Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

फसव्या घोषणांना जनता बळी पडणार नाही

 

विकास, संरक्षण आदी बाबतीत केंद्र सरकारने पुरता भ्रमनिरास केल्यामुळे देशातील जनता पुन्हा काँग्रेसच्या आघाडीला कदापि निवडून देणार नाही. जनता काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवून आपले हात पोळून घेतल्याचा अनुभव घेते आहे. स्वातंत्र्यानंतर जवळपास ५० वर्षे काँग्रेसने देशावर राज्य केले. पाणी, अन्न, निवारा, वस्त्र या मूलभूत सोयी देशवासीयांना न मिळण्याचे सारे पाप काँग्रेस सरकारचे आहे. गरिबांच्या हिताचे सरकार अशी घोषणा गेल्या ४० वर्षांपासून दिली जाते. ‘गरीब हटला मात्र गरिबी हटली नाही! गरीब अधिक गरीबच आणि श्रीमंत सतत श्रीमंत होतो आहे याला काँग्रेस सरकारची धोरणे जबाबदार आहेत. प्रत्येक बाबतीत लोकांची दिशाभूल करण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे. निवडणुकीच्या काळात लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करून निवडणूक जिंकली जाते. आता जनता समजदार झाली आहे. काँग्रेसच्या फसव्या घोषणांना जनता बळी पडणार नाही. निवडणुकीत दिलेली आश्वासने ही कधीच पूर्ण करायची नसतात असे निर्लज्जपणे सत्तेतील मंडळी सांगतात. या मंडळींना या निवडणुकीत जनता कायमची घरी बसवील. महागाई, टिपेला पोहोचली आहे. गरिबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. ग्रामीण व शहरी भागातही निवांतपणे झोप घेता येईल अशी स्थिती राहिली नाही. दहशतवादाने देशात धुमाकूळ घातला आहे असे असताना संरक्षणाच्या बाबतीत सरकारने किती उत्तम कामगिरी केली आहे असे कोणत्या तोंडाने काँग्रेसची मंडळी सांगतात. नाक कापले तरी दोन भोके शिल्लक आहेत असे निर्लज्जपणे सरकारातील मंडळी सांगतात. लातूर मतदारसंघात मागच्या वेळी रूपाताई पाटील यांनी चाकूरकरांचा दारुण पराभव केला होता. या वेळी पुन्हा काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होईल व जयवंत आवळे यांना पुन्हा लातूरला येण्याची गरज भासणार नाही.