Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

औरंगाबादमध्ये ३१ अर्ज वैध
सात उमेदवारी अर्ज फेटाळले
औरंगाबाद, ६ एप्रिल/प्रतिनिधी

 

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारी अर्जाची आज छाननी होऊन विविध कारणांमुळे ७ अर्ज फेटाळण्यात आले. आता ३१ उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. अर्ज फेटाळण्यात आलेले सर्व उमेदवार अपक्ष होते. एकूण ३८ उमेदवारांनी एकूण ५१ अर्ज दाखल केले होते.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या दालनात सकाळी ११ वाजता छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली. शांतिगिरी महाराज वगळता कोण्याच्याही उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदविण्यात आला नाही. प्रमुख उमेदवारांमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे उत्तमसिंह पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुभाष पाटील, भारिप बहुजन महासंघाच्या ज्योती रामचंद्र उपाध्याय, बहुजन समाज पक्षाचे सय्यद सलीम सय्यद रऊफ या सर्वाचे अर्ज वैध ठरले.
अनिल बाबूराव सोनकांबळे, दिनकर यशवंतराव ओंकार, सुनील आसाराम घोलप, अशोक विठ्ठल बर्डे, मारोती परशुराम मोरे, राठोड गोरख राजपूत आणि सुरेश लक्ष्मण बोर्डे यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. यातील काही उमेदवार नव्याने जालना जिल्ह्य़ात समावेश झालेल्या भागातील होते. त्यामुळे त्यांना मतदारयादीत नाव असल्याबद्दल संबधित तालुक्याच्या तहसीलदाराचे प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यांनी प्रमाणपत्र न देता फक्त मतदारयादीची छायाप्रत दिली. मतदारयादीत नाव असलेल्या व्यक्तीला देशात कोठेही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे.
दुसऱ्या मतदारसंघात निवडणूक लढवायची असेल तर त्या ठिकाणच्या यादीत नाव असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. याची पूर्तता न केल्यामुळेच अर्ज अवैध ठरल्याचे जैस्वाल यांनी सांगितले. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस बुधवारी आहे. त्याच दिवशी चित्र स्पष्ट होईल.