Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

केंद्र सरकारने प्रश्नांचे डोंगर उभे केले

 

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या केंद्रातील सरकारने गेल्या पाच वर्षांत प्रश्नांची सोडवणूक न करता प्रश्नांचा डोंगर रचला. त्यामुळे जनता मतपेटीतून आपला राग व्यक्त करील व केंद्र सरकारला धडा शिकवील.
गेल्या पाच वर्षांत आतंकवाद वाढला, कायदा व सुव्यवस्था ढासळली, महागाई शिगेला पोहोचली, आर्थिक मंदीची लाट आली, विजेची टंचाई वाढली, अन्नधान्याचा तुटवडा झाला, सर्व पातळीवर केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी झाले. स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनी स्वत:कडे हौसेने कृषी खाते घेतले. मात्र या राजाला प्रजा आत्महत्या करते आहे याची थोडीशीही काळजी वाटली नाही. सरकारने पाठविलेली मदत वाटेतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींनी हडप केली. कर्जमाफी म्हणजे निव्वळ फसवणूक असून ७१ हजार कोटी रुपये माफ केले असे सरकारातील मंडळी सांगत असले तरी खताचे ९० हजार कोटी रुपयांचे अनुदान काढून घेण्यात आले आहे.
उलट १९ हजार कोटी रुपयांची केंद्र सरकारने फसवणूक केली आहे. स्वस्त धान्य दुकानात वितरित करण्यासाठी केंद्र सरकारने १६ रुपये किलो दराचा सडका गहू आणला आणि गरिबांच्या माथी मारला, हे जनता विसरलेली नाही. जसे देशभर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदार धोबीपछाड देतील तीच बाब लातूर मतदारसंघातही घडेल. मराठवाडय़ावर पश्चिम महाराष्ट्रातील मंडळी अन्याय करतात. याबाबतची ओरड सातत्याने करणाऱ्या काँग्रेसच्या मंडळींना संपूर्ण मराठवाडय़ात लातूर लोकसभेला उभे करता येईल असा उमेदवार सापडला नाही.
तो पश्चिम महाराष्ट्रातून आयात करावा लागला. या उमेदवाराला कोल्हापूरला लातूरची जनता साभार परत पाठवेल व येथील भूमिपुत्राला निवडून देईल.