Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘जाती-धर्माच्या नावावर दंगे पेटविणाऱ्यांचा धंदा बंद पाडा’
परभणी, ६ एप्रिल/वार्ताहर

 

‘‘जे लोक भावनेला हात घालून मतांचा बाजार भरवतात, त्यांना विकास करता येत नाही. जाती-पातीच्या नावावर समाजात विद्वेष निर्माण करून दंगे पेटविणाऱ्यांचा हा धंदा बंद पाडला पाहिजे. घडवायला अक्कल लागते पण मोडायला अक्कल लागत नाही,’’ अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्या प्रचारार्थ श्री. भुजबळ यांची काल रात्री क्रांती चौकात सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार फौजिया खान, नगराध्यक्ष प्रताप देशमुख, विजय भांबळे, विखार लाला, विश्वनाथ थोरे, नानासाहेब राऊत, जिंतूरचे नगराध्यक्ष प्रताप देशमुख, शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, ही निवडणूक देशाचे भवितव्य घडविणारी निवडणूक आहे. भारत आज जगात आपल्या साधन संपत्तीच्या जोरावर ताठ मानेने उभा आहे. जागतिक मंदीचे जगभर पडसाद उमटले, कारखाने बंद पडले, बँका बुडाल्या मात्र भारतावर त्याचा परिणाम झाला नाही याचा अर्थ गेल्या पाच वर्षांत राज्यकर्त्यांनी जी धोरणे आखली ती या देशाला सर्वतोपरी संपन्न करणारी होती. याच काळात समाजातल्या सर्व घटकांच्या कल्याणाचे निर्णय घेतले गेले.
केंद्र सरकारने कर्जमाफीची योजना राबवून या देशातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना दिलासा दिला. या कर्जमाफीतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने पुन्हा वेगळी कर्जमाफी दिली. देशातली अन्न धान्याची कोठारे भरलेली आहेत. गहू, तांदूळ, सोयाबीन उत्पादकांना यावर्षी चांगला पैसा मिळाला. आज शेतकरी, शेतमजूर हे सर्वच घटक समाधानात आहेत, असे श्री. भुजबळ म्हणाले.
त्यांनी वरुण गांधी, नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. हा देश कुठल्याही परिस्थितीत सांप्रदायिक शक्तींच्या ताब्यात जाऊ शकत नाही असे सांगून जाती-पातीत राजकारणासाठी द्वेष निर्माण करणारांचा धंदा बंद करा असे आवाहन केले.
केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करीत श्रीमती खान म्हणाल्या की, या सरकारने आज देशाला महासत्तेच्या वाटेवर आणून ठेवले आहे.
नगराध्यक्ष श्री. देशमुख यांनी परभणीच्या विकासात भुजबळांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला. थोरे, राऊत, राधाजी शेळके, विखार लाला, गुलाम म. मिठ्ठू आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन रमाकांत कुलकर्णी यांनी केले. बंडू पाचलिंग यांनी आभार मानले.