Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीत एकत्रित काम करण्याचा आघाडीचा संकल्प
औसा, ६ एप्रिल/वार्ताहर

 

गेल्या २७ वर्षांपासूनची निवडणुकीतील पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे निवडणुकीत काम करून संयुक्त आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांना तालुक्यातून आघाडी देण्याचा संकल्प औसा येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत केला. उशिराने का होईना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्याने या लोकसभा निवडणुकीपासून तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत या बैठकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी एकमेकांना दिले.
क्रीडा व भूकंप पुनर्वसन मंत्री दिलीप देशमुख, आमदार जीवनराव गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या लहान-मोठय़ा कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यामुळे लातूर-उस्मानाबाद जिल्ह्य़ांतील राजकीय जाणकारांचे अंदाज फोल ठरले. काँग्रेसचे सहकार मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्रीपती काकडे, माजी आमदार मल्लिनाथ महाराज, माजी उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी नगराध्यक्ष मुजबोद्दीन पटेल, नगराध्यक्ष प्रा. आलुरे, तालुकाध्यक्ष स्वंप्रभा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार किसन जाधव, एन. बी. शेख आदी तालुक्यातील मातब्बर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी केलेल्या भाषणातून गेल्या अनेक निवडणुकांतील पराभवाचे शल्य स्पष्टपणे उमटले.
याप्रसंगी त्र्यंबक झंवर म्हणाले, ज्यावेळी काँग्रेस एकत्रित लढली त्या त्यावेळी विजय मिळाला आहे. माजी आमदार किसन जाधव यांच्या काळापासून काँग्रेस दुभंगली. तेंव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची मालिका सुरू आहे. एन. बी. शेख यांनी ‘गिले शिकवे ना करते हुए, मिलजुलकर काम करना है. इस बार नहीं तो कभी नहीं’चा नारा दिला. यावेळी राष्ट्रवादी
काँग्रेस व काँग्रेसच्या नेते मंडळींनी एकत्रित काम करण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला.