Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ग्रामविकास अधिकारी एम. एन. धावारे बडतर्फ
चाकूर, ६ एप्रिल/वार्ताहर

 

अपहाराचा आरोप ठेवून तालुक्यातील वडवळ (नागनाथ) येथील ग्रामपंचायतीचा ग्रामविकास अधिकारी एम. एन. धावारे याला लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी बडतर्फ केले आहे. रेणापूर, खरोळा येथे असताना त्याने हा अपहार केल्याचा आरोप आहे.
धावारे याने १९९७पासून रेणापूर, खरोळा व हारेवाडी येथील ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला. जवाहर रोजगार योजना, दलित वस्ती सुधार योजना आदींमधील रकमेचा अपहार केला. तक्रारींवरून डॉ. गेडाम यांनी विभागीय चौकशी केली. या विभागीय चौकशीत धावारे यांनी अनेक योजनाच गिळंकृत केल्याचे उघड झाल्यामुळे त्याला बडतर्फ करण्यात आल्याचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तुकाराम नवले यांनी सांगितले. वरील योजनांव्यतिरिक्त धावारे याने रेणापूर ग्रामपंचायतीचा ५४ हजार ९०५ रुपये व खरोळा ग्रामपंचायतीचा ९ हजार ९१६ रुपये ग्रामनिधीही गिळंकृत केला. शिवाय खरोळा येथील दलित वस्ती सुधार योजनेतील २९ हजार ४५८ रुपयांचा अपहारही केला. त्यांच्यावर दोन लाख ९३ हजार ६६२ रुपये अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यापैकी दोन लाख ८० हजार ८६४ रुपये इतकी अपहाराची रक्कम आजवर त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आली आहे, असे श्री. नवले यांनी सांगितले.