Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘विसंवादाच्या युगात सुसंवादासाठी पारिवारिक पत्रिका उपयुक्त’
औरंगाबाद, ६ एप्रिल/प्रतिनिधी

 

जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास मुख्य प्रवाहातील दैनिकेदेखील कमी पडत आहेत. कारण प्रस्थापित माध्यमांनी जाणीवपूर्वक काही चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष चालविले आहे. अशा काळात शैक्षणिक संस्थांच्या तसेच समाजोपयोगी उपक्रमांच्या बातम्यांना प्रसारमाध्यमे म्हणावे तितके स्थान देत नाहीत. त्यामुळे सरस्वती भुवन संस्थेने चालविलेला पारिवारिक मासिक पत्रिकेचा उपक्रम खरोखर उपयुक्त व चांगला आहे, असे मत ‘अ‍ॅग्रो वन’चे संपादक निशिकांत भालेराव यांनी व्यक्त केले.
गोविंदभाई श्रॉफ अकादमी सभागृहात सायंकाळी स. भु. पारिवारिक मासिक पत्रिकेचा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी स. भु. संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब काळदाते, उपाध्यक्ष दिनकर बोरीकर, भुजंगराव कुलकर्णी, संस्थेचे सरचिटणीस अशोक भालेराव तसेच निशिकांत भालेराव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. अशोक भालेराव यांनी या मासिक पत्रिकेविषयी अधिक माहिती दिली. स. भु. संस्था २०१५ मध्ये शताब्दी वर्ष साजरे करणार आहे. तत्पूर्वी संस्थेच्या वतीने परिवारातील सदस्यांशी, विद्यार्थ्यांशी तसेच पालकांशी सुसंवाद साधण्यासाठी ही पत्रिका उपयुक्त ठरणार आहे, असे स्पष्ट केले.
भुजंगराव कुलकर्णी यांनी या पत्रिकेत प्रत्येकाला लिहिण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. शिक्षकांचे तसेच परिवारातील प्रत्येक व्यक्तीचे योगदान वाढावे, त्यांचे विचार, विवेचन यात आवर्जून यावे, असे नमूद केले.
श्री. भालेराव म्हणाले, आजची पत्रकारिता अतिशय वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. मुख्य प्रवाहातील दैनिकेही सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. शाळा, महाविद्यालय तसेच सार्वत्रिक उपक्रमांच्या वृत्तांना दैनिकांनी भरीव प्रसिद्धी द्यायला हवी. तसे होत नाही.