Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लुटमार करणाऱ्या आघाडी सरकारला जागा दाखवा - आमदार जाधव
परभणी, ६ एप्रिल/वार्ताहर

 

औरंगाबाद, लातूर व नांदेड यासारख्या महानगरांच्या तुलनेत अविकसित असणाऱ्या परभणी, पूणा४ व सोनपेठ येथे सुमारे सहा पटींनी अवाजवी जादा अकृषिक कर लावून शासनाने जनतेची कोटय़वधी रुपयांची लुबाडणूक केली. अशा लुटमार करणाऱ्या आघाडी शासनास जनता कधीही माफ करणार नाही, असे स्पष्ट मत आमदार संजय जाधव यांनी व्यक्त केले.
परभणी मतदारसंघाचे उमेदवार गणेशराव दुधगावकर यांच्या प्रचारानिमित्त आमदार जाधव यांनी परभणी शहरात एक बैठक घेतली. शासनास जास्तीचा महसूल मिळावा यासाठी नियम व निकष गुंडाळून ठेवीत आघाडी शासनाने मागील १० वर्षांत जनतेची कोटय़वधी रुपयांची अक्षरश: लुबाडणूक केली. मोठय़ा शहरातील ज्या घरांसाठी एक हजार रुपयांचा अकृषिक कर घेण्यात येत होता त्याच क्षेत्रफळासाठी परभणी, पूर्णा व सोनपेठ येथील नागरिकांना सुमारे सहा ते साडेसहा हजार रुपयांचा अकृषिक कर भरावा लागत असे. कर न भरणाऱ्या नागरिकांवर सुमारे ४० पट दंड आकारण्यात येऊन अतिरेक म्हणजे जनतेची मालमत्ताही जप्त करण्यात येत असे. या अवाजवी कराविरोधात आमदार जाधव यांनी जुलै २००६ दरम्यान लक्षवेधी तर डिसेंबर २००७ व मार्च २००८ दरम्यान तारांकित प्रश्नांद्वारे शासनाच्या विरोधात लढा दिला. मात्र त्यानंतरही कोटय़वधी रुपयांचा कर कमी करण्याबाबत हेतुत: दिरंगाई करण्यात आली. त्याविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे दाद मागून आमदार जाधव यांनी शासनास दर कमी करण्यास भाग पाडले, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
पूर्वी निवासासाठी प्र. चौ. मी. सहा रुपये, उद्योगासाठी नऊ रुपये तर वाणिज्यसाठी १२ रुपये या जाचक दराने अकृषिक कर वसूल करण्यात येत होता. आमदार जाधव यांच्या यशस्वी लढय़ानंतर सध्या निवासासाठी केवळ प्र. चौ. मी. ९० पैसे, उद्योगासाठी १ रुपया ३८ पैसे, तर वाणिज्यसाठी १ रुपया ८४ पैसे एवढय़ा अल्पदराचा कर लागू राहणार आहे. त्यामुळे तसेच यापूर्वी जादा दराने भरण्यात आलेल्या अकृषिक कराच्या रकमेचे समायोजन करण्यात येणार असून पुढील काळात ही रक्कम जमा करून घेण्यात येईल, असे स्पष्ट करीत आमदार जाधव यांनी जनतेची लुबाडणूक करणाऱ्या शासनास त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहनही त्या बैठकीत केले.