Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

स्थिर सरकार देण्याची क्षमता काँग्रेकडेच - खतगावकर
बिलोली, ६ एप्रिल/वार्ताहर

 

देशाचा सर्वागीण विकास व प्रगती व्हायची असेल तर स्थिर सरकारची नितांत गरज असते व असे स्थिर सरकार फक्त काँग्रेस पक्षच देऊ शकतो; त्यामुळे ग्रामीण व शहरी पातळीवर विकास होण्यासाठी काँग्रेस पक्षाला विजयी करा व केंद्रात आपला प्रतिनिधी म्हणून मला मतदान करावे, असे आवाहन भास्करराव पाटील खतगावकर यांनी प्रचार सभांमधून केले. श्री. खतगावकर यांनी आपल्या प्रचारार्थ तालुक्यातील अर्जापूर, बडूर, सगरोळी, केसराळी, बिलोली आदी ठिकाणी सभा घेतल्या.
अर्जापूर येथील सभेत बोलताना श्री. खतगावकर म्हणाले की, देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्य, देशाची अखंडता व एकात्मता कायम ठेवायची असेल तर विभाजनवादी शक्तींना दूर ठेवणे गरजेचे आहे. देशातील सर्वसामान्य माणसाचा विकास आणि समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे काम केवळ काँग्रेस पक्षच करू शकतो. देशासाठी बलिदान करण्याची काँग्रेसची परंपरा आहे.
आपण या भागाच्या विकासासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. विकासाच्या अनेक योजना मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांच्या मदतीने आणल्या, राबविल्या, निराधारांचे, रस्त्यांचे प्रश्न सोडविले. यापुढेही आपली सेवा करण्यासाठी व पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहनसिंग व मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी मतदारांनी मला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन श्री. खतगावकर यांनी केले.
मुस्लिम व दलितांना आवाहन
श्री. खतगावकरांनी वैयक्तिक भेटी व बैठकांवर अधिक भर दिला आहे. बहुजन समाज पक्षाचे मकबूल सलीम यांना मुस्लिम समाजाची व दलितांची मते खाण्यासाठी भारतीय जनता पक्षानेच उभे केले असल्याचा आरोप करून मकबूल सलीम यांच्या भूलथापांना बळी न पडता मुस्लिम व दलितांनी खंबीरपणे काँग्रेसच्या व आपल्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले.
या प्रचारसभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाराव एंबडवार, सुभाष गायकवाड, डी. बी. पाटील होटाळकर, काँग्रेसचे जाकीर चाऊस आदी मंडळी उपस्थित होती.