Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
नवनीत

जी व न द र्श न
दया, क्षमा, शांती तिथे. . .

 

प्राचीन इस्रायलमध्ये एकेकाळी जंगलचा कायदा होता. एखाद्याने आगळीक केली तर सातपट नव्हे, तर सत्त्याहत्तरपट सूड घेण्याची रीत होती. (जेनेसिस ४:२४) पुढे मोझेसने हिब्रू लोकांना धर्मशास्त्र दिले. त्याने ‘जशास तसे’ हा नियम दिला आणि अर्निबध सूडाला आवर घातला. येशूच्या रूपाने देवच धरतीवर अवतरला. त्याने लोकांना अर्निबध क्षमेचा मंत्र दिला. एकदा शिष्यवर पीटर याने येशूला प्रश्न केला,‘‘प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सातवेळा काय?’’ येशूने त्याला सांगितले,‘‘सात वेळा नव्हे, तर साताच्या सत्तर वेळा क्षमा कर.’’ क्षमा मागणे अतिशय कठीण गोष्ट आहे. जवळजवळ अशक्यप्राय अशी ती बाब आहे. जितका अहंकार प्रबळ, तितका दुराग्रह मोठा असतो. क्षमा मागण्यासाठी आपला अपराध पदरात घ्यावा लागतो. आपल्या मानवी दुर्बलतेची कबुली द्यावी लागते. क्षमा करणे ही त्याहून कठीण बाब आहे. दुखावलेला अहंकार चवताळलेल्या जहरी नागाचे रूप घेत असतो. अंगात सळसळणाऱ्या सूडाचे विष ओकल्याशिवाय नागाला स्वस्थता लाभत नाही. तो दंश करतोच. सूड घेणे ही पाशवी प्रवृत्ती आहे. मनुष्य सावध राहिला नाही तर ती त्याच्यातही उतरत असते. माणसामध्ये सैतानी प्रवृत्ती असते, तशी दैवीही असते. माणसातील सुप्त दैवीपण जागृत करणे हेच येशूचे जीवितकार्य होते, म्हणून त्याने अगणित वेळा क्षमा करण्याचा उपदेश केला. क्षमा करणे मुळीच सोपे नाही. त्यासाठी माणसाला तामसीपणातून सात्विकतेकडे प्रवास करावा लागतो. अंगात देव संचारावा लागतो. वास्तविक पाहता आपण माणसे म्हणजे षड्रिपूंचे बळी! क्षमा करण्याची आपली कुठली लायकी? आपल्यातील देव जागा होतो आणि तोच क्षमा करीत असतो. म्हणूनच म्हटले जाते, ‘प्रमाद करणे मानवी आहे; परंतु क्षमा करणे दैवी आहे.’ आपल्यातील दैवीपणाला जागून, जो क्षमा करतो तो आतून मुक्त होऊन परमशांतीचा अनुभव घेतो. जो क्षमा करीत नाही तो त्रस्त समंधाप्रमाणे सदा अशांत (आणि आजारीही) असतो.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd43@gmail.com

कु तू ह ल
वैशिष्टय़पूर्ण ग्रहणे
नजीकच्या भविष्यकाळात कोणती वैशिष्टय़पूर्ण ग्रहणे घडून येणार आहेत?

दरवर्षी पृथ्वीवर कुठे ना कुठे निदान दोन सूर्यग्रहणे दिसतातच. अर्थात ही ग्रहणे खंडग्रास, खग्रास किंवा कंकणाकृती असू शकतात. या वर्षी २००९मध्ये दोन सूर्यग्रहणे आहेत. यातलं पहिलं सूर्यग्रहण कंकणाकृती होतं व ते इंडोनेशियामधून २६ जानेवारी रोजी दिसलं होतं. भारतामधून दक्षिणेच्या भागातून हे ग्रहण खंडग्रास दिसलं. या वर्षीचं दुसरं ग्रहण खग्रास असून, ते भारतातून दिसणार आहे. खग्रास सूर्यग्रहण हे कमी रुंदीच्या पट्टय़ातूनच दिसतं. २२ जुलै २००९ रोजी जे खग्रास सूर्यग्रहण होणार आहे, त्याचा ‘खग्रास पट्टा’ सुमारे सव्वादोनशे किलोमीटर रुंदीचा आहे. या खग्रास पट्टय़ात सुरत, नंदुरबार, जबलपूर, इंदोर, भोपाळ, वाराणसी, पाटणा ही महत्त्वाची शहरं येत असून, आपल्याला जर खग्रास सूर्यग्रहण पाहायचं असेल तर या शहरांजवळ कुठेतरी जायला हवं. खग्रास पट्टय़ाव्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणांहून हे ग्रहण खंडग्रास स्वरूपातच दिसेल. नंदुरबारजवळ खग्रास स्थिती सुमारे तीन मिनिटे टिकेल, तर पाटणा येथून जवळजवळ चार मिनिटे! २२ जुलैच्या खग्रास सूर्यग्रहणानंतर केवळ सहा महिन्यांतच म्हणजे १५ जानेवारी २०१० या दिवशी दक्षिण केरळ व दक्षिण तामिळनाडू येथून आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. नागरकोयल, तिरुवनंतपुरम, तिरुनेलवेल्ली, मदुराई, कुंभकोणम ही महत्त्वाची शहरे ग्रहणपट्टय़ात येत आहेत. नागरकोयल येथून कंकणाकृती सूर्य जवळजवळ १० मिनिटे दिसेल. २००९ या वर्षांत चार चंद्रग्रहणे होतील. यातली तीन चंद्रग्रहणे छायाकल्प असल्यामुळे ती नोंद घेण्यासारखी नाहीत. पहिलं छायाकल्प चंद्रग्रहण ९ फेब्रुवारी रोजी झालं. नंतरची दोन ७ जुलै व ६ ऑगस्ट या दिवशी होतील. यावर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण खंडग्रास असून, ते ३१ डिसेंबर रोजी भारतातूनही दिसेल.
प्रदीप नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
ग्रेको एल.

धार्मिक विषयांवर आधारित चित्र काढणारा चित्रकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या ग्रेको एल. याचा जन्म ग्रीसमधील क्रीट येथे १५४१ च्या सुमारास झाला. त्या काळी व्हेनिसमधील प्रख्यात चित्रकार तिशन याच्या चित्रशाळेत अध्ययनासाठी ते आले. यानंतर ते रोमला गेले. तेथे मायकेल अँजेलो, रॅफएल या कलाकारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. या सुमारास स्पेनमध्ये राजा दुसरा फिलीप याने एक मठ बांधायला घेतला होता. म्हणून ते तेथे गेले. स्पेनमधील धर्ममरतडांशी चर्चा केल्यावर त्यांनी आपली चित्रकला फुलवण्याचे ठरवले. टोलिडो येथील एका चर्चच्या वेदीवर त्यांनी काढलेले ‘असम्पशन ऑफ द व्हार्जिन’ हे चित्र नव्या कलायुगाचे प्रतीक समजले जाते. त्यांची कीर्ती ऐकून राजे फिलीप यांनी त्यांना आपल्या दरबारात बोलावले. तेथे त्यांनी काढलेली चित्रे राजाला फार आवडली. स्वर्गाच्या दिव्यदर्शनावर ‘बेरिअअल ऑफ द काऊंट द ऑर्गाथ’ हे त्यांचे सर्वश्रेष्ठ चित्र समजले जाते. येशू आणि बारा अ‍ॅपॉसल दाखवणारे त्यांचे चित्र फारच गाजले. याशिवाय टोलिडो येथील सात होस चॅपेलच्या तीन वेदी, माद्रिद येथील मठासाठी आणि सेंट इल्टुफोन्सो ही चित्रे शरीरवैशिष्टय़ांच्या टोकाच्या विकृतीकरणासाठी गाजली. त्यांची निसर्गचित्रेसुद्धा मनमोहक आहेत. ‘व्हय़ू ऑफ टोलिडो’ हे त्यांचे मनमोहक निसर्गचित्र. त्यांनी काही व्यक्तिचित्रेसुद्धा काढली. त्यांनी आंतोनिओ द कोव्हारू स्विआस या मानवतावादी तत्त्ववेत्त्याचे, तसेच प्रवचनकार हॉर्टेनासिओ यांचे चित्र काढल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या काही चित्रांचा अर्थ समजण्यासाठी विसाव्या शतकापर्यंत वाट पाहावी लागली. ७ एप्रिल १६१४ रोजी स्पेनमधील टोलिडो येथे त्यांना देवाज्ञा झाली.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
इवल्या पानाचे जगणे

ते इवलसं पान होतं. पोपटी रंगाचं लुसलुशीत कोवळं. झाडाच्या फांदीवर त्याच्या भावंडांबरोबर तेही वाढत होतं. वारा आला की, झोके घ्यायचं; पाऊस आला की, भिजायचं; ऊन वाढलं की, कोमेजायचं. झाडांच्या मुळांमधून झाड त्याला जीवनरस पुरवायचं. सूर्यप्रकाश त्याच्या कोवळय़ा शरीरात हरितद्रव्य निर्माण करायचा. जसे महिने गेले, ऋतू गेले तसा पानाचा आकार वाढत गेला. त्याचे मखमली अंग निबर झाले. टवटवीत पोपटी रंग हिरवागर्द झाला. भावंडे मजेत वाढत होती, पण मोठं होणारं ते इवलं पान मात्र अस्वस्थ होतं. त्याला वाटे, असं फांदीला चिकटून एकाच जागी सगळं आयुष्य का काढायचं! असं आयुष्य त्याला कंटाळवाणं वाटायला लागलं. त्याने धडपड सुरू केली झाडापासून सुटे व्हायची. अंग घुसळले. एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे, एकदा वर, तर पुन्हा खाली असे शरीराला आळोखेपिळोखे पुन: पुन्हा दिले. देठ बराच लवचिक झालाय असं पाहून साऱ्या शक्तीनिशी हिसडा दिला स्वत:ला आणि काय आश्चर्य! पान फांदीपासून सुटे झाले. फार आनंदी झाले. वाऱ्याच्या झुळकेबरोबर हेलकावे खात हवेत गरगर उडत पुढे जाऊ लागले. कित्ती मोकळे वाटले त्याला. आपण स्वतंत्र आहोत, झाडाशी चिकटलेलो नाहीत, हवे ते करू शकतो याचा त्याला अभिमान वाटला. वाटेत त्याला कितीतरी झाडे भेटली. पाने, फुले, फळे भेटली. पक्षी, फुलपाखरे गाणी गात जाताना भेटले. त्यांनी पानाला गाणी शिकवली. एकदा सोसाटय़ाचा वारा आला आणि पान गरगरत खूप दूर गेले. त्याला चक्कर आली आणि ते एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसले. जरा बरे वाटल्यावर त्याने ठरवले, ‘नको बाबा पुन्हा झाडाच्याच मदतीने जगायला’. त्याने सारे बळ एकवटले आणि झाडावरून ते पुढे निघाले. आपल्याला हवेहवेसे वाटणारे, आवडणारे आयुष्य पान आनंदाने जगले. एके दिवशी थकून ते जमिनीवर पडले. त्याच्या लक्षात आले आपण सुकून गेलोय. आपला पाचोळा झालाय. वाऱ्याबरोबर हिंडण्याची, उडण्याची ताकद आता आपल्यात राहिली नाही. पानाने आहे ते आयुष्य स्वीकारले. ते दु:खी झाले नाही. एक पक्षी घरटे बांधायला वाळलेली पाने चोचीत धरून नेत होता. पान म्हणाले,‘‘मलाही ने.तुझे घरटे तयार करायला माझी मदत होईल.’’ पान पक्ष्याच्या घरटय़ाचा भाग झाले. पक्षिणीने अंडी घातली. पानाने त्यांना ऊब दिली. अंडय़ातून इवली पिले एकेदिवशी बाहेर आली. पान फार आनंदले. पक्षी चारा आणायला गेले की, पिले खाली पडू नयेत म्हणून पान सतत लक्ष ठेवे. पिलांची काळजी घेई. एके दिवशी पिले मोठी होऊन उडून गेली. पक्षी-पक्षीणही निघून गेले. पानाने विचार केला, काही काळाने पुन्हा पक्षीण येईल, पिले जन्माला येतील. एके दिवशी वादळ आले. पक्ष्यांनी बांधलेले घरटे पानासह झाडावरून खाली पडले. पान म्हणाले,‘‘मी जमिनीतून आलोय. पुन्हा जमिनीत जाईन.’’ पानाची माती झाली. पुन्हा झाडावर पालवी म्हणून येण्यासाठी पान मातीत मिसळून गेले. आयुष्य आपल्यापेक्षा मोठं असतं. त्याला सुरुवात आणि शेवट नसतो. आपल्याला जसं जगायला आवडतं तसं जगण्याचं धाडस करावं. आपल्याला हवेहवेसे वाटणारे, आवडणारे आयुष्य जगण्याचा अधिकार व स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आजचा संकल्प- माझं जगणं कधीच संपणार नाही. मी ते आनंदाने जगेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com