Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच कसोटी
गणेश कस्तुरे

 

आंध्र प्रदेश-कर्नाटक सीमेवर असलेल्या नांदेड मतदारसंघातून ‘दिल्ली’ कोण गाठणार? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास अजून पंधरवडा बाकी आहे. तथापि एकूण परिस्थिती पाहता या निवडणुकीत उमेदवारापेक्षा नेत्यांची कसोटी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. बावीस उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी निवडणुकीत चौरंगी लढत होईल, असे चित्र आहे.
ज्या जिल्ह्य़ाच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे, त्यापैकी नांदेड एक होय. कै. शंकरराव चव्हाण यांचा जिल्हा. दोन राज्याच्या सीमेवरील जिल्हा, प्रसिद्ध गुरुद्वारा यासाठी यापूर्वी देशभरात प्रसिद्ध असलेल्या नांदेडची ओळख मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या रूपाने आता होऊ लागली आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहता तसेच एक-दोन अपवाद वगळता या जिल्ह्य़ाने नेहमी काँग्रेसलाच साथ दिली. सन १९७७नंतर झालेल्या निवडणूक निकालावर दृष्टीक्षेप टाकल्यास १९८९ व २००४मध्ये झालेल्या दोन निवडणुकांत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. या दोन्ही निवडणुकांमध्ये झालेला पराभव पक्षाचा नव्हे; तर उमेदवारावर असलेल्या प्रचंड नाराजीमुळे झाला होता, हे एक वास्तव आहे. सन १९८९च्या निवडणुकीत सर्व पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अशोक चव्हाण यांचा आणि मागच्या निवडणुकीत भास्करराव पाटील खतगावकर यांना पराभवाची धूळ चारली. दोन्ही निवडणुकांतील पराभवांची कारणे वेगवेगळी असली, तरी उमेदवाराबद्दलची नाराजी हे एक प्रमुख सारखे कारण होते. गेल्या निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी काँग्रेसच्या भास्करराव पाटील खतगावकर यांना ‘हात’ दिला आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात ‘कमळ’ फुलले.
आता उन्हासोबत राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. प्रथमच २२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असले तरी खरी लढत चौरंगीच, असेल असे मानले जाते. कोणतीही निवडणूक म्हटले की, अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध सर्व पक्षाचे एकत्र असे चित्र पाहावयास मिळते. आपल्याविरुद्ध लढताना सर्व विरोधक एकत्र याची पूर्ण कल्पना असल्याने अशोक चव्हाण व त्यांचे समर्थक मैदानात उतरतात ते संपूर्ण तयारीनिशी. त्यामुळे पराभव कधी तरीच त्यांना खुणावतो.
भारतीय जनता पक्षाने खासदार डी. बी. पाटील यांना डावलून संभाजी पवार यांना उमेदवारी देत ‘सगळ्यांना संधी’ चा नारा लावला आहे. प्रत्यक्षात ‘डी.बी.’ उत्सुक नव्हते म्हणून पवारांना संधी दिली हे एक सत्य आहे. गेल्या पाच वर्षांत ‘डी. बीं.’ चे लोकसभेतील काम सुमार होते. जिल्ह्य़ातील रेल्वेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याबाबत ते स्वत:हून कधीही आक्रमक झाले नाहीत. खासदार झाल्यानंतर पक्ष वाढविण्याऐवजी त्यांनी गोतावळा वाढविल्याने त्यांना उमेदवारी नाकारल्याचे कोणालाही आश्चर्य वाटले नाही. काँग्रेसच्या तालमीत वाढलेल्या व कालांतराने भा. ज. प.मध्ये स्थिरावलेल्या संभाजी पवार यांना पक्षाने निवडणूक रिंगणात उतरविले. श्री. खतगावकर यापूर्वी दोन वेळा खासदार होते. संसदेतील कामाचा दांडगा अनुभव, वेगवेगळ्या विकासाच्या योजना खेचून आणण्याची क्षमता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेली मनापासून साथ या त्यांच्या जमेच्या बाजू. दुसरीकडे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक व गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याचे प्रश्न त्यांना डोकेदुखी ठरत आहेत. जिल्हा बँक लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळाले असले तरी साखर कारखान्यामुळे नायगाव व परिसरात नाराजीचा सूर कायम
आहे.
बहुजन समाज पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आलेल्या मकबूल सलीम यांना ‘हत्ती’वर स्वार केले आहे. गेल्या दोन महिन्यापासून पक्षाचे जिल्हाध्यक्षोाबूराव गजभारे यांनी परिश्रम घेऊन त्यांना राजी केले. ब. स. प.ची सर्व मदार दलित-मुस्लिम मतदारांवर आहे. यंदा प्रथम जनसुराज्य पक्ष निवडणूक रिंगणात आहे. आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ात म्हणजे नांदेड आणि लातूर जिल्ह्य़ात उमेदवार उभे करणाऱ्या जनसुराज्यने नांदेडची उमेदवारी मुंबईहून आयात केलेल्या एका सुशिक्षित, उच्च विद्याविभूषित महिलेला दिली आहे. लिंगायत, हटकर-धनगर समाजाची एकगठ्ठा मते मिळतील; शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची पडद्यामागून साथ मिळेल असा या पक्षाच्या नेत्यांचा होरा आहे.
नांदेड मतदारसंघात भा. ज. प., ब. स. प., जनसुराज्य पक्षांनी दिलेल्या उमेदवारांची पाटी कोरी आहे. ‘काँग्रेसने भा. ज. प.चा उमेदवार मॅनेज केला,’ ही सुरुवातीच्या काळात होणारी चर्चा अफवा होती हे स्पष्ट झाले आहे. अन्य उमेदवारांच्या तुलनेत भा. ज. प.-काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या सभेने काँग्रेस कार्यकर्त्यांत आणि लालकृष्ण अडवाणी व नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे भा. ज. प.-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रारंभी प्रचारापासून चार हात दूर राहणारे शिवसेनेचे कार्यकर्ते मरगळ झटकून कामाला लागल्याने भा. ज. प. नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘मी उमेदवार आहे असे समजून काँग्रेसला मतदान करा’ आणि भा. ज. प. नेते गोपीनाथ मुंडे यांनीही असेच आवाहन केल्याने नांदेडमध्ये उमेदवारांपेक्षा नेत्यांची कसोटी लागणार आहे. ब. स. प. उमेदवाराला दलित - मुस्लिमांची जास्तीतजास्त मते मिळावीत अशी युतीच्या नेत्यांची इच्छा आहे. ही पारंपरिक मते आपल्या पारडय़ात पाडून घेण्यासाठी काँग्रेसने व्यूहरचना केली आहे.
प्रचाराने आता चांगलीच गती घेतली असली तरी मतदार मात्र आपले ‘पत्ते’ उघडण्याच्या मन:स्थितीत नाहीत. सर्व उमेदवारांना आम्ही तुमचेच अशी ग्वाही देणारे मतदार कोणत्या नेत्याला ‘हात’ देतात की हातात ‘कमळ’ देतात याकडे केवळ नांदेडचेच नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे हे मात्र निश्चित!