Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

धुळे शहरापासून आठ किलोमिटरवरील फागणे गावाजवळ द्राक्षांची वाहतूक करणारा मालट्रक जळून खाक झाला. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. नाशिकहून द्राक्षमाल भरून हा ट्रक नागपूरकडे जात असताना प्रथम त्याच्या चाकांनी पेट घेतला. त्यानंतर अल्पावधीतच संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. चालकाने उडी मारल्याने मनुष्यहानी टळली.

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाने ‘डेड लॉक’ संपुष्टात येण्यास मदत
प्रश्न जिव्हाळ्याचे

वार्ताहर / धुळे

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग संपूर्ण देशाच्या संरक्षण व्यवस्थेतही अनन्यसाधारण महत्वाचा ठरणार आहे. सद्यस्थितीत उत्तरेतून इंदूपर्यंत येण्यासाठी मार्ग असला तरी इंदूरला मात्र ‘डेड-लॉक’ होतो. यामुळे इंदूरसारख्या शहराचा दक्षिणेशी संबंधच तोडला गेला आहे. पण, या नव्या नियोजित रेल्वे मार्गामुळे डेडलॉक संपुष्टात येवून धुळ्यासारखा अविकसित भागही इंदूरबरोबरच दक्षिण-उत्तर व पूर्व-पश्चिमेशी जोडला जाणार आहे. पण, या चोहीबाजुतील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामधून अशा महत्वाकांक्षी मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी प्रयत्न होत नाही.

जळगावमध्ये उपनिबंधक कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
ठेवीदारांच्या धसक्यामुळे उपाययोजना

जळगाव / वार्ताहर

अडचणीत आलेल्या ठेवीदारांकडून सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, जिल्ह्य़ातील सर्व तालुका उपनिबंधक व शहरातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी ६० दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या ठेवीदारांना मुदत संपूनही त्यांच्या ठेवींचे पैसे परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या काही ठेवीदारांनी उपनिबंधक कार्यालय तसेच त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत वाद-विवादाचे प्रकार घडले.

जळगावच्या पालक मंत्र्यांवर बेअदबीचा खटला भरणार झ्र् खडसे
जळगाव / वार्ताहर

उमेदवारीसाठी पैसे घेण्याची संस्कृती आणि परंपरा ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांची आहे. भाजपची तशी परंपरा नाही. दुसऱ्यावर आरोप करताना पालकमंत्री डॉ. सतिष पाटील यांनी याचे भान ठेवले पाहिजे, असे ठणकावतानाच भाजप विधीमंडळ गटनेते एकनाथ खडसे यांनी पाटील यांच्याविरुद्ध फौजदारी तसेच अब्रुनुकसानीचा खटला भरण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचार सभेत पाटील यांनी पारोळा येथील ए. टी. पाटील यांना जळगाव मतदार संघातून उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या एकनाथ खडसे यांनी दोन कोटी रुपये घेतले असा जाहीर आरोप केला होता. त्या पाश्र्वभूमीवर धरणगाव येथे भाजप उमेदवार ए. टी. पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात हा इशारा दिला.

भगूर बसस्थानक अवैध व्यवसायांच्या विळख्यात
भगूर / वार्ताहर

भगूर बसस्थानकाला वाहतुकीच्या कोंडीने घेरले असताना आता खुलेआम सुरू असलेल्या दारू विक्रीबरोबरच अवैध व्यवसायिकांनी देखील वेढले आहे. वैभव कटय़ारे, अक्षय हेमराजनी ते अलीकडचा प्रियंका लकारीया खून खटला असो, सर्वच गैर बाबींनी पोलीस ठाणे चांगलेच गाजले आहे. त्यात भगूरचे बस स्थानक परिसरात अवैध धंद्यांना कोणाचे अभय आहे, हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. बस स्थानकाच्या चारही बाजुने अवैध व्यवसायाने वेढले आहे. गांजा विक्री असो स्वस्त विदेशी दारू असो या सर्वाची येथे खुलेआम विक्री होत असल्याची चर्चा आहे. कोणीही या आणि परिसरात अवैध व्यवसाय खुलेआम करा अशी ख्याती गेल्या काही दिवसात या परिसरात निर्माण झाली आहे. चायनीज व्यवसायाच्या नावाखाली पाठीमागेच विदेशी दारुची खुलेआम विक्री होते, तेही प्रखर विद्युत प्रकाशामध्ये तरी ही कोणत्याही शासकीय यंत्रणेला ते माहित नसावे ही बाब विशेष मानावी लागेल. एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. खंडोबा मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यातच गांजा विक्रीचा व्यवसायही सुरू आहे. या सर्व अवैध व्यवसायांना तत्कालीन पोलीस निरीक्षक वाय. डी. पाटील यांनी चांगला हिसका दाखविल्यानंतर अल्पावधीतच या अधिकाऱ्याबद्दल देवळाली कॅम्प परिसरात नागरिकांच्या मनात आदरयुक्त स्थान निर्माण झाले होते. अवैध व्यवसायांनी डोके वर काढले आहे. कोणतीच शासकीय यंत्रणा याबाबत गांभीर्याने घेण्यास तयार नाही. रात्री आठ वाजेच्या नंतर या भागातील चायनीज गाडय़ांवरच दारू विक्रीची मोठी यात्राच भरलेली असते. वाढत्या अतिरेकी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर लष्कराने विशेष खबरदारी घेतलेली असताना विदेशी दारू ठिकाणी येते कुठून हा प्रश्न आहे. लष्कराने याबाबत चौकशी करणे गरजेचे आहे. कधी कधी मद्यपीमध्ये वादविवादाचे प्रकरणही नेहमीच घडत आहे. त्यामुळे रात्री येणाऱ्या प्रवाशांना भगूर बस स्थानक आता असुरक्षित वाटू लागले आहे. देवळाली कॅम्पला सध्या मोठय़ा प्रमाणात आपापसातील कुरबुरीने वर डोके काढले आहे. त्यात नवीन पोलीस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अवैध व्यवसायाचा बिमोड करण्याचे त्यांच्यापुढे आव्हान आहे.

नवापूर जायंटस् ग्रुपचे पदग्रहण
नवापूर / वार्ताहर

तिसरे महायुध्द झाले तर ते पाण्यामुळे होईल, असे स्पष्ट करतानाच पर्यावरणाचा ऱ्हास होत असून जायंटस ग्रुपने वॉटर हार्वेस्टर प्रकल्प राबवावा, अशी अपेक्षा उद्योगपती विपीनभाई चोखावाला यांनी नवापूर जायंटस ग्रुपच्या पदग्रहण सोहळ्यात व्यक्त केली. येथील सुरूपसिंग नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या धिमीबाई नाईक सभागृहात हा कार्यक्रम झाला. सेवाभावी संस्थाची, त्यांच्या कार्याची शहराला गरज आहे. ती जायंटस्च्या माध्यमातून पूर्ण होईल. एका चांगल्या ग्रुपची स्थापना झाली आहे, असे चोखावाला यांनी सांगितले. यावेळी ग्रुपचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य दिनेश मालाणी, शहर अध्यक्ष नरेश गुप्ता, सचिव विनोद शेवटेकर, नितीन रूणवाल आदी प्रमुख पाहुणे व्यासपीठावर होते. यावेळी ग्रुपचा पारंपरिक पध्दतीने चिकलाणा येधून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा झाला. अध्यक्ष डॉ. प्रमोद कटारिया, डॉ. अनिल गावित, डॉ. हिमांशु जायस्वाल, प्रा. गोपाल पवार, ईश्वरभाई कटारिया, विनायक सूर्यवंशी आदींचा यामध्ये समावेश होता. सेवाभावी कार्य करताना डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो, असे गुप्ता म्हणाले. कटारिया यांनी जबाबदारी पूर्णपणे पार पडण्याची जाणीव आमच्या ग्रुपला आहे असे सांगितले. यावेळी खजिनदार ईश्वर कटारिया यांनी नवापूर उपजिल्हा रूग्णालयाला ४० मच्छरदाण्या भेट दिल्या. विसरवाडी येथील कांतिलाल कटारिया यांनी ग्रुपला २१०० रूपयांची मदत जाहीर केली. कार्यक्रमाला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नलिनी पाटील, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. बी. एच. जाधव उपस्तित होते. सूत्रसंचालन प्रा. गोपाळ पवार यांनी केले. डॉ. अनिल गावित यांनी आभार मानले.