Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आम्हालाच कौल मिळेल

 

स्थिर सरकार, विकास, संरक्षण या तीन प्रमुख मुद्दय़ांवर काँग्रेसने मतदारांना आवाहन करण्याचे ठरविले असून मतदार काँग्रेसच्या बाजूने आपला कौल देतील
जेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार राहिले, तेव्हा पाच वर्षे स्थिर सरकार देता आले. या उलट विरोधी पक्षाच्या सरकारांनी एक अपवाद वगळता पाच वर्षे सलग राज्य करण्याचे कसब दाखविले नाही. विरोधी पक्षाच्या मंडळींना सरकार चालवताच येत नाही; त्यामुळे छोटे मुद्दे काढून आपापसात भांडण करून अस्थैर्य निर्माण करतात. गेल्या पाच वर्षांत मनमोहनसिंग सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, आर्थिक उलाढाल या सर्वच बाबतीत २०२० साली महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. शेतीच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संपूर्ण जगाने तोंडात बोटे घालावीत इतकी प्रगती झाली. अणुकरारामुळे विजेचे उत्पादनही वाढेल व अन्य देशाला वीज पुरवठा करता येईल अशी चांगली स्थिती आपली राहील. संरक्षणाच्या बाबतीतील भारताची सिद्धता जबरदस्त असून नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे भारताकडे तिरक्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत राहणार नाही.
शहरीकरणाचा बकालपणा दूर करण्यासाठी जवाहरलाल नेहरू शहरीकरण योजना हाती घेऊन संपूर्ण देशातील रस्ते विकासाची योजना गतिमान झाली आहे. प्राथमिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. लातूर मतदारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. रेल्वे, विमान सेवा या अत्याधुनिक सोयी उपलब्ध झाल्या आहेत.
लातुरातील मतदार हा जागरुक व समजदार असल्यामुळे या मतदारसंघात पुन्हा काँग्रेसचा उमेदवार मोठय़ा फरकाने विजयी होईल याबद्दल आपल्याला आत्मविश्वास आहे.