Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

श्रीजागृत हनुमान मंदिराचा द्विशताब्दी महोत्सव आजपासून
औरंगाबाद, ६ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

शहरातील पानदरीबा भागातील श्रीजागृतहनुमान मंदिराचा द्विशताब्दी महोत्सव उद्यापासून (मंगळवार) साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मंदिरातर्फे सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीजागृत हनुमान मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी सतीश व्यास यांचे खापर पणजोबा कै. भैरवलाल व्यास त्या काळी गावात आले. त्यांना पिंपळाच्या व लिंबाच्या झाडामध्ये स्वयंभू हनुमानाची मूर्ती आढळली. त्यांनी या हनुमान मूर्तीची सेवा सुरू केली. ही मूर्ती सापकाटे हनुमान म्हणून प्रसिद्ध पावली.
पूर्वीच्या काळी साप चावलेल्या माणसाला येथे आणून हनुमान मूर्तीच्या बाजूला असलेल्या एका मोठय़ा काळ्या दगडावर बसविले जात होते. लिंबाच्या झाडाचा रस काढून हनुमानाच्या दर्शनाने तो रस त्या माणसाला पाजला जात असे. कितीही विषारी असले तरी सापाचे विष उतरत असे अशीही दंतकथा आहे. तेव्हापासून भक्तांनी याला जागृत हनुमान असे नाव दिले.
२०० वर्षे झाल्याच्या प्रीत्यर्थ सतीश व्यास यांनी एक चांदीचा आकर्षक मुखवटा तयार केला आहे. तो अर्पण करण्यात येणार आहे. मंगळवारपासून रुद्र स्वाहाका यज्ञाने या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
गुरुवारी मुखवटा अर्पण सोहळा आणि पूर्णाहुतीचा कार्यक्रम होणार आहे. हा महोत्सव १५ एप्रिलपर्यंत चालणार आहे.