Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लखलख चंदेरी

 

हाँगकाँगच्या व्हिक्टोरिया हार्बरच्या पुढच्या चंद्रकोरीसारख्या आकाराच्या खाडीसमोर आम्ही उभे होतो. हाँगकाँग बंदराचा निमुळता भाग जिथे समुद्राला मिळतो त्या भागाच्या टोकाशी! तिथून तीन बाजूंना समुद्राचं पाणीच आहे. ही खाडी ओलांडली की परत बेटाचा भाग लागतो. जमीन कमी असल्यामुळे या छोटय़ा बेटावर इमारती अनेक मजली बांधण्याशिवाय पर्याय नाही. त्यातही काही ठिकाणी टेकडय़ा, चढ-उतार आणि चक्क डोंगर आहेत. त्यामुळे घरबांधणीसाठी उपलब्ध जागा अजूनच कमी आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी गगनचुंबी इमारतींचीच संख्या खूप आहे. बैठी एकमजली किंवा दुमजली घरे नाहीतच.
या बेटाच्या क्षितिजरेषा अशी गगनचुंबी इमारतींनी सजून गेलेली. संध्याकाळ झाली तशी हाँगकाँगनगरी एखाद्या सजलेल्या नववधूसारखी दिसू लागली. सर्वच इमारतींवर रोषणाई केलेली असल्यामुळे एखाद्या राणीच्या दिमाखात ही नगरी झळाळून पर्यटकांचे डोळे दिपवत होती. जीवनाचा सर्वागाने उपभोग घ्या, आनंद लुटायचा तेवढा मनसोक्त लुटून घ्या आणि इथल्या मोहमयी दुनियेत स्वत:ला हरवून जा, असंच जणू ती सुचवीत होती.
खरं तर एखाद्या खास प्रसंगासाठी इमारतीवर किंवा रस्त्यावर रोषणाई करण्याची इतरत्र पद्धत आहे; परंतु हाँगकाँगमधल्या इमारतीवर कायमस्वरूपी रोषणाई केलेली आहे. कावलून द्वीपकल्पाच्या टोकाच्या भागावर समुद्राची चंद्रकोरीसारखी खाडी हाँगकाँग बेट व कावलून यादरम्यान तयार झालेली आहे. त्या भूखंडाच्या निमुळत्या टोकाजवळ उभं राहिलं की, त्या अर्धचंद्राकृती पट्टय़ातल्या सगळ्या गगनचुंबी इमारती नजरेला पडतात. त्या खाडीजवळच्या कुठल्याही रस्त्यावरून तुम्हाला रात्रीचे हे दृश्य बघायला मिळते. रात्रीचे ८ वाजले की या इमारती ‘जाग्या’ व्हायला सुरुवात होते. या सर्वच इमारतींवर इतक्या प्रकारे आणि विविध रंगांत रोषणाई केलेली आहे की आपले डोळे दिपून जातात. खरं तर या गगनचुंबी इमारतींची अशी माळच आपल्यासमोर उभी राहते आणि आपण एखाद्या जवाहिऱ्याच्या दुकानातच उभे आहोत की काय, असा भास होतो. काही इमारती एकावर एक नाण्यांची चळत ठेवल्यासारख्या प्रत्येक मजल्याच्या आडव्या रेषेवर झळकत राहतात. मध्येच त्यांचे रंग बदलत राहतात. काही इमारतींच्या डोक्यावर असलेले घुमट पिवळ्या रंगाने प्रकाशमान झालेले, तर काहींच्या डोक्यावर मुकूट ठेवलेला आहे की काय, असा भास व्हावा. काही इमारती त्यांच्या उभ्या विस्ताराच्या कडेला क्रमाक्रमाने प्रकाशमान होणाऱ्या तर काही क्षणोक्षणी रंग बदलणारे दिवे अंगावर झळकवणाऱ्या.
रात्रीचे ८ वाजल्यानंतर यातील काही इमारतींच्या डोक्यावर प्रकाशाचे झोत लांबवर टाकणारे दिवे लागतात, तर काही इमारती लेसरची किरणे असलेले कातीव आणि रंगीत प्रकाशझोत लांबवर फेकतात. इथली सर्वात उंच मनोऱ्याची इमारत बरेच वेळा ढगांनी वेढलेली असते आणि त्यामुळे तिचा सर्वात वरचा भाग ढगांच्याही वर गेल्यासारखा वाटतो आणि दिसतच नाही. रात्रीच्या वेळेला आकाशात ढग असतील तर हे लेसरचे झोत या ढगांवर वेगवेगळ्या आकृती रेखताहेत, असा भास होतो. बऱ्याच इमारतींमधून गडद हिरव्या रंगाचे लेसर किरणांचे प्रकाशझोत उघडमीट करीत आपली लीला दाखवितात आणि काही काळ हा खेळ चालू राहतो. हाँगकाँगनगरीला कायमस्वरूपी प्रकाशयोजनेसाठी गीनिज बुकात नोंदवले गेले आहे.
या प्रकाशाच्या रंगीत आणि डोळे मिचकावणाऱ्या खेळाच्या पाश्र्वभूमीवर निवेदनही चालू असते. ज्या जगप्रसिद्ध ब्रँडची जाहिरात इमारती करतात, त्या ठळकपणे दिसाव्यात म्हणून जाहिरातदारांनी अनेक नेत्रदीपक प्रयोग इथे केले आहेत. ही प्रकाशाची मजा अनुभवण्यासाठी काहीच तिकीट नाही. या प्रकाशोत्सवात न्हाऊन निघण्यासाठी आम्ही थांबलो होतो त्या शिम-शा-लुई स्थानकाजवळ अनेक जण थांबले होते. विजेचा एवढा लखलखाट पाहिला की दुष्काळातून आलेल्या माणसाला धबधब्याजवळ आल्यावर जसं वाटत असेल तसं वाटायला लागलं. चीनमध्ये दरडोई विजेचा वापर वर्षांला २८८ वॉट आहे. एखादा देश किती प्रगत आहे हे पाहायचं असेल तर देशातील दरडोई विजेचा वापर किती आहे हे पाहावं. अमेरिका, युरोपीय देश, जपान, रशिया, इंग्लंड हे देश दरडोई दरवर्षी अनुक्रमे १४६०, ७००, ८६८, ७८५ व ६६७ वॉट वीज वापरतात. पण आफ्रि केतला चाइ या देशाला दर वर्षी दरडोई केवळ १ वॉटच वीज उपलब्ध आहे. भारतात हाच आकडा ५०.५ वॉट आहे. आपली नद्यांची विपुल जलसंपदा पाहता आपण वीजनिर्मितीच्या क्षेत्रात खूपच मागे आहोत. हे म्हणजे ‘गंगा आली आपल्या दारी’ या उक्तीचा प्रत्यंतर देणारे आहे. मला लोडशेडिंग आणि वीजकपात, बचत या गोष्टींची इतकी सवय झाली होती की भारतातलं चित्र डोळ्यांसमोर तरळलं.
माझ्या देशातला सामान्य माणूस अंधाराच्या पाणवठय़ावर उभा राहून तो अंधार भरून घेतोय. मनातला अंधार रिता करू पाहतोय, पण या घोर तिमिर डोहाच्या काठाशी काळोखाची घागर रिती होतेय की परत ओसंडून वाहतेय तेच त्याच्या लक्षात येत नाही. स्वत:च्या अंतरातले खोल दिवे विझू विझू होणारे! सगळीकडे विजन अंधार.. माझ्या देशातला शेतकरी असा पाण्यासाठी रात्रीच्या अंधारात शेतात दारं धरीत पिकाला पाणी पाजत उभा असलेला! फक्त रात्रीच काही तास वीज असते म्हणून तेवढय़ाच अवकाशात झोप सोडून शेतात उभा! चिखला-पाण्यात रानाची काळजी करीत!
माझ्या देशातला विद्यार्थी भर परीक्षेत वीज नाही म्हणून कंदिलाच्या उजेडात अभ्यास करीत असणारा. माझ्या लाडक्या राज्यातला कारखानदार विजेअभावी मेटाकुटीला आलेला. नवीन उद्योगांची मेढ माझ्या राज्यातून विजेअभावी दुसऱ्या राज्यात! आणि या लोडशेडिंगच्या महाराष्ट्रातल्या कारणाची नोंद झालेली आहे ती अशी - राजकारण्यांच्या द्रष्टेपणाच्या अभावामुळे..