Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

आठवडाभर राष्ट्रीय नेते रणरणत्या उन्हात
नागपूर, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

उद्या मायावतींची नागपुरात सभा
साकोलीत सोनिया-पवारांची संयुक्त सभा
नागपुरात सोनियांचा ‘रोड शो’
आजपासून मनोहर जोशी विदर्भात
गुरुवारपासून उद्धव ठाकरेंचा दौरा
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या जाहीर सभा विदर्भात होणार असून त्यामुळे हा आठवडा आरोप, प्रत्यारोपांच्या फैरीने गाजणार आहे. भर उन्हातच या सभा होणार असल्याने नेते आणि श्रोत्यांना त्याचा फटका बसणार. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे १६ एप्रिलला विदर्भातील दहाही जागांवर मतदान होणार आहे.

महापालिकेच्या तिजोरीची चावी नवख्या नगरसेवकाकडे
भाजपचे प्रवीण भिसीकर स्थायी समिती अध्यक्षपदी

नागपूर, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

अंदाजे सहाशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे युवा नगरसेवक प्रवीण भिसीकर यांची आज अविरोध निवड झाली. स्थायी समितीचा अध्यक्ष हा महापालिकेच्या तिजोरीचा मालक मानला जातो. गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत प्रवीण भिसीकर गांधीबाग वार्ड क्रमांक ६५ मधून निवडून आले होते. नगरसेवक म्हणून केवळ वर्षभराचा अनुभव पाठिशी असलेले प्रवीण भिसीकर हे महापालिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण स्थायी समिती अध्यक्ष ठरले आहेत.

केंद्र शासनाची वेतनश्रेणी लागू करण्याची शिक्षक सेनेची मागणी
नागपूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी

हकीम समितीच्या शिफारशी शिक्षकांसाठी अन्यायकारक असून केंद्र शासनाने मंजूर केलेली वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी शिक्षक सेनेने केली आहे. हकीम समितीने सुचवलेली वेतनश्रेणी अन्यायकारक आहे. यामुळे शिक्षकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. सहाव्या वेतन आयोगाने शिक्षकांसाठी शिफारस करून केंद्र शासनाची वेतनश्रेणी राज्यातील शिक्षकांना लागू करण्याची आग्रही मागणी संघटनेने केली आहे. हकीम समितीच्या शिफारसीनुसार प्राथमिक शिक्षकास ४,३२० ते ५,१२० रुपये इतके कमी वेतन मिळणार आहे. तसेच राज्यातील माध्यमिक शिक्षकांना १५३० ते ३९३० इतके कमी वेतन मिळेल. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.

सहकारातून शैक्षणिक साहित्याची उपलब्धी
विद्यार्थीपयोगी उपक्रमाचे उद्घाटन

नागपूर, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थिनी ग्राहक सहकारी संस्थेचे उद्घाटन रामनवमीला करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचा पुरवठा योग्य वेळी होत नाही. अशा वेळेस विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना बराच त्रास होतो. ही समस्या सोडवून विद्यार्थ्यांना व इतरांना माफक दरात वस्तू पुरवण्यासाठी मंडळातील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थिनी या सर्वाच्या एकत्रित सहकार्याने सहकारी ग्राहक भांडार स्थापन करण्याची संकल्पना पुढे आली. बऱ्याच दिवसांच्या प्रयत्नानंतर या सहकारी संस्थेची सहकारी उपनिबंधक कार्यालयाद्वारे नोंदणी होऊन त्याचे उद्घाटन वसंत वानखेडे आणि मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले.

हवाई दल प्रमुख गुरुवारी नागपुरात
नागपूर, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल फली होमी मेजर गुरुवारी नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. एअर चिफ मार्शल येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. एअर व्हाईस मार्शल प्रदीप नाईक हे हवाई दलाच्या प्रमुखपदी रुजू होणार आहेत. प्रदीप नाईक मुळचे नागपूरचे आहेत. सध्या ते हवाई दलाच्या दिल्ली मुख्यालयात आहेत. फली होमी मेजर निरोप समारंभासाठी नागपुरातील हवाई दलाच्या मेंटेनन्स कमान्डच्या मुख्यालयात पत्नी जरीन मेजर यांच्यासह येणार आहेत. मेंटेनन्स कमान्डचे प्रमुख एअर मार्शल पी.व्ही. आठवले आणि त्यांच्या पत्नी निलिमा आठवले सोनेगाव विमानतळावर त्यांचे स्वागत करतील. विमानतळावर त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला जाईल. त्यानंतर एअर चिफ मार्शल मेंटेनन्स कमान्ड मुख्यालय, मेंटेनन्स कमान्ड युनिट तसेच डिफेन्स सव्‍‌र्हिस कॉर्प्सच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करतील.

वेळेचे नियोजन करणे गरजेचे -गाडगे
नागपूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी
जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे मत मुख्याध्यापक अशोक गाडगे यांनी व्यक्त केले. न्यू इंग्लिश हायस्कूल येथे २०१० मध्ये दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सभेत ते बोलत होते. विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद असला पाहिजे. आकलन, स्वयंअध्ययन व लेखनाचा सराव या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. अचूक मार्गदर्शन व वारंवार चुका होणार नाहीत, या बाबी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यास मदतीच्या ठरतात, असेही गाडगे म्हणाले. शाळेच्या पर्यवेक्षिका वैशाली उपाध्ये यांनी वर्षभर राबवले जाणारे उपक्रम व परीक्षांची माहिती दिली. ज्येष्ठ शिक्षक प्रशांत महाजन यांनीही मौलिक सूचना केल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी पालक प्रतिनिधी राठोड होते. पालक सभा प्रमुख बलदेव आडे यांनी संचालन तर, मनीष तितरमारे यांनी आभार मानले.

मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीवरून पालिकेतील सत्तारूढ गटात मतभेद
कळमेश्वर, ६ एप्रिल / वार्ताहर

नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवरून सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील मतभेद विकोपाला गेले आहेत. कळमेश्वर नगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. शासनाने येथे प्रथमच महिला मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नगराध्यक्षांनी २७ फेब्रुवारी २००९ ला विशेष सभा घेऊन मुख्याधिकारी विकास कामात वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असल्याचा ठपका ठेवून त्यांची बदली करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला. यावर सत्तारूढ गटातील काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी आक्षेप घेतला व राज्य सरकारकडे वेगळे निवेदन पाठवून मुख्याधिकाऱ्यांची पाठराखण केली. नगर विकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव व जिल्हाधिकारी नागपूर यांनाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.नवीन मुख्याधिकारी यांनी पालिकेतील भोंगळ कारभारावर (प्रतिबंध लावल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर काँग्रेसचे शिक्षण सभापती सिद्धार्थ बागडे, पुंडलिक कामठी, कुंदा बोरकर, पालिका उपाध्यक्ष ललिता भागवत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सिकलसेल रुग्णांच्या ओळखपत्रासाठी मेळावा
नागपूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी

सिकलसेल रुग्णांना राज्य सरकारचे ओळखपत्र मिळावे यासाठी २७ मार्चला सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने सिकलसेलग्रस्तांच्या कुटुंबीयांना आवश्यक प्रमाणपत्रांसहित महाराजबाग येथे आमंत्रित करण्यात आले होते. विदर्भातील नऊ जिल्हय़ातील १४९ लोक मेळाव्याला उपस्थित होते. राज्यातील कोणत्याही सरकारी व निमसरकारी रुग्णालयात सिकलसेल रुग्णांना रक्त, औषध व उपचार विनामुल्य देण्याची तरतूद आहे. अशाप्रकारची सुविधा व ओळखपत्र फक्त राज्यसरकार देते. ज्या रुग्णांना सिकलसेल ओळखपत्र बनवायचे आहे, अशांनी संपत रामटेके ९४२२८२२२८७, निळकंठ पांडे ९४२२१४२५१९, संजीव गजभिये ९४२२८०८६२९ यांच्याशी संपर्क साधावा.

नवजात शिशूंच्या पोषणावर कार्यशाळा
नागपूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी

सेन्ट्रल इंडियाज् चाईल्ड हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटतर्फे हॉटेल व्हीट्स येथे रविवारी, ५ एप्रिलला एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. पदव्युत्तर विद्यार्थी व व्यावसायिकांसाठी नित्याच्या कामी पडावे, या दृष्टीकोनातून ‘नवजात शिशूंच्या पोषणासाठी थेट शिरेवाटे द्रावण देण्यासंबंधी प्रक्रिया’ या विषयावर कार्यशाळा पार पडली. यावेळी नवजात शिशू विशेषज्ञ व बालरोग तज्ज्ञ डॉ. सतीश देवपूजारी, नवजात शिशू विशेषज्ञ डॉ. दीपक चावला, बाल शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सावजी, नवजात शिशू विशेषज्ञ डॉ. सतीश मिश्रा, नवजात शिशू विशेषज्ञ व बालरोग तज्ज्ञ डॉ. विश्राम बुचे, डॉ. राजन खेत्रपाल, बाल चिकित्सा तज्ज्ञ डॉ. सुचिता खडसे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत राज्यातील सूमारे १२० प्रतिनिधी सहभागी झाले होते.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील शिबिरात ५० लोकांवर उपचार
नागपूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी

नेचर अ‍ॅन्ड वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी व शशीकांत बोदल यांच्या संयुक्त विद्यमाने पेंच व्याघ्र प्रकल्पात रविवारी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ५० लोकांवर उपचार करण्यात आले.
पेंच व्याघ्र प्रकल्प व पेंच वन क्षेत्रातील कर्मचारी तसेच, जवळच्या गावातील लोकांकरता हे शिबीर घेण्यात आले होते. पेंच परिसरातील आजारांचा अभ्यास करणे, व्यसनमुक्तीसाठी लोकांना प्रवृत्त करणे, शारीरिक स्वच्छता राखण्यास मार्गदर्शन करणे व रोगमुक्ती करणे या उद्देशाने शिबिरात मोफत रक्तगट तपासणी, रक्तदाब परिक्षण करण्यात आले. तसेच, रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले. आरोग्य शिबिरात डॉ. तुषार कापसे, डॉ. अनिल कुमार, पॅथॉलॉजिस्ट दिलीप वाळके, फार्मासिस्ट उमेश बडकी, दीपक बर्वे यांनी सेवा दिली. शिबिराकरता नेचर अ‍ॅन्ड वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटीचे लोकेश कंडबे, अशोक कोहळे, अजय गेडाम, गिरीश खोरगडे, जयंत खोडे, राहुल कापसे, पूर्व पेंच वन क्षेत्राचे राउंड ऑफीसर कैलुके व त्यांच्यासह इतरांनी सहकार्य केले.

धर्म रक्षा मंचच्या ११ सूत्रीला पुरोहितांची संमती
नागपूर, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

विदर्भातील लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवाराकडून धर्मरक्षा मंचद्वारा घोषित ११ सूत्री राष्ट्रीय घोषणापत्राचे जाहीर वाचन व लेखी स्वीकृती प्राप्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषदने विशेष संपर्क विभागांतर्फे उमेदवारांच्या प्रत्यक्ष भेटी घेणे सुरू केले आहे.
भाजपचे नागूपर लोकसभेचे उमेदवार बनवारीलाल पुरोहित यांनी धर्म रक्षा मंचच्या ११ सूत्री घोषणापत्रास लेखी संमती दिली आहे. ११ सूत्रीमध्ये भारताला अध्यात्मिक राष्ट्र घोषित करावे, अल्पसंख्याक मुस्लिमांचे तुष्टीकरण थांबवावे, संसद भवनावर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला फाशी द्यावी, जबरदस्तीचे धर्मातरण थांबवावे, हिंदूंसाठी कुटुंब नियोजन आणि मुस्लिमांवर कुटुंबनियोजनाची कोणतीही बंधने नसणे ही असमानता थांबवावी, देशाच्या प्राचीन संस्कृती व श्रद्धास्थानांचे रक्षण करावे आदींचा समावेश आहे. ११ सूत्री घोषणापत्रावर बनवारीलाल पुरोहित यांनी स्वाक्षरी केली त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे विशेष संपर्क विभागाचे अध्यक्ष विजय काशीकर, सहसचिव गजानन देशपांडे, जयप्रकाश आहुजा, राजू जोशी, दाते उपस्थित होते.

नागपुरातील २ व्यावसायिकांचा कार अपघातात मृत्यू
नागपूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी

रस्त्याच्या कडेला झाडावर कार धडकून नागपुरातील दोघा व्यावसायिकांचा मृत्यू झाला. हेमंत प्रभाकर वैद्य (रा. गांधी नगर) व मोहम्मद रिजवान अब्दुल लतीफ (रा. छावणी) ही मृतांची नावे आहेत. उमरेड भिवापूर मार्गावरील तास कॉलनीजवळ रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. हेमंत वैद्य, त्यांचा मुलगा प्रतीक व मोहम्मद रिजवान हे तिघे एमएच सीपी ८३४३ क्रमांकाच्या कारने गडचिरोलीला गेले होते. तेथून परत येत असताना नियंत्रण सुटल्याने कार अचानक रस्त्याच्या कडेला उतरून पळसाच्या झाडावर आदळली. मोहम्मद रिजवान यांचा जागीच मृत्यू झाला. हेमंत व प्रतीक हे दोघे गंभीर जखमी झाले. त्या दोघांना भिवापूर ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर गेटवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री हेमंत वैद्य यांचा मृत्यू झाला. अपघातस्थळी लोकांची गर्दी झाली. हेमंत यांच्या मित्र व आप्तेष्टांनी त्यांच्या निवासस्थानी व रुग्णालयात धाव घेतली. हेमंत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व मोठा आप्तपरिवार आहे. सोमवारी दुपारी हेमंत यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोटारसायकलच्या धडकेने बालक जखमी
नागपूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी

मोटारसायकलच्या धडकेने चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. फुटाळा तलावाजवळ रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. सिद्घार्थ सुभाषचंद बोस (रा. वायुसेनानगर ) मोटारसायकलने (एमएच/३१/बीटी/२४२०) पत्नी व चार वर्षांचा मुलगा शुभोजितसह फुटाळा तलावाजवळून जात होते. वेगात आलेल्या बजाज पल्सरने (एमएच/३१/ व्हीएस/९९१०) त्यांना धडक दिल्याने शुभोजित गंभीर जखमी झाला. त्याला दंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातानंतर वाहन तेथेच सोडून पळून गेलेल्या आरोपी बजाज पल्सर चालकाविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

फटिंग यांची योग शिबिराला भेट
नागपूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी

पतंजली योग समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नामदेव फटिंग यांनी नुकतेच रघुजीनगरातील योग प्रशिक्षण शिबिराला भेट दिली. या शिबिरात ८० महिला प्रशिक्षण घेत आहेत. शिबिराचे संचालन प्रतिभा सावलकर या करीत आहेत. यावेळी फटिंग यांनी दीपा कुलकर्णी, भागीरथी गडपायले, चंदा बांगर, पुष्पा मदनकर यांच्यासह अनेक प्रशिक्षणार्थिशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी छाजुराम शर्मा, प्रभाकर सावलकर हे उपस्थित होते.

विदर्भ विकास अभ्यास मंडळाची आज बैठक
नागपूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी

विदर्भ विकास अभ्यास मंडळातर्फे उद्या, ७ एप्रिलला दुपारी ४.३० वाजता धरमपेठेतील राजाराम वाचनालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला डॉ. अंजली कुळकर्णी, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, धनंजय धार्मिक, राम खांडेकर, राम इंदुरकर, डॉ. डी.व्ही. जहागिरदार, डॉ. श्रीकांत तिडके, राजकुमार तिरपुडे, डॉ. मृणालिनी फडणवीस, चंद्रकांत वानखेडे, डॉ. किशोर महाबळ, डॉ. मोहन काशिकर, डॉ. विनायक देशपांडे हे उपस्थित राहणार आहेत. विदर्भ विकासाचा विचार करणाऱ्या बुद्धिजीवींनी या बैठकीला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अविनाश पाठक, डॉ. उदय बोधनकर, अ‍ॅड. पुष्कराज देशपांडे, राम इंदुरकर, शरद चौधरी आदींनी केले आहे.

किरण मेश्राम यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
नागपूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी

मुंबई येथे झालेल्या समारंभात प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या हस्ते किरण मेश्राम यांना हिंदी साहित्य अकादमीचा अनुवादाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. किरण मेश्राम यांनी कवी लोकनाथ यशवंत यांच्या ‘आता होऊन जाऊ द्या!’ या मराठी कवितासंग्रहाचा ‘ऐलान’ या नावाने हिंदी अनुवाद केला आहे. मुंबईच्या पाटकर सभागृहात पंडित नंदकिशोर नौटियाल यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. यावेळी किरण मेश्राम यांना ३५ हजार रुपये रोख, शाल, प्रशस्तीपत्र आणि राजमुद्रा यासह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिर्ला ग्रुपच्या राजश्री बिर्ला आणि पाश्र्वगायक उदित नारायण हे उपस्थित होते. संचालन किशन शर्मा यांनी केले तर, आभार डॉ. केशव फाळके यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी नादिरा राज बब्बर, कमल वाघधरे, सुमेध वासनिक, कवी श्रीधर शनवारे, लोकनाथ यशवंत आणि सांस्कृतिक, सामाजिक, कला, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

‘लोकसत्ता’चा सतरावा वर्धापनदिन साजरा
नागपूर, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाच्या नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचा १७वा वर्धापन दिन आज ‘लोकसत्ता’ कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक प्रवीण बर्दापूरकर, इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे उपमहाव्यवस्थापक बी.के. ख्वाजा उपस्थित होते. ‘लोकसत्ता’च्या आजवरच्या १७ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे यश हे कुण्या एकाचे नसून सर्वाचे आहे. हे टीम वर्क यापुढेही असेच राहू द्या, असे प्रतिपादन प्रवीण बर्दापूरकर यांनी केले. जाहिरात, वितरण या सर्वच गोष्टीत ‘लोकसत्ता’ने उच्चांक गाठला असल्याचे प्रतिपादन बी.के. ख्वाजा यांनी केले. ‘लोकसत्ता’ची यशस्वी वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आज अनेक वाचक आणि हितचिंतकांनी एसएमएस आणि दूरध्वनी करून लोकसत्ताच्या वाटचालीचे अभिनंदन केले. आज कार्यालयात याप्रसंगी वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) वीरेंद्र रानडे, इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे सहाय्यक व्यवस्थापक (मनुष्यबळ) रमेश चरडे, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) रमेश कुळकर्णी तसेच, ‘लोकसत्ता’चे वृत्तसंपादक चंद्रकांत ढाकुलकर यांच्यासह संपादकीय, जाहिरात व वितरण विभागातील सर्व सहकारी उपस्थित होते.

इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या पेपरमध्ये अपूर्ण प्रश्न
नागपूर, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होण्याचाच अवकाश की गोंधळाला सुरुवात झालीच म्हणून समजा. आजच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विद्याशाखेतील प्रथम वर्षांच्या बी.ई. परीक्षेत चुकीच्या प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. प्रश्नांमध्ये मिस प्रिंट आणि चलांच्या किमती नसणे यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. आज इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा ८० गुणांचा पेपर होता. अ आणि ब या दोन भागातील प्रत्येकी तीन प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे होते. प्रत्येक विभागात ५ प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, प्रश्न क्रमांक ३ आणि १० मध्ये पुरेशी माहिती दिलेली नव्हती. प्रश्न क्रमांक तीनमध्ये दिलेल्या आकृतीत एका बाजूची (बीडी) लांबी दिलेली नव्हती. तर प्रश्न क्रमांक १० मध्ये एका चलाची किंमत दिली नव्हती. तसेच प्रश्न क्रमांक ७ (ब) मध्ये मिस प्रिंट झाल्याने विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे काढणे अशक्य झाल्याचे प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने सांगितले.

‘मुलांचे मासिक’चा विज्ञान विशेषांक प्रकाशित
नागपूर, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

गेल्या ८३ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या ‘मुलांचे मासिक’चा विज्ञान विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. या मासिकाचे संपादक शरद मोडक यांचे फेब्रुवारीत निधन झाल्यानंतर ‘मुलांचे मासिक’चा प्रकाशित झालेला हा पहिलाच अंक आहे, हे विशेष. बालवाचकांसाठी सातत्याने दर्जेदार साहित्य दरमहा प्रसिद्ध करणाऱ्या मुलांचे मासिकचा एप्रिल २००९ अंक हा ‘विज्ञान विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. या अंकात विज्ञानविषयक कथा, लेख, लघुनाटिका व इतर विज्ञान माहिती आदींचा समावेश आहे. त्याचे मूल्य फक्त १० रुपये असून मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त १०० रुपये आहे. अधिक माहितीसाठी मुलांचे मासिक कार्यालय १६८, हनुमान नगर, नागपूर-४४०००९ येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक ०७१२-२७४६१८१ आहे. मासिकाचा मे महिन्याचा अंक ‘सुट्टी विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध होत आहे.