Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण करून लुटले
परळी वैजनाथ, ६ एप्रिल/वार्ताहर

 

एका गुन्ह्य़ातील लोकांना अटक करण्यासाठी तालुक्यातील सिरसाळा येथील पोलीस कौडगाव घोडा येथे गेले असता त्यांना मारहाण करून लुटण्यात आले. पोलिसांनी तीन बालकांसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खरा प्रकार मात्र वेगळाच असल्याची चर्चा आहे.
कौडगाव घोडा येथील दोन शेतकऱ्यांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला. दोन्ही गटांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रारी दिल्या. नंतर हे प्रकरण गावात आपापसात मिटले. सिरसाळा पोलीस याच प्रकरणातील लोकांना अटक करण्यासाठी काल रात्री गेले. पोलीस व साबळे यांच्यात बाचाबाची झाली. यात पोलिसांच्या कामात अडथळा आणून लुटण्याचा प्रकार झाला असल्याची तक्रार पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ काशीनाथ पगार यांनी पोलीस ठाण्यात दिली. गंगाधर साबळे, दामोदर साबळे, बाबासाहेब साबळे, हरिश्चंद्र साबळे, ज्ञानेश्वर साबळे, मारोती साबळे, विलास साबळे, लक्ष्मण साबळे, गोविंद साबळे, काशीबाई साबळे, राधा साबळे, तारामती साबळे आणि सहा, नऊ व दहा वर्षांच्या तीन मुलांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, दरोडा, सामूहिक हल्ला आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला.