Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उदगीरमध्ये कचऱ्यापासून कोळसा, बायोगॅसची निर्मिती
माधव मठवाले
उदगीर, ६ एप्रिल

 

शहरातील तळवेस भागात टाकाऊ कचऱ्यापासून कोळसा व बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू झाल्याने अनेकांना रोजगार मिळाला आहे. नगरपालिकेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मार्ग सापडला आहे.
शहरी भागात कचरा ही मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी लातूरच्या जनआधार सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे केला. या संस्थेने तळवेस भागातील काही महिला बचत गटांना सोबत घेऊन टाकाऊ वस्तूंपासून बायोगॅस निर्मिती केली. कचऱ्यातील प्लास्टिक कॅरीबॅगपासून स्वस्त व टिकाऊ तसेच धूता येणारे तक्के, लोड, गाद्या तयार केल्या आहेत. कचऱ्यातील पालापाचोळा, फांद्या आदींपासून कम्पोस्ट खताची निर्मिती केली जात आहे.
गल्लोगल्ली भटकंती करून कचरा गोळा करून आणणाऱ्या मुलांनाही त्या ठिकाणी कचरा विक्री करून आर्थिक लाभ होत आहे. पण कचऱ्यापासून कोळसा कांडी निर्मिती केली जात आहे. या कोळशापासून साधारणपणे एक रुपयात एका वेळचे अन्न शिजविले जाऊ शकते. त्यामुळे काही प्रमाणात इंधनाचा प्रश्न मिटेल, अशी आशा आहे.
महिला बचत गटाच्या माध्यमातून हे काम केले जात असल्याने महिलांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या मोठय़ा प्रमाणात मिटणार आहे.
लातूरच्या जनआधार सेवाभावी संस्थेने राबवत असलेल्या या प्रयोगाला उदगीरचे नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, गटनेते बस्वराज बागबंदे, मुख्याधिकारी भारत राठोड सहकार्य करीत आहेत.