Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीवरील आक्षेप फेटाळले
मनसेचे सुभाष पाटील ठरले अपक्ष
औरंगाबाद, ६ एप्रिल/प्रतिनिधी

 

वेरुळ मठाचे शांतिगिरी महाराज मौनगिरी यांच्या उमेदवारीला अपक्ष उमेदवार कृष्णा बनकर यांनी घेतलेले आक्षेप जिल्हा निवडणूक अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज फेटाळून लावले. त्यांचा अर्ज वैध ठरला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुभाष पाटील यांनी सादर केलेला ‘बी’ फॉर्म अवैध ठरला. त्यामुळे आता मतपत्रिकेवर ते म. न. से.चे नव्हे तर अपक्ष उमेदवार असतील.
श्री. बनकर यांनी शांतिगिरी महाराजांच्या अर्जाला आक्षेप घेतला. ‘शांतिगिरी महाराज नावाची व्यक्तीच अस्तित्वात नाही. ‘‘शांतिगिरी महाराज मौनगिरी’ या नावाने ज्यांनी अर्ज सादर केला आहे, त्यांचे मूळ नाव बाबू यशवंत कांडेकर असे आहे. ते महाराज नसून येथे फक्त पैसे गोळा करण्यासाठीच आले आहेत. तसेच त्यांचे औरंगाबाद तसेच नाशिक जिल्ह्य़ाच्याही मतदारयादीत नाव आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळावा,’ अशी विनंती बनकर यांचे वकील सतीश तळेकर यांनी केली. शांतिगिरी महाराजांनी नावाबाबतची कागदपत्रे सादर केली. त्यांनी नाव बदलून घेतलेले आहे. ‘गॅझेट’मध्ये त्यांनी नावात बदल करून घेतला आहे. त्याची कागदपत्रे, शांतिगिरी याच नावाने मतदारयादीतील नाव आणि ओळखपत्र याची पुरावे त्यांनी सादर केली.
यावर सुमारे एक तास सुनावणी झाली. शांतिगिरी महाराजांचे नाव दोन जिल्ह्य़ांच्या मतदारयादीत असल्याबद्दल आक्षेपकर्त्यांजवळ पुरावा नव्हता. ‘मी शपथपत्रावर तसे म्हटले असून ते ग्राह्य़ धरण्यात यावे, अन्यथा पुरावा देण्यासाठी वेळ देण्यात यावा’, असा युक्तिवाद करण्यात आला. ‘नियमानुसार आता वेळ देता येणार नाही. शपथपत्रावर तुम्ही काहीही म्हणाल. मी फक्त पुरावे बघतो. पुरावे असेल तेवढेच बोला,’ असे जयस्वाल यांनी आक्षेपकर्त्यांच्या वकिलाला सुनावले. त्यानंतर शांतिगिरी महाराज यांच्या अर्जावर करण्यात आलेले आक्षेप फेटाळण्यात येत असल्याचे जयस्वाल यांनी जाहीर केले.
सुभाष पाटील यांना पक्षाने दिलेला ‘बी’ फॉर्म अवैध ठरला. पक्षाध्यक्षाने ‘बी’ फॉर्मवर स्वाक्षरी करण्यासाठी पाच व्यक्तींची नियुक्ती केली होती. त्याखेरीज सहाव्याच व्यक्तीची स्वाक्षरीचा फॉर्म समोर आल्याने तो अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे पाटील अपक्ष उमेदवार ठरले आहेत.
याबरोबरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (डेमोक्रॅटिक) रमेश गायकवाड व कैलास गायकवाड या भावंडांनी उमेदवारी अर्ज केले होते. ‘बी’ फॉर्म देण्याचे अधिकार पक्षाने दोघांनीही दिले होते. रमेश गायकवाड निवडणूक लढणार असल्याचे पूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मात्र दोघांनी ‘बी फॉर्म’ भरताना स्वत:चा ‘बी फॉर्म’ रद्द समजावा, असे लिहून दिल्याने दोघांचाही बी फॉर्म रद्द करण्यात आला. दोघांचेही उमेदवारी अर्ज वैध ठरले असले तरी दोन्ही भाऊ अपक्ष ठरले आहेत.
अर्ज लिहिताना आमची चूक झाली आहे नव्याने संधी देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र नियमानुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या वेळेपर्यंत बी फॉर्म सादर करण्याची मुभा आहे. त्यानंतर त्यात बदल करता येत नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.