Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार - प्रा. गायकवाड
उमरगा, ६ एप्रिल/वार्ताहर

 

केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व कारखानदार कर्जबाजारी झाले. जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यास शासनच जबाबदार आहे. शेतकरी व कारखानदारांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या व देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळता न येणाऱ्या आघाडी सरकारला मतदारांनी या निवडणुकीत धडा शिखवावा, असे प्रतिपादन उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी केले.
तालुक्यातील कुन्हाळी व कराळी येथे झालेल्या प्रचारसभांमध्ये श्री. गायकवाड बोलत होते. आमदार दयानंद गायकवाड, सोलापूरचे माजी आमदार शिवशरण बिराजदार, बाजार समितीचे सभापती एम. ए. सुल्तान, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बसवराज वरनाळे, शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, भाजपाचे कैलास शिंदे आदी सभेस उपस्थित होते.
श्री. गायकवाड म्हणाले, शासनाच्या नाकर्तेपणामुळे आज देशात एकही माणूस सुखी नाही. काळ्या आईची पोटच्या लेकरावाणी सेवा करणारे शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करीत असून याचा फटका कारखानदारीलाही बसल्याने तेही कर्जबाजारी झाले आहेत. हे सरकार जनतेचे कधीही कल्याण करणार नाही म्हणून या निवडणुकीत मतदारांनी त्यांना गाडण्याची गरज आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी गेल्या ५० वर्षांत स्वत:चा फायदा करून घेतला आहे. देशाच्या संरक्षणाबाबत तर आघाडी सरकार पूर्णपणे असमर्थ ठरले आहे. तुमचे-आमचे संरक्षण करू न शकणाऱ्या या सरकारला खाली खेचण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार दयानंद गायकवाड, माजी आमदार शिवशरण बिराजदार, ज्ञानराज चौगुले, सुधाकर पाटील यांचीही भाषणे झाली.
प्रा. रवींद्र गायकवाडांच्या सर्व ठिकाणी होणाऱ्या जाहीर सभांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.