Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शायराना अंदाज!

 

*काँग्रेसचे जालना शहराधअयक्ष विनय कोठारी माजी आमदार कैलास गोरंटय़ाल विरोधी गटाचे आहेत. उमेदवार कल्याण काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत कोठारी यांनी गोरटय़ांल यांना उद्देशून पुढील शेर ऐकविला.
दुष्मनी लाख सही
बात ना बंद किजिए,
दिल मिले ना मिले
हाथ मिलाते रहिये
यानंतर गोरंटय़ाल यांनी उत्तरादाखल पुढील शेर ऐकविला -
हर चीज बह रही है मकर्जपर
एक जर्रा इधर भी
एक जर्रा उधर भी
नफरत से न देखो दुष्मनको
शायद वह भी मोहब्बत कर बैठे!
आमच्या बोलण्यावरही आचारसंहिता!
*जिंतूरचे माजी आमदार कुंडलिक नागरे यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांसाठी नेहमीच आनंदाचा आणि व्यासपीठावरील नेतेमंडळींसाठी अडचणीचा विषय असतो. ते कोणत्या वेळी काय बोलतील याचा नेम नाही. जिंतूरच्या सभेत ते शरद पवार यांना ‘साक्षात ईश्वरशक्ती’ असे म्हणाले. ‘साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही केले, पण आपल्याकडे नियोजनाचा अभाव आहे. शेतकऱ्यांना एकरी दहा लाख रुपये पीक कर्ज मिळायला पाहिजे,’ असा बॉम्ब त्यांनी टाकला. पवारांनीही ‘देऊन टाकले’ असे हातवारे केले. भाषण पाच मिनिटांत आटोपले पण ‘आम्ही विचित्र बोलतो म्हणून आम्हाला बोलू दिले जात नाही, आमच्या भाषणावरही आचारसंहिता आहे,’ ही सल नागरे यांनी बोलून दाखवलीच.
‘उन्हाचा त्रास, एसी गाडी पाठवा’
*एकीकडे निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आणि दुसरीकडे तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचू लागला आहे. भर उन्हात कार्यकर्ते कसे काम करतील, याची उमेदवारांना चिंता आहे. शिवसेनेकडून विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचाराची जबाबदारी शहरप्रमुखांकडे सोपविण्यात आली आहे. प्रचाराला सुरूवात झाली आणि एका शहरप्रमुखाने जिल्हाप्रमुखामार्फत निरोप पाठविला. ‘साहेब उन्हाचा खूपच त्रास होतोय. माझ्या गाडीला एसी नाही. त्यामुळे दुपारी बाहेर पडणे अवघड झाले आहे. लकरात लवकर एसी गाडी पाठवा. तरच दुपारी प्रवास शक्य आहे.’ इकडे दिवसभर प्रचार केलेल्या कार्यकर्त्यांना सायंकाळी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पैशांची जमवाजमव सुरू असतानाच हा निरोप आल्याने ‘आधी यांच्या जेवणाचे बघतो नंतर तुझ्या एसी गाडीचे बघू’ असा उलट निरोप दिला. अजून काही गाडी मिळालेली नाही आणि त्याने मागणीही सोडली नाही.
शिवसेनेची चांदी
*लोकसभेचा वायदा आणि त्यामुळे बाजार समितीत फायदा, अशी भोकरदन तालुक्यात शिवसेनेची मज्जा झाली. लोकसभा व बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक एकाच वेळी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे एरवी शिवसैनिकांना हिंग लावून विचारत नाहीत. यंदा चमत्कार झाला. बाजार समितीत भा. ज. प.ची एकतर्फी ताकद असतानाही दानवे यांनी युती केलीा. शिवसेनेला अठरापैकी पाच जागा दिल्या. लोकसभेमुळेच आमची चांदी झाली, अशी प्रतिक्रिया दानवेविरोधक शिवसैनिकाने बोलून दाखविली.
सोशल नव्हे ‘सोसलं इंजिनीअरिंग’
*लातूरच्या टाऊन हॉलच्या मैदानावरील सभेत कराडचे आमदार विलास उंडाळकर यांचे भाषण लांबत असल्यामुळे उपस्थित टाळ्या वाजवून त्यांना भाषण बंद करण्यास सांगत होते. टाळ्या वाजतील तसे ते जोशात बोलत होते. सोशल इंजिनिअरिंगची पद्धत काँग्रेसने सुरू केल्याचे ते सांगत होते. ते कोणी सुरू केले ते नंतर बघू तुमचे भाषण ‘सोसावे’ लागत आहे अशी प्रतिक्रिया श्रोत्यांनी व्यक्त केली.
हवालदार तापला..
*राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर यांच्या प्रचाराची सभा भर ऊन्हात सुरू झाली. गर्दी जाम होती. आचारसंहितेच्या नियमांचे पालन करताना बिचाऱ्या पोलिसांची कसरत सुरू होती. लागोपाठ होणाऱ्या सभा ‘सहन’ करण्यासाठी बरेच पोलीसदादा ‘थंड’ होऊन आले होते. एका हवालदाराने पत्रकार कक्षाच्या समोरच ‘जय ससरेकाल’चा नारा लगावत उत्साही कार्यकर्त्यांना दंडुका दाखविण्यास सुरुवात केली. ‘दादा’ बनू लागलेल्या या पोलीसमामाला त्याच्या सहकाऱ्यांनी सभेपासून बाजूला नेले. त्यामुळे पोलीसही कार्यकर्त्यांबरोबर ‘तापल्याचे’ कळाले नाही तरच नवल.
(लेखन : रवींद्र देशपांडे/भोकरदन, प्रदीप नणंदकर/लातूर, आसाराम लोमटे/परभणी, दत्ता सांगळे/औरंगाबाद, वसंत मुंडे/बीड, लक्ष्मण राऊत/जालना.)