Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीने प्रभावित झाल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश’
बिलोली, ६ एप्रिल/वार्ताहर

 

केंद्रातील डॉ. मनमोहनसिंग सरकार हे देशाच्या सुरक्षेची हमी देणारे व गोरगरिबांचे हित जोपासणारे आहे. शेतक ऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय याच सरकारने घेतला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अल्पावधीत केलेल्या विकास कार्याने प्रभावीत होऊन आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला, अशी माहिती माधवराव पाटील शेळगावकर यांनी दिली.
श्री. शेळगावकर यांनी नुकताच भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याबाबत ते म्हणाले की, देशाला महासत्ता बनविण्यासाठी डॉ. मनमोहनसिंग सरकारने अणुकरार केला. शेतकऱ्यांना ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. आम आदमी विमा योजना राबविली तसेच राष्ट्रीय रोजगार हमी योजना, बचत गटासाठी चार टक्के दराने कर्ज, बाराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण केला. मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी नांदेडला महसूल कार्यालयाची घोषणा केली. गुरु-ता-गद्दीनिमित्त अठराशे कोटींचा निधी खेचून आणला. विविध वीज प्रकल्पांसाठी ८१० कोटी निधी आणला. शेतकऱ्यांना सहा हजार दोनशे कोटी रुपयांची उर्वरित कर्जमाफी दिली. चव्हाणांच्या या कार्यामुळे आपण प्रभावीत होऊन काँग्रेस पक्षात आलो असून काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार खतगावकरांना निवडून आणण्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करीत असल्याचेही शेळगावकरांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.