Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

युती समर्थक अपक्ष नगरसेवक अब्दुल साजेद यांचे सूचक
औरंगाबाद, ६ एप्रिल/प्रतिनिधी

 

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे विद्यमान सभापती अब्दुल साजेद यांनी आज चार अर्ज सादर केले. यातील दोन अर्जावर भाजप समर्थक सीताराम सुरे आणि शिवसेनेचे समर्थक रविकांत गवळी यांची स्वाक्षरी आहे. विशेष म्हणजे युतीकडून सभापतिपदाचे उमेदवार म्हणून सुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी साजेद यांची साथ देण्याचे ठरविल्याचे आज अधिकृतपणे समजले.
रवी गवळी हे आमच्याबरोबरच असल्याचा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता. हा दावाही आज खोटा ठरला.
‘दामोदर शिंदे यांची सूचक म्हणून स्वाक्षरी असलेला आणखी एक अर्ज माझ्याकडे तयार होता. मात्र नियमानुसार एक उमेदवार फक्त चारच अर्ज भरू शकत असल्यामुळे तो अर्ज मला सादर करता आला नाही.’ असे साजेद यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ‘निवडणुकीला सुरे, गवळी यांच्यासह शिंदेही उपस्थित राहतील आणि मला १६ पैकी ११ मते मिळतील’ असा दावाही त्यांनी केला आहे.
युतीच्या समर्थक अपक्षांनी साजेद यांच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केल्याचे समजताच युतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे दामोदर शिंदे हे गेल्याच आठवडय़ात गायब झाले होते. त्यानंतर आणखी दोन नगरसेवक साजेद यांच्या संपर्कात असल्याची चर्चाही सुरु होती. तरीही आमचे सर्व नगरसेवक तसेच सीताराम सुरे आणि रविकांत गवळी हे आमच्याबरोबरच असल्याचा दावा युतीकडून करण्यात येत होता. सीताराम सुरे यांनी ऐनवेळी पक्षाची साथ सोडू नये म्हणून भाजपने त्यांनाच उमेदवारी जाहीर केली होती.
‘पराभव दिसत असताना मला उमेदवारी दिली’ असे सांगून सुरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून तेही युतीच्या नेत्यांच्या संपर्कात नव्हते. तरीही ते परत येतील, असे सांगण्यात येत होते.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी कोणी अर्ज खरेदी केले, याची चौकशी होण्यापूर्वीच साजेद यांनी सहा अर्ज खरेदी केले आणि दुपारी चार अर्ज सादरही केले. साजेद वगळता अन्य कोणीही अर्ज खरेदी केला नाही.
उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस बुधवारी (दि. ८) असून गुरुवारी निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पंधरा मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी आहेत. युतीकडून कोणाला उमेदवारी देण्यात येते हे बुधवारी समजेल.
साजेद यांचे चार अर्ज मिळाले असल्याचे नगरसचिव एम. ए. पठाण यांनी सांगितले.