Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
प्रादेशिक

अपात्रता रद्द झाल्याने येवल्याच्या नगराध्यक्षपदी पुन्हा दरडे
मुंबई, ६ एप्रिल/प्रतिनिधी

बेकायदा बांधकामाच्या मुद्दय़ावरून येवल्याचे नगराध्यक्ष रामदास भिकाजी दरडे यांना दूर करून त्यांना पुढील सहा वर्षे नगरपालिकेची निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरविणारा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नगरविकास खात्याचे मंत्री या नात्याने दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केल्याने दरडे यांना पुन्हा नगराध्यक्षपद बहाल होईल व ते नगरपालिकेची पुढची निवडणुकही लढवू शकतील.

सक्तीने कामावर ठेवलेल्या सरकारी डॉक्टरला स्वेच्छानिवृत्ती
मुंबई, ६ एप्रिल/प्रतिनिधी

रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील एक वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण ईश्वरा गवळी यांनी वर्षभरापूर्वी स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेल्या अर्जावर नियमानुसार तीन महिन्यांत निर्णय न घेता त्यांना सक्तीने सेवेत ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) बेकायदा ठरवून रद्द केला असून डॉ. गवळी गेल्या वर्षीच्या १ जूनपासून सरकारी सेवेतून स्वेच्छानिवृत्त झाल्याचे जाहीर केले आहे.

मद्यपि चालकांवरील कारवाईमुळे वकिलांची चांदी
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

मद्यपि चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत आठवडय़ाला सरासरी दोनशे ते अडीचशे चालक न्यायालयाने सजा ठोठावल्यामुळे थेट तुरुंगात जात आहेत. परंतु यापैकी ज्या चालकांनी वकील केला आहे त्यांना कमी सजा भोगावी लागत आहेत. परिणामी अशा पद्धतीने गुन्हा करणारे आता वकिलांच्या शोधात असल्यामुळे वकिलांनी आपली फी तांगलीच वाढविली आहे. .

परप्रांतीय मजुरांना कामाचा परवाना; निवडणुकीच्या काळात नवा वाद!
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

परप्रांतीयांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रणिशग फुंकलेले असतानाच आता शिवसेनेनेही परप्रांतीय मजुरांना मुंबईत कामाचा परवाना बंधनकारक केला पाहिजे, अशी मागणी केली असून पालिका सभागृहात तसा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर लवकरच चर्चा होणार आहे. निवडणुकीच्या काळातच हा प्रस्ताव चर्चेसाठी येत असल्याने या प्रस्तावाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा वायकरच!
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेची आर्थिक नाडी असणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्षपद सलग चौथ्यांदा रवींद्र वायकर यांना देण्याचा निर्णय शिवसेना कार्याध्यक्ष उद्वव ठाकरे यांनी घेतला आहे. शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांनी या पदाची इच्छा व्यक्त केली होती, मात्र ‘मातोश्री’ वायकरांवरच मेहरबान झाल्याने हे अतिशय महत्वाचे पद चार वेळा पटकाविण्याचा वायकर विक्रम करणार आहेत.

‘म्हाडा’तील मुख्य वास्तुरचनाकाराच्या पदासाठी बिल्डरांमार्फत प्रयत्न?
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाचा टप्पा सुरू झालेला असतानाच विद्यमान प्रभारी मुख्य वास्तुरचनाकार रावळे हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होत असल्याने नव्या वास्तुरचनाकारासाठी म्हाडाने जाहिरात प्रसिद्ध केली असली तरी म्हाडातील एक वास्तुरचनाकार सेवाज्येष्ठता डावलून हे पद आपल्या पदरी पडावे, यासाठी काही बिल्डरांमार्फत जोरदार प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. पुनर्विकासाच्या कामकाजात म्हाडातील वास्तुरचनाकार महत्त्वाची भूमिका बजावीत असल्याने या पदावर हुशार आणि बिल्डरांच्या दबावाला न जुमानणारी व्यक्ती हवी.

तिरुपतीवारीत म्हाडा-गृहनिर्माण विभागातील सव्वाशे अधिकारी!
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

दक्षिण मुंबईत विकास नियंत्रण नियमावाली ३३ (७) अंतर्गत जुन्या इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या एका बिल्डरकडून ४०० सरकारी अधिकाऱ्यांना २००८ मध्ये घडविलेल्या तिरुपतीवारीत म्हाडा आणि गृहनिर्माण विभागातील सुमारे सव्वाशे अधिकारी असल्याचा अहवाला दक्षता विभागानेच तयार केला आहे. म्हाडातील दक्षता विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४० हून अधिक अधिकाऱ्यांची नावेदेखील चौकशीत बाहेर आली आहेत.

मुंबईत उत्तर भारतीय मुस्लिम उमेदवारांची काँग्रेसच्या तीन उमेदवारांना डोकेदुखी
मुंबई, ६ एप्रिल/प्रतिनिधी

गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहापैकी पाच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी हक्काचे मुस्लिम मतदार डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. बसपा व सपाने दिलेल्या तगडय़ा उमेदवारांमुळेच काँग्रेसच्या गुरुदास कामत, प्रिया दत्त व मिलिंद देवरा यांच्यापुढे फार मोठे आव्हान उभे ठाकले नसले तरी बसपा, सपाचे उमेदवार काँग्रेसला दुर्लक्षिता मात्र येणार नाहीत, असे चित्र स्पष्ट होते आहे.

‘म्हाडा’तील मुख्य वास्तुरचनाकाराच्या पदासाठी बिल्डरांमार्फत प्रयत्न?
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाचा टप्पा सुरू झालेला असतानाच विद्यमान प्रभारी मुख्य वास्तुरचनाकार रावळे हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होत असल्याने नव्या वास्तुरचनाकारासाठी म्हाडाने जाहिरात प्रसिद्ध केली असली तरी म्हाडातील एक वास्तुरचनाकार सेवाज्येष्ठता डावलून हे पद आपल्या पदरी पडावे, यासाठी काही बिल्डरांमार्फत जोरदार प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. पुनर्विकासाच्या कामकाजात म्हाडातील वास्तुरचनाकार महत्त्वाची भूमिका बजावीत असल्याने या पदावर हुशार आणि बिल्डरांच्या दबावाला न जुमानणारी व्यक्ती हवी.

'परमानन्द माधवम्' चरित्रग्रंथाचे आज डोंबिवलीत प्रकाशन
मुंबई, ६ एप्रिल/प्रतिनिधी

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात चांपा येथे ६० च्या दशकात सुरू करण्यात आलेल्या भारतीय कुष्ठ निवारक संघाचे संस्थापक सदाशिव गोविंद कात्रे तथा कात्रे गुरूजी यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या 'परमानन्द माधवम्' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश तथा भय्याजी जोशी यांचे हस्ते मंगळवारी डोंबिवलीत होत आहे. भारतीय कुष्ठ निवारक संघाचे संरक्षक दामोदर गजानन बापट याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. भय्याजी जोशी यांच्या हस्ते कल्याणजवळच्या हनुमाननगर कुष्ठरुग्ण वसाहतीत प्रदीर्घ काळ कार्य करणाऱ्या गजानन माने यांचा सत्कार करण्यात येणार असून याच वसाहतीत राहून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या कुष्ठमुक्त पालकांच्या पाल्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डोंबिवली (पू.) येथील शास्त्रीनगर सभागृहात सायंकाळी ६ वा. हा कार्यक्रम होणार आहे. निगडी प्राधिकरण क्षेत्राचे संघचालक गिरीश आफळे याप्रसंगी अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहणार आहेत. मूळ हिंदी पुस्तकाचा अनुवाद तसेच मराठी आवृत्तीसाठी मूळ संहितेचा विस्तार करण्याचे काम सुधीर जोगळेकर यांनी केले आहे.

सिग्नलमधील बिघाडाने हार्बर रेल्वे विस्कळीत
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

सिग्नल नादुरुस्त झाल्याने आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे दुपारी उशिरापर्यंत लोकलमधील गर्दीने प्रवाशी बेहाल झाले. सकाळी सव्वादहा वाजता वाशी स्थानकाजवळ तीन सिग्नलमध्ये अचानक बिघाड झाला. दोन्ही दिशांच्या गाडय़ा त्यामुळे जागीच उभ्या राहिल्या. सिग्नल यंत्रणेतील दोष दूर केल्यानंतर सुमारे अध्र्या तासानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र तोपर्यंत वेळापत्रक पूर्णत: विस्कळीत झाले. लोकल सुमारे २०-२५ मिनिटे उशिराने धावत होत्या. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने लोकलमध्ये प्रचंड गर्दी उसळली होती.

वरळी दुग्धशाळेत वायू गळतीने कामगाराचा मृत्यू
मुंबई, ६ एप्रिल / प्रतिनिधी

वरळी दुग्ध शाळेत आज वायू गळती होऊन शांतवन गणपत शिंदे (५५) या कामगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे दुग्धशाळेच्या दूध थंड व हवाबंद करायच्या खात्यात कार्यरत होते. रविवारी त्यांची रात्रपाळी होती. आज सकाळी इतर कामगार जेव्हा कामावर आले त्या वेळी त्यांना शिंदे बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आले. त्यांनी शिंदे यांना के.ई.एम. रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वायूगळतीचे कारण अद्याप समजून आलेले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.