Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

शुल्कवाढीविरोधात डीएव्ही शाळेवर पालकांचा मोर्चा
बेलापूर/वार्ताहर :
शैक्षणिक शुल्कात २० टक्क्यांवरून थेट ८० टक्के वाढ करण्यात आल्याने पालकांनी सोमवारी ऐरोलीतील डीएव्ही पब्लिक स्कूलवर मोर्चा काढला. एकीकडे आर्थिक मंदीने विविध क्षेत्रातील रोजगारावर गदा आली आहे, तर दुसरीकडे सहाव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. हा ताळमेळ साधून यंदाच्या वर्षी डीएव्हीने शैक्षणिक शुल्कात वाढ केली आहे; मात्र ही वाढ नेहमीच्या शुल्कवाढीपेक्षा ८० टक्क्यांनी जास्त असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्याने वाढीव शुल्क भरण्यास अनेकांनी असमर्थता दर्शविली आहे. गेल्या पाच वर्षांत प्रतीवर्षी केवळ २० टक्के शुल्कवाढ केली जात होती. यंदाच्या वर्षी केलेली शुल्कवाढ अवास्तव असल्याचा आरोप पालकांनी केला. येत्या १५ एप्रिलपर्यंत शाळेच्या संचालकांनी शुल्कवाढ रद्द न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. शिक्षकांच्या पगारात वाढ झाल्याने शुल्कवाढ करण्यात आल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे.

रिक्षावाल्याचा ‘बावनकशी’ प्रामाणिकपणा!
पनवेल/प्रतिनिधी

रिक्षाचालकांच्या मनमानीपणाचे नवेनवे किस्से दररोज समोर येत असताना पनवेलमधील शंभुराज देसले या रिक्षावाल्याने अनोख्या प्रामाणिकपणाचे दर्शन सोमवारी घडविले. एका प्रवासी महिलेचे रिक्षात राहिलेले दीड लाख रुपयांचे दागिने पोलीस ठाण्यात जमा करणाऱ्या आणि पोलिसांना त्या महिलेपर्यंत पोचण्यात मदत करणाऱ्या शंभुराजचे सर्वत्र कौतुक होत आहे. पनवेलच्या लाइन आळीमध्ये राहणारी पान ३ वर श्व् पान १ वरून श्व् सखुबाई लक्ष्मण इचके (४५) ही महिला आपल्या मुलीसह राजगुरूनगर येथे जत्रेला गेली होती. रविवारी मध्यरात्री दीड वाजता ती कळंबोली सर्कल येथे उतरली. तेथून घरी येण्यासाठी तिने शंभुराजची (२४) रिक्षा भाडय़ाने घेतली. रिक्षातून उतरण्याच्या गडबडीत या महिलेचा दागिन्यांचा डबा रिक्षातच राहिला. तिला सोडून पुढे गेल्यानंतर हा प्रकार शंभुराजच्या लक्षात आला. त्याने डबा उघडून पाहिला असता त्यात लक्ष्मीहार, मोहनमाळ, नथ असा सुमारे १० तोळ्यांचा ऐवज होता. त्याने ताबडतोब हा डबा पनवेल शहर पोलीस ठाण्यात जमा केला. मध्यरात्री नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी सकाळी शोध मोहीम घेण्याचे ठरवले. सोमवारी सकाळी पोलिसांनी शंभुराजसह ही मोहीम सुरू केली. शंभुराजने मध्यरात्री त्या महिलेला जिथे सोडले होते, तिथे पोलिसांचा लवाजमा पोहोचला. योगायोगाने शंभुराजला ही महिला त्याच रस्त्यावरून जात असल्याचे आढळले आणि ओळख पटवून तिला दागिने सुपूर्द केले. १० तोळ्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने परत मिळाल्याने या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. तक्का गावात राहणाऱ्या शंभुराजच्या प्रामाणिकपणाचे यावेळी सर्वांनी कौतुक केले.

सेंट जोसेफविरोधात सदनशीर मार्गाने लढाई
पनवेल/प्रतिनिधी -
विद्यार्थ्यांच्या वार्षिक शुल्काची प्रस्तावित भरमसाट वाढ मागे घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या नवीन पनवेलच्या सेंट जोसेफ शाळेविरुद्ध सनदशीर आणि कायदेशार मार्गाने लढाई लढण्याचा निर्णय पालक समितीने घेतला आहे. सेक्टर ११ मधील या शाळेच्या व्यवस्थापनाने या वर्षांपासून वार्षिक शुल्कात ४० ते ५० टक्के एकतर्फी वाढ केल्याने पालक वर्गात संतापाचे वातावरण आहे. शाळा समिती आणि पालकांमध्ये शनिवारी झालेल्या बैठकीनंतरही फीवाढीचा प्रस्ताव शाळेने मागे न घेतल्याने विद्यार्थ्यांना सोमवारी शाळेत न पाठवून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता. या निर्णयाला आज चांगलाच प्रतिसाद लाभल्याने शाळा ओस पडल्याचे दिसत होते. या निर्णयाची माहिती नसलेले केवळ ३०-३५ विद्यार्थी बसमधून आले होते. प्रस्तावित वाढीव शुल्काबाबत शाळा समिती ठाम असल्याने स्थानिक आमदारांच्या माध्यमातून बुधवारी ८ एप्रिलला राज्याच्या शिक्षणमंत्र्यांची भेट घेण्याचे पालक समितीने ठरवले आहे. तसेच शाळेच्या इमारतीसाठी भूखंड देताना सिडकोने शाळेला कोणत्या अटी घातल्या होत्या, याचीही विचारणा सिडको अधिकाऱ्यांकडे करण्यात येणार आहे. कोणत्याही शाळेला किती प्रमाणात शुल्कवाढ करता येते याची माहितीही माहितीच्या अधिकाराखाली मागविण्यात येणार आहे, अशी माहिती काही पालकांनी दिली. बुधवारी रात्री नऊ वाजता पालकांची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यात या घडामोडींचा आढावा घेण्यात येणार आहे. पालकांच्या एकजुटीमुळे शाळेची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे.