Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

घरकूल घोटाळा प्रकरण तंटामुक्त गाव समितीकडे
जळकोट, ६ एप्रिल/वार्ताहर

 

तालुक्यातील जगळपूर व हावरगा या दोन गावांत हावरगा येथील जय मल्हार मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेमार्फत राष्ट्रीय कल्याण निधी योजनेंतर्गत बेघर असलेल्या १०० लाभार्थ्यांना घरकुलांचे बांधकाम करून देण्यात आले आहे. अनुदान वाटपात या संस्थेने घोटाळा केल्याची तक्रार संबंधित लाभार्थ्यांनी केली होती. सर्वमान्य तोडगा निघावा यासाठी हे घरकूल घोटाळा प्रकरण जगळपूर येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे सोपविण्यात आले आहे.
प्रत्येक घरकुलास ४० हजार रुपये याप्रमाणे ४० लाख रुपये अनुदान १०० घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. हे घरकूल बांधकाम जय मल्हार मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेमार्फत करण्यात आले आहे. तथापि, संस्थेचे अध्यक्ष नामदेव विराळे यांनी लाभार्थ्यांकडून घरकूल बांधकामाच्या अनुदानाची रक्कम मिळाल्याबद्दलच्या कोऱ्या पावत्यांवर आधीच स्वाक्षऱ्या घेतल्या आणि आता रक्कम देण्यास ते टाळाटाळ करीत आहेत, अशी लेखी तक्रार सर्व संबंधितांकडे लाभार्थ्यांतर्फे करण्यात आली होती.
पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. उद्धवराव गुरुडे व सरपंच अंजनबाई वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली १०० लाभार्थ्यांचे शिष्टमंडळ जळकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष राजूरकर यांना नुकतेच भेटले. त्यानंतर तक्रारकर्ते लाभार्थी व संस्थेचे अध्यक्ष नामदेव विराळे यांच्यात चर्चा होऊन हे प्रकरण मिटविण्यासाठी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गंगाधर लोहकरे यांच्याकडे सोपविण्यात आले. नामदेव विराळे यांनी ३० एप्रिल २००९ या तारखेचा आगाऊ कोरा धनादेश गंगाधर लोहकरे यांच्याकडे दिला असून ही रक्कम उचलून संबंधित लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकारातून १०० घरकूल बांधकामाच्या अनुदान घोटाळ्याचे हे प्रकरण एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मिटण्याची शक्यता आहे.