Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बोर्डीकर वरपूडकरांच्या पाठीशी!
बोरी, ६ एप्रिल/वार्ताहर

 

आघाडीचा धर्म पाळण्याचा निर्णय आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी घेतला आहे! जिंतूर तालुक्यातील ‘मुडा फार्महाऊस’वर खळपूजनाच्या निमित्ताने रविवारी रात्री आमदार बोर्डीकर मित्रमंडळाने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वाच्या भावना जाणून घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.परभणी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांना जिंतूर-सेलू तालुक्यांतून मताधिक्य मिळवून देण्यासाठी आजपासून सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस खासदार तुकाराम रेंगे, उमेदवार वरपूडकर, अंबाजोगाईचे राजेश देशमुख, वसंत शिंदे उपस्थित होते. कार्यकर्त्यांना उद्देशून श्री. बोर्डीकर म्हणाले, ‘‘कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी आजपर्यंत कुठलाच निर्णय घेतला नाही. जिल्ह्य़ात शरद पवार, अशोक चव्हाण यांच्या सभा झाल्या; परंतु मी व्यासपीठावर नव्हतो. जिंतूरला केंद्रीय कृषिमंत्र्यांची सभा झाली. सभेस असलेली उपस्थिती पाहून शरद पवार यांच्या लक्षात जिंतूरची परिस्थिती आली आहे. आपल्या कार्यकर्त्यांकडून तालुक्यात आघाडीचा धर्म पाळला जात नाही, असे परभणी येथे झालेल्या बैठकीत मी पवार यांना सांगितले.’’
‘‘कै. शंकरराव चव्हाण यांनी मला घडविले आहे. त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत. त्यांचेच सुपुत्र अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणूनच या लोकसभेसाठी आपले मतदान वरपूडकरांच्या पदरात टाकायचे आहे,’’ असे सांगून श्री. बोर्डीकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी वरपूडकरांना दिल्लीला पाठविणे काळाची गरज आहे. आम्ही दोघांनी बसून यावर तोडगा काढला आहे. आता मनातला संभ्रम काढून टाका.
पाठिंबा जाहीर झाल्यानंतर लोकसेचे उमेदवार सुरेश वरपूडकर व्यासपीठावर आले. त्यांनी आमदार बोर्डीकर, खासदार रेंगे व कार्यकर्त्यांचे आभार मानले. दरम्यान, लाल दिव्यासाठी बोर्डीकर यांनी वरपूडकर यांना पाठिंबा दिल्याचे मानले जाते. त्यामुळे या निवडणुकीपुरती तरी जिंतूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे.