Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात - आवळे
लातूर, ६ एप्रिल/वार्ताहर

 

लातूर लोकसभा मतदारसंघाचा विकास हाच आपला निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दा राहणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे उमेदवार जयवंत आवळे यांनी आज पत्रकार बैठकीत केले. या वेळी क्रीडामंत्री दिलीप देशमुख, बसवराज पाटील-नागराळकर, अमित देशमुख, त्र्यंबकदास झंवर, एस. आर. देशमुख, व्यंकट बेद्रे, भगवान वैराग उपस्थित होते.
श्री. आवळे म्हणाले की, आपल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सामान्य माणसांचा विकास हा प्रमुख मुद्दा राहिला. इचलकरंजी नगरपालिकेतील सदस्य म्हणून १९७० ला राजकीय जीवनात प्रारंभ केल्यानंतर १९८० ते २००४ पर्यंत २५ वर्षे आमदार म्हणून काम केले. त्यातील पाच वर्षे राज्याचा कॅबिनेटमंत्री होतो. सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यातील सातत्यामुळेच आपण विजयी झालो. अखिल भारतीय काँग्रेसने लातूर लोकसभेतून निवडणूक लढविण्याचे आदेश दिले. या मतदारसंघात शिवराज पाटील-चाकूरकर, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी विकासाची कामे प्रारंभापासून केली आहेत. त्यांच्या राहून गेलेल्या कामांना गती देण्याचे काम आपण आगामी काळात करणार असल्याचे आवळे म्हणाले.
या मतदारसंघातील प्रश्न समजून घेण्याचे कामही आपण करीत असल्याचा उल्लेख श्री. आवळे यांनी केला. लातूरकरांच्या आशीर्वादावर आपण लोकसभेत नक्की विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .