Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नंदकिशोर मुंदडा भाजपच्या वाटेवर?
‘राष्ट्रवादी’ने घेतला धसका
अंबाजोगाई, ६ एप्रिल/वार्ताहर

 

सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री डॉ. विमल मुंदडा यांचे पती नंदकिशोर मुंदडा हे गेल्या दोन वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त आहेत. त्यांना आता भा. ज. प.च्या नेत्यांनी त्यांच्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. श्री. मुंदडा यांनी भा. ज. प.मध्ये प्रवेश केला तर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे त्यांचे उमेदवार जयसिंगराव गायकवाड यांना ३८ हजार मतांचे मताधिक्य केज विधानसभा मतदारसंघात मिळाले होते. याचे श्रेय नंदकिशोर मुंदडा यांच्याकडेच जाते. तसेच डॉ. विमल मुंदडा यांना केज विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आणण्यात नंदकिशोर मुंदडा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र नंदकिशोर मुंदडा यांना राजकारणापासून दूर केले. समर्थकांच्या आग्रहामुळे श्री. मुंदडा हे राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. केजच्या राजकारणात श्री. मुंदडा यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. या मतदारसंघात भा. ज. प.च्या उमेदवाराला हरविण्यात श्री. मुंदडा यांचाच मोलाचा वाटा होता. त्याचमुळे भारतीय जनता पक्षाने श्री. मुंदडा यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी श्री. मुंदडा यांना सापत्नपणाची वागणूक दिली आहे. संघटन कौशल्य आणि ताकद याची जाण आमदार गोपीनाथ मुंडे यांना असल्यामुळे वरिष्ठ पातळीवरून श्री. मुंदडा यांना भारतीय जनता पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ‘राजकारणात काहीही घडू शकते’ अशी प्रतिक्रिया श्री. मुंदडा यांनी व्यक्त केली. मात्र भा. ज. प.मध्ये जाणार की नाही याला दुजोरा दिला नाही.