Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

असह्य़ उन्हामुळे राजकीय वातावरण थंडच!
सोनपेठ, ६ एप्रिल/वार्ताहर

 

मतदानासाठी केवळ १० दिवस उरले असले तरी असह्य़ उन्हामुळे निवडणुकीतील राजकीय वातावरण थंडच असल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व बहुजन समाज पक्ष यांच्या उमेदवारांनी मतदारभेटीच्या प्राथमिक फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.
ऐन निवडणुकीच्या धामधुमीतही असह्य़ उन्हामुळे कार्यकर्ते दुपारी नियोजनाच्या बैठका घेणेच पसंत करीत आहेत. जिल्ह्य़ावरून एखादा नेता आला तरच दुपारच्या वेळेला कार्यकर्ते रस्त्यावर दिसून येत आहेत. तिन्ही प्रमुख उमेदवारांनी मतदारांची पहिल्या फेरीत भेट घेतली. यात मतदारांपेक्षा कार्यकर्त्यांशी संपर्क हाच मुख्य हेतू होता. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या युवराजांनी मात्र कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला. सुरेश वरपूडकर यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर दोन दिवसांपूर्वी शहरात आले होते. त्या वेळी त्यांच्या समवेत पक्षाचे सर्व पदाधिकारी होते. शिवसेनेचे उमेदवार गणेश दुधगावकर यांचे चिरंजीव प्रचारासाठी फिरत होते, तेव्हा केवळ शहरप्रमुख व दोन शाखाप्रमुख वगळता एकही लोकप्रतिनिधी किंवा पक्ष पदाधिकारी त्यांच्यासोबत दिसून आला नाही.
दुधगावकर यांनी थेट कार्यकर्त्यांशी आस्थेने संवाद साधल्यामुळे प्रथमच शिवसैनिकांना आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळली. या मैत्रीपूर्ण भेटीमुळे काही दुरावलेले शिवसैनिकही जोमाने कामाला लागल्याचे दिसून आले.