभाजी पवार यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी खासदार पाटील, उमेदवार संभाजी पवार, सुहास सामंत यांची भाषणे झाली. उमेदवारी मागे घेऊन भा. ज. प.ला पाठिंबा जाहीर करणाऱ्या स्वतंत्र भारत पक्षाच्या गुणवंत पाटील हंगरगेकर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.