Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आयुक्तालयातील ११ उपनिरीक्षकांच्या बदल्या
औरंगाबाद, ६ एप्रिल/प्रतिनिधी

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातील ११ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश आज काढण्यात आले. आतापर्यंत नियंत्रण कक्षात असलेल्या दोघांना पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे.
सुनील लहाने आणि डी. एम. कदम यांची बदली नियंत्रण कक्षातून अनुक्रमे बेगमपुरा आणि जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर बेगमपुरा आणि सिडको औद्योगिक वसाहत ठाण्यातून अनुक्रमे इशोद्दीन कादरी आणि बाजीराव खंडागळे यांची बदली करण्यात आली आहे. जिन्सी पोलीस ठाण्यातील निर्मळ यांची बदली वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात, दशरथ चौधरी यांची बदली छावणी येथून सिडको औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात तर सय्यद कासीम अली यांची बदली विशेष शाखेतून जिन्सी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे रवींद्र बागुल यांची छावणी पोलीस ठाण्यात तर जिन्सीचे शेख शहाबुद्दीन यांची बदली बेगमपुरा ठाण्यात करण्यात आली आहे. जिन्सी येथे कार्यरत असलेले मदनसिंग पवार यांची बदली वाळूज औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात तर जिन्सीचेच भारत राठोड यांना छावणी पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहेत. तातडीने नव्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.
चार पोलीस निरीक्षक रुजू
गेल्या आठवडय़ात राज्यभरात पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठय़ा प्रमाणावर बदल्या झाल्या होत्या. त्यात औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील पाच पोलीस निरीक्षकांचा समावेश होता. त्यांच्या जागेवर चार पोलीस निरीक्षक येणार होते. त्यानुसार चौघे आज आयुक्तालयात रुजू झाले. नामदेव ठोंबरे, सुंदर भांडवले, माणिक वऱ्हाडे आणि पी. एच. डुकरेपाटील अशी या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.
या पोलीस अधिकाऱ्यांकडे पदभारही सोपविण्यात आले आहेत. भांडवले यांच्याकडे सिटीचौक, डुकरे यांच्याकडे जवाहरनगर तर ठोंबरे यांच्याकडे वाळूज औद्योगिक पोलीस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. वऱ्हाडे यांची बदली क्रांतिचौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे स्वतंत्र पदभार देण्यात आलेला नाही.