Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

नगर लोकसभा मतदारसंघात सोमवारी एका पाठोपाठ एक पाच सभा घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील दमले की नाही माहिती नाही. त्यांचे हेलिकॉप्टर मात्र सायंकाळी इंधनासाठी नगरला आले. एका टेम्पोतून आणलेले इंधन पाईपद्वारे हेलिकॉप्टरमध्ये भरण्यात आले.

नगर शहरात आता साडेतीन तास वीजकपात
ग्रामीण भागात साडेदहा तास

नगर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

शहर व ग्रामीण भागातील वीजकपात आजपासून अनुक्रमे पाऊण व अर्धा तासाने कमी झाली. नगर शहरात आता फक्त साडेतीन तास, तर ग्रामीण भागात साडेदहा तास वीजकपात केली जाणार आहे. केंद्रीय वीजनिर्मिती प्रकल्पातून राज्याला कमी वीज मिळत होती. गेल्या काही दिवसांपासून राज्याला या केंद्रातून अधिक वीज मिळू लागली आहे. त्यामुळे महागाऐवजी स्वस्त, वाढीव वीज मिळाल्याने कपातीची वेळ कमी करण्यात आली. त्यानुसार २५ हजारांवर लोकसंख्येच्या गावात (शहरात) पाऊण तास, तर त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात अर्धा तास कपात कमी केली आहे.

अप्पासाहेब ढूस यांच्या साहसाची नोंद ‘लिम्का बुक’मध्ये
नगर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

देवळाली प्रवरा येथील साहसीवीर अप्पासाहेब भीमराज ढूस याची पहिला भारतीय गैरसैनिकी स्कायडायव्हर म्हणून ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अप्पासाहेबने श्रीलंका ते भारत अंतर हनुमान उडी घेऊन पूर्ण करण्याचा संकल्प सोडला आहे. ही मोहीम देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मिशन श्रीलंका रिटर्नसाठी अप्पासाहेबने एप्रिल ०८मध्ये दुबई येथे जाऊन सुमारे १२ हजार फूट उंचावरून विमानातून उडी घेण्याचे प्रशिक्षण घेतले.

शुभकारक घुबड!
खेळाच्या मैदानावर भांडण झालेले दोन विद्यार्थी आपापली कैफियत मांडण्यासाठी माझ्याकडे आलेले होते. दोघेही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते. पैकी एकाची तक्रार होती की दुसरा विद्यार्थी त्याला ‘उल्लू का पठ्ठा’ असे म्हणाला होता व दुसरा विद्यार्थी मला सांगत होता की सर तो मला ‘घुबड’ असे म्हणाला. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ‘उल्लू का पठ्ठा’ व ‘घुबड’ या दोन्ही संबोधनांचा अर्थ एकच होतो. ‘घुबड’ या प्राण्याच्या स्वभाववैशिष्टय़ानुसार ही संबोधने वापरली जात असावीत.

तीनशे केंद्रांवर मतदानाचे व्हिडिओ चित्रण
नगर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

निवडणूक आयोगाने दिलेल्या ५ विविध निकषांमध्ये जिल्ह्य़ातील ३ हजार ४४५ मतदानकेंद्रांपैकी २९७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी मतदान प्रक्रियेचे पूर्ण दिवसभर व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी कुंदनकुमार सोनवणे या वेळी उपस्थित होते.

नगरमध्ये ३, तर शिर्डीत १०जणांचे अर्ज छाननीत बाद
नगर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

शिर्डी मतदारसंघात १०जणांचे, तर नगर मतदारसंघात ३जणांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले. शिर्डीमध्ये २६, तर नगरमध्ये २० उमेदवारांचे अर्ज ग्राह्य़ धरण्यात आले आहेत. अर्ज बाद झालेल्यांमध्ये नगर मतदारसंघात क्रांतिसेनेचे कृषिराज टकले व शिर्डी मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे रघुनाथ आंबेडकर वगळता इतर सर्व अपक्ष आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी दि. ८ एप्रिलला दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. उद्या (मंगळवारी) महावीर जयंतीची सुटी असल्याने निवडणूक कार्यालय बंद राहील. दि. ८लाच दुपारी दोन्ही मतदारसंघांतील अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.

----------------------------------------------------------------------------

पक्षाला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना जागा दाखवून द्या - पाटील
कर्जतला काँग्रेसची मंडळी गैरहजर

कर्जत, ६ एप्रिल/वार्ताहर

ज्यांना पक्षाने सर्व दिले त्यांनी पक्षाला वाऱ्यावर सोडले. जनतेला कधी सोडून देतील ते सांगता येणार नाही, अशी टीका करून अपक्ष व हत्तीवर स्वार झालेल्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी येथे केले.
राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित सभेत श्री. पाटील बोलत होते. जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, संदीप वर्पे, प्रवीण घुले, शारदा लगड, राजेंद्र फाळके, राजेंद्र निंबाळकर, नामदेव राऊत, सुनील शेलार, अशोक जायभाय, संभाजीराजे भोसले, भारती जेवरे, विजय मोढळे आदी उपस्थित होते. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष रामभाऊ धांडे, अंबादास पिसाळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते सभेला उपस्थित नव्हते.

..आता मुंडेंची चर्चा
गेले पंधरा दिवस जिल्ह्य़ात विखे काय करणार, भोस-नागवडे काय करणार, थोरातसमर्थक काय करणार अशी काँग्रेसअंतर्गत कुरबुरींची चर्चा सुरू होती. ती थांबली असे नाही. मात्र, आता मुंडे काय करणार याचीही चर्चा सुरू झाली असून, त्यामुळे भाजपमध्येही अस्वस्थता दिसते.
जिल्ह्य़ाच्या राजकारणाला कधी नव्हे, ते एवढे पदर प्राप्त झाले आहेत. पक्षागणिक आणि व्यक्तिगणिक स्थित्यंतरे दिसू लागली आहेत. बालेकिल्ला ही काँग्रेसच्या मागे तयार झालेल्या बिरुदावलीची वीण आता सैल होऊ लागली आहे. अलीकडच्या दहा वर्षांत ही प्रक्रिया सुरू झाली. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ती सैल होताना दिसते.

विरोधात जाणाऱ्यांनी पक्षातून चालते व्हावे - गडाख
नेवासे, ६ एप्रिल/वार्ताहर

इतर नेत्यांप्रमाणे आम्ही राजकारणाचे मार्केटिंग करीत नाही. शरद पवारांसाठी व मराठी माणसांसाठी कार्यकर्त्यांनी शिर्डीत रामदास आठवले व नगरमध्ये शिवाजी कर्डिले यांचे काम करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले. विरोधात जाणाऱ्यांनी संघटनेतून चालते व्हावे, असा सज्जड दमही त्यांनी भरला. शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत श्री. गडाख बोलत होते. बैठकीस उमेदवार रामदास आठवले, माजी आमदार पांडुरंग अभंग, रिपब्लिकन पक्षाचे अशोक गायकवाड, तालुकाध्यक्ष सादिक शिलेदार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामभाऊ जगताप उपस्थित होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे हे मात्र अनुपस्थित होते.

सदोबाला दृष्टांत!
आता पाळी सदोबा नगरकराची होती. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्याला चक्क दोघांनी दृष्टांत दिला. उत्तमशेठ बोगावत आणि कानवडे पाटील हे अनुक्रमे नगर आणि कोपरगावचे पहिले (सन १९५२) खासदार. या दोघांचाही सध्या सदोबाच्या अवती-भवती वावर आहे. राष्ट्रपित्याच्या दृष्टांताने मुन्नाभाई आणि छत्रपतींच्या दृष्टांताने डी. एम. भोसले भारावून गेले, झपाटले होते. येथे तसे झाले नाही. सदोबा निर्विकार होता.

तरुणांचे स्थलांतर थांबवावे
चेहरामोहरा बदलून मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर नेणारा खासदार असावा. गेल्या अनेक वर्षांत उत्तरेच्या प्रमाणात नगर दक्षिण मतदारसंघ दुर्लक्षित, अविकसित राहिलेला आहे. प्रगतीचा हा अनुशेष नव्या खासदाराने भरून काढावा. मतदारसंघात पिंपळगाव माळवी, मेहेराबाद, मोहटादेवी, चांदबिबीचा महाल, भुईकोट किल्ला असे कितीतरी ऐतिहासिक, धार्मिक व सुंदर ठिकाणे आहेत. या ठिकाणांचा विकास करून पर्यटनाचे मुख्य केंद्र म्हणून नगरला ओळख मिळवून देता येईल. आजपर्यंतच्या खासदारांच्या अपयशामुळे रेल्वेमार्गाचा विस्तार होऊ शकलेला नाही. आरोग्य, शिक्षण, उद्योग, सांस्कृतिक वातावरण या बाबतीत मतदारसंघ मागासलेला आहे. जिल्हा रुग्णालयाचा अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बदल घडवून आणावा. जेणेकरून गरिबांच्या उपचाराची मोफत सोय होईल. केंद्राच्या निधीतून रस्ते, एमआयडीसी, शहर सुशोभीकरणाची कामे व्हावीत. नगर शहरात आजही हागणदारीमुक्तीची चळवळ राबविण्याची गरज आहे, तर ग्रामीण भागाचे काय? शहरात मोठय़ा प्रमाणावर सार्वजनिक शौचालये ही खासदार निधीतून उभी राहावीत. लोणीच्या धर्तीवर दक्षिणेत शिक्षण केंद्र विकसित करावे. केंद्राच्या सर्व खात्यातील अधिकाधिक निधी आणून मतदारसंघाचे रुप बदलावे. उद्योगांचा विकास खुंटल्याने तरुण पिढी नगर सोडून जाते आहे. त्यांचे स्थलांतर थांबवावे; अन्यथा मतदारसंघात फक्त वृद्ध, गुंड व राजकीय पुढारीच उरतील. मतदारसंघाच्या उज्ज्वल भवितव्याची चाड असलेली व्यक्तीच खासदार म्हणून निवडून यावी.

उमेदवारी मागे घेणार नाही - राजळे
शेवगाव, ६ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेचे अपक्ष उमेदवार आमदार राजीव राजळे यांनी काल दिवसभर आपल्या समर्थकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. शहरातही प्रमुख राजकीय कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी मोठय़ा प्रमाणात होणार असल्याची गणिते मांडली जात आहेत. अनेक इंदिरा काँग्रेसनिष्ठ कार्यकर्तेही या वेळी उपस्थित होते. माझी उमेदवारी जनतेने लादलेली उमेदवारी असून, कोणत्याही दबावापुढे झुकण्याचा अथवा उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मतदारसंघात जबरदस्तीने लादलेली उमेदवारी हटवण्यासाठी माझी उमेदवारी आहे. तसेच राजकीय पक्षांना लोकसभेत प्रश्न मांडणारा चांगला वकील नको असतो. त्यांना ‘मौनी’ खासदार लागतात, असे विचार त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आपल्या उमेदवारीस राष्ट्रवादी-भाजपसह अनेक ठिकाणांहून पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले. शेवगाव-पाथर्डी तालुक्यांतून प्रचंड मताधिक्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या उमेदवारीस जनतेचा आशीर्वाद असल्याचे श्री. राजळे यांनी आवर्जून सांगितले. आपली उमेदवारी निवडून येण्यासाठीच असून, मतदारसंघाच्या सर्व प्रश्नांची आपणास जाणीव असून, राजकीय पर्याय देण्यासाठी मी निवडणुकीस उभा आहे, असे त्यांनी सांगितले.

शिरसाठ यांच्या प्रचारासाठी अमरापूरला गुरुवारी मेळावा
शेवगाव, ६ एप्रिल/वार्ताहर

नगर मतदारसंघातील डाव्या आघाडीचे उमेदवार का. वा. शिरसाठ यांच्या प्रचारार्थ येत्या गुरुवारी (दि. ९) अमरापूर येथे सकाळी ९ वाजता शेवगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी पक्षाचे राज्य सचिव मंडळाचे सदस्य व किसान सभेचे सचिव नामदेवराव गावडे (कोल्हापूर), नारायण घागरे (मुंबई) उपस्थित राहणार आहेत. शिरसाठ यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील कार्यकर्ते कामास लागले असून, मेळाव्यात तालुक्यात होणाऱ्या सभांचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रचारासाठी गोविंद पानसरे व डॉ. भालचंद्र कांगो तालुक्यात सभा घेणार आहेत.

मतलबी मंडळींचा पर्दाफाश करू - तुकाराम गडाख
शेवगाव, ६ एप्रिल/वार्ताहर

जिल्ह्य़ाच्या व इतर राजकारणात अनेकांना आपण सक्रिय मदत केली. परंतु या मंडळींना त्याची जाणीव उरली नाही. हत्तीचा झंझावात सुरू झाल्यावर सगळ्याच पातळीवर मतलबी मंडळींचा पर्दाफाश करू, असा इशारा खासदार तुकाराम गडाख यांनी दिला. गडाख म्हणाले की, मतदारसंघात सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी आपला संपर्कअसून शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची व सहानुभूतीदारांची मोठी संख्या आहे. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. बहुजन समाज पक्ष हा खरा निधर्मी व सामाजिक अभिसरणावर विश्वास ठेवणारा पक्ष असून, इतरांप्रमाणे केवळ व्यासपीठावर निधर्मी गप्पा मारणारा पक्ष नाही. पक्षाच्या नेत्या मायावती यांनी सर्व जाती-धमार्ंच्या लोकांना समान राजकीय संधी व व्यासपीठ उपलब्ध करून सत्तेत सहभागी होण्याची संधी दिली. हा खरा सामाजिक समतेचा ऐतिहासिक प्रयोग त्यांनी केला. ही विचारसरणी स्वीकारून आपण मतदारांना सामोरे जात आहोत. बसपाच्या राजकीय विचारांमुळे मतदारसंघातील दलित-मुस्लिम, इतर मागासवर्गीय व बहुजन समाज या पक्षाकडे आकर्षित होत असून, या सुप्त लाटेचा फायदा राजकीय परिवर्तनासाठी होणार आहे. आपण आपल्या राजकीय जीवनात अनेक संघर्ष केले. सर्वसामान्यांनी आपल्याला नेहमीच ताकद दिली. या वेळीही तसेच घडणार यात शंका नाही, असेही ते म्हणाले.

चुकीच्या उच्चाराने करमणूक
शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी नेवाशात बैठक झाली. सध्या मतदारसंघात अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. उमेदवार आठवले ठिकठिकाणच्या सभांमध्ये हा मुद्दा खोडून काढत आहेत. या बैठकीत एकूण नऊ कार्यकर्त्यांची भाषणे झाली. सर्वानी या मुद्याला हात घातला. यातील चौघे ‘अ‍ॅट्रॉसिटी’ हा शब्दच चुकीचा उच्चारत होते. त्यातील दोघांना आपली चूक लक्षात येऊनही ते चुकीचाच शब्द उच्चारत होते. त्यामुळे उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.

----------------------------------------------------------------------------

गांधी यांच्या प्रचाराचा आज नगरमध्ये प्रारंभ
नगर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

भाजपचे नगर मतदारसंघातील उमेदवार दिलीप गांधी यांच्या शहरातील प्रचाराची सुरुवात उद्या (मंगळवारी) सायंकाळी ५ वाजता विशाल गणपती माळीवाडा येथून होणार आहे. पक्षाचे शहराध्यक्ष अनंत जोशी यांनी ही माहिती दिली. स्वत गांधी यांच्यासह आमदार अनिल राठोड, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, तसेच सेना-भाजपचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी या वेळी उपस्थित असतील. विशाल गणपतीच्या पूजेनंतर लगेचच माळीवाडा व परिसरात प्रचारफेरी होणार आहे. शहरातील प्रचाराचे २१ एप्रिलपर्यंत नियोजन करण्यात आले असून, रोज सकाळी ९ ते दुपारी १ व सायंकाळी ५ ते रात्री १०पर्यंत शहरातील प्रत्येक घरी जाऊन गांधी यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, असे जोशी यांनी सांगितले. दरम्यान, उद्या सकाळी ११ वाजता गांधी यांच्या केशरगुलाब संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्य़ातील दोन्ही मतदारसंघांतील प्रचार कार्यक्रमाचे नियोजन मेळाव्यात होईल. आमदार राठोड मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.

जीपमध्ये पळवून विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न, एकास अटक
कोपरगाव, ६ एप्रिल/वार्ताहर

प्रातर्विधी उरकून घरी परतत असताना एका विवाहितेस बळजबरीने जीपमध्ये बसवून तिच्यावर बलात्कार करण्याचा दोघांनी प्रयत्न केला. हा प्रकार सावळीविहीर ते झगडे फाटय़ादरम्यान आज पहाटे ३ वाजता घडला. तिच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी एका आरोपीस अटक केली. राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे एका विवाहितेस पहाटे तीन वाजता आरोपी माणिक भास्कर खरात (राहणार ब्रँच चारी, डाऊच शिवार) व पिन्या आव्हाड (तीन चारी, कोकमठाण शिवार, ता. कोपरगाव) या दोघांनी जीपमध्ये (क्रमांक ६५९५) बळजबरीने बसवून सावळीविहीर ते झगड फाटय़ादरम्यान आरोपी माणिक खरात याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. झगडे फाटय़ाजवळ ही विवाहित महिला जीपमधून पळून जाताना आरोपींनी जीपसह तिचा पाठलाग करून तिला धडक मारून जबर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी माणिक खरात यास अटक केली. पिन्या आव्हाड फरारी आहे. पुढील तपास एस. व्ही. अपशेटे करीत आहेत.

सावंत यांच्या प्रकृतीची अधिकाऱ्यांकडून विचारपूस
उपोषण सुरूच, निघोज, ६ एप्रिल/वार्ताहर

संत निळोबाराय देवस्थानची बदनामी केली म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माफी मागावी, यासाठी पिंपळनेर येथे अशोक सावंत यांनी सुरू केलेले उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच होते. दिवसभरात अधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून सरकारला अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले. तीन दिवस सावंत यांच्याकडे सरकारी अधिकारी न फिरकल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. आज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सावंत यांची तपासणी केली. तीन दिवसांत वजन साडेचार किलो घटले आहे. साखरेचे प्रमाण कमी झाल्याने अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांचे रक्त तपासणीसाठी नगर येथे पाठविले असून, अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. काल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी सावंत यांची भेट घेतली. चर्चेचा तपशील समजू शकला नाही. परिसरातील अनेक गावांनी उपोषणाला पाठिंबा दिला.

वन्यपशूंची पाण्यासाठी भटकंती
राहुरी, ६ एप्रिल/वार्ताहर

या महिन्याच्या प्रारंभीच उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातील वन्यपशूंची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असून, अनेक ठिकाणी वनतळी कोरडीठाक पडली आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात वांबोरीकडील कातड्र, गुंजाळे, डोंगरगणकडील मोठा भाग, तसेच पश्चिम डोंगराळ भागातील बऱ्याचशा भागात अनेक वर्षांपासून वन्यपशूंचे वास्तव्य आहे. गवत, चारा, भक्ष्याबरोबरच वन विभागाने तयार केलेल्या वनतळ्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी ते आसरा घेतात. तालुक्यातील या भागामध्ये बिबटय़ाबरोबरच हरीण, ससे, तरस, लांडगे, मोर, कोल्हे, ऊंट, मांजराची संख्या लक्षणीय आहे. वन विभागाने या भागामध्ये पर्यावरण राखण्यासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाबरोबरच वन्यपशूंची तहान भागविण्यासाठी वनतळी तयार केली आहेत. वांबोरी, कातड्र, गुंजाळे, वावरथ, जांभळी, कोळेवाडी, शेरी, चिखलठाण या भागांमध्ये असलेली वनतळी मात्र कोरडी पडली आहेत.

उद्दिष्टापेक्षा ४० लाखांची अधिक वसुली
संगमनेर वीज विभागांतर्गत राहाता उपविभाग प्रथम
राहाता, ६ एप्रिल/वार्ताहर

वीजबिल वसुलीच्या दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ४० लाख रुपये अधिक वसुली करून राहाता वीज वितरण उपविभागाने संगमनेर विभागांतर्गत प्रथम क्रमांक पटकाविला. मार्चअखेर उपविभागाचे १ कोटी ५५ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. मात्र, १ कोटी ९५ लाख रुपये वसूल करून राहाता उपविभागाने प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे उपविभागाचे सहायक अभियंता वाय. आर. राणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अधीक्षक अभियंता दिलीप पडळकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या कामी संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बडे यांनी या उपविभागाचे पालकत्व स्वीकारले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता राणे यांनी सहकाऱ्यांसह ग्राहकांपर्यंत थेट जाऊन बिल भरण्याविषयी जनजागृती केली. गावोगाव जनजागृती झाल्याने वसुलीचे उद्दिष्ट साध्य झाले. राहाता उपविभागांतर्गत राहाता शहर कक्ष अभियंता प्रदीप देहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष वसुली अभियान राबविण्यात आले. वीजबिलाबाबतच्या तक्रारी जागेवरच मिटवून देऊन ग्राहकांची बिले वसूल करण्यात आली. या विशेष वसुली कामगिरीबद्दल शहर अभियंता देहरकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पडळकर, कार्यकारी अभियंता बढे व राणे यांनी अभिनंदन केले आहे.

वीस वर्षे जिल्ह्य़ाचा विकास खुंटला - राजळे
वाडेगव्हाण, ६ एप्रिल/वार्ताहर

वीस वर्षांपासून या मतदारसंघात योग्य उमेदवार न मिळाल्याने विकास झाला नाही. आपल्याला खासदारकी मिळाली, तर शेतकऱ्यांचा पाण्याचा, रोजगाराचा व दळणवळणाचा प्रश्न सोडवू, असे अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांनी पारनेरच्या प्रचारदौऱ्यात सांगितले. आज राजळे यांनी पारनेर तालुक्यात वडझिरे, सुपे येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी रांजणगाव, नारायणगव्हाण, वाडेगव्हाण, जवळे या परिसरातील विखे समर्थकांच्या, विविध पक्षांतील नेत्यांच्या, तसेच मतदारांच्या भेटी घेतल्या. ते म्हणाले की, जिल्ह्य़ात अपक्ष असूनही मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराज माझ्या मागे आहेत. जिल्ह्य़ातील कोणी माझ्या प्रचारास आले नाही, तरी राज्यातील नेते येतील. पारनेर तालुक्याला कुकडीचे पाणी मिळते. परंतु ते उचलता येत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. सर्वच शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करीन, असे त्यांनी सांगितले. राजळे यांच्याबरोबर दादासाहेब पठारे, माजी सभापती गंगाराम बेलकर, हरिभाऊ पवार, मुरली पवार आदी उपस्थित होते.

रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची महाआरतीने सांगता
नगर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

मेणबत्त्या प्रज्ज्वलित करून महाआरतीने केडगावला सुरू असलेल्या रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता झाली. स्पंदन प्रतिष्ठानतर्फे सात दिवस हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
या वेळी बोलताना रामराव ढोकमहाराज म्हणाले की, जगात सज्जन संघटित होत नसल्यानेच सर्वत्र दुर्जनांचा प्रभाव आहे. दुर्जनांचा नाश करण्यासाठी सर्व सज्जनांनी एकत्र यावे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कोतकर यांनी युवकांना संघटित करून समाजात एकता, बंधूभाव जपण्याचे काम प्रतिष्ठानतर्फे करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या वेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नगर बाजार समितीचे सभापती भानुदास कोतकर, जिल्हा बँकेचे संचालक संपतराव म्हस्के उपस्थित होते. माजी महापौर संदीप कोतकर यांनी आभार मानले.

‘भुलाबाईची गाणी’मध्ये स्त्रीजीवनाचा वेध - बुलबुले
नगर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

‘भुलाबाईची गाणी’ हा लोकगीतांचाच प्रकार असून, त्यामध्ये स्त्रीजीवनाचा वेध घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन यशदा संस्थेचे जिल्हा प्रशिक्षण समन्वयक व साहित्यिक प्रा. विठ्ठल बुलबुले यांनी केले. दिल्ली गेट येथील संकल्प अकादमीच्या सेमिनार हॉलमध्ये झालेल्या बचतगटातील महिलांच्या शिबिरात प्रा. बुलबुले बोलत होते. या वेळी त्यांच्या हस्ते अमरावतीचे कवी सुधीर केने यांनी लिहिलेल्या ‘भुलाबाईची गाणी’ या संकलित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. अशोक पवार म्हणाले की, मौखिक परंपरेने वर्षांनुवर्षे एका पिढीकडून दुसऱ्या-तिसऱ्या पिढीकडे ही गाणी आली. हे सर्व संकलित करण्याचे अवघड काम प्रा. केने यांनी केले. प्रा. केने यांनी पुस्तकनिर्मितीची कहाणी सांगून त्यातील निवडक गाणी गाऊन दाखवली. याप्रसंगी बार्शीचे तत्त्वज्ञानाचे अभ्यासक विवेक जाधवर, संतोष फाफाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती चांदेकर यांनी केले.

शेतीच्या वादातून मारहाण, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा
नगर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

शेतीच्या वादावरून तिघांना काठय़ा-कुऱ्हाडीने बेदम मारहाण करण्यात आली. नगर तालुक्यातील मेहेकरी शिवारात दुपारी हा प्रकार घडला. तालुका पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अशोक नाथा बेरड (वय ३२, मेहेकरी) यांनी फिर्याद दिली. बेरड हे शेळ्या चारावयास शेतातून जात असताना तिघांनी येऊन आमच्या शेतात शेळ्या घेऊन का आलास, या कारणास्तव काठय़ा-कुऱ्हाडीने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीत बेरड, त्यांची पत्नी व आई जखमी झाल्या. तिघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी मारहाणप्रकरणी मुरलीधर पालवे, नवनाथ ऊर्फ नाथू मुरलीधर पालवे, शकुंतला मुरलीधर पालवे या तिघांविरुद्ध घातक शस्त्राने मारहाण, तसेच जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

‘गडाख यांना मते मागण्याचा अधिकार नाही’
नगर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

खासदार तुकाराम गडाख यांनी सच्चर समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कसलेही प्रयत्न केले नाहीत. त्यांना मुस्लिम समाजाचे मतदान मागण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन इंडियाचे जिल्हाध्यक्ष सलमान आर्मेचरवाला यांनी केली. मुस्लिम समाजाने गेल्या निवडणुकीत गडाख यांनी सहकार्य केले. त्यांनी खासदारकीच्या पाच वर्षांच्या कालावधीत मुस्लिम समाजाच्या प्रश्नांसाठी किती वेळ दिला. गडाख यांनी २५ टक्के निधी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते त्यांनी पाळले नाही, असे स्पष्ट करून आर्मेचरवाला यांनी मुस्लिम समाजाने अद्यापि कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. वरून निधर्मी आणि आतून जातीयवादी असणाऱ्यांनी मुस्लिमांचा पाठिंबा गृहित धरू नये, असा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.

पोलीस निरीक्षक राजपूत स्थानिक गुन्हे शाखेत
नगर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

नियंत्रण कक्षात नेमणुकीस असलेले पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली. त्यांनी आज संध्याकाळी गुन्हे शाखेची सूत्रे हाती घेतली. राजपूत अगोदर एमआयडीसी ठाण्यात सहायक निरीक्षक म्हणून पावणेदोन वर्षे कार्यरत होते. गेल्या महिन्यात बढती मिळून त्यांची बदली नियंत्रण कक्षात झाली. आता त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत पाठविण्यात आले. पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे यांनी या बाबत आदेश काढला. गुन्हे शाखेतील यापूर्वीचे निरीक्षक देवीदास सोनवणे यांची नुकतीच अमरावतीस बदली झाली. त्यांच्या जागेवर राजपूत आले आहेत.