Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
विशेष

शाहरूखचे बोबडे बोल!
चार पंतप्रधान होऊ शकतात का? त्यांचे चार काय, दहा सल्लागार असू शकतात. पण पंतप्रधान एकच असतो. तसंच कर्णधाराचं आहे. शाहरूखने सुनील गावसकरला सल्ला दिला की त्याने संघ काढावा आणि आपले विचार अमलात आणावेत. हा कसला माज आहे? पैशाचा? तुला कसलं क्रिकेटचं प्रेम आहे? तुला पैशाचं प्रेम आहे. मिस्टर शाहरूख तुम्ही धंदा करताय. त्या सुनील गावसकर नावाच्या माणसाने घाम गाळलाय. रक्त सांडलंय. जगातले वेगवान गोलंदाज हेल्मेट न घालता अंगावर घेतले आहेत. त्याने या देशाला वेगवान गोलंदाजी कशी खेळावी हे शिकवलंय. त्याने शिकवलं म्हणून आज दहाव्या क्रमांकावरचा झहीर खानसुद्धा वेगवान गोलंदाजी फोडून काढताना दिसतो. क्रिकेट आणि विशेषत: फलंदाजी या विषयावर त्याच्याशी वाद घालायचा किंवा त्याहून वाईट म्हणजे त्याला काय कळतं हे विचारायचा तुम्हाला अधिकारच नाही. सुनीलने शाहरूखच्या अभिनयाबद्दल कधी तारे तोडले आहेत का? किंवा टिपण्णी केली आहे का? ती मॅच्युरिटी सुनीलकडे आहे.

कोकणात सौर ऊर्जेवर आधारित उपकरणांचा प्रभावी वापर शक्य
सध्या कोकणातील आंब्याखालील क्षेत्र २० हजार हेक्टर इतके आह़े मुख्यत्वे हापूस, पायरी, केशर, रत्ना इ़ आंबे कोकण विभागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. तसेच काजूखाली असलेले मोठे क्षेत्र त्याच बरोबर कोकम, फणस, आवळा व चिकू, केळी, गवती चहा, कडीपत्ता, पुदीना, मिरची, मुळा, मेथी, पालक, शतावरी, तुळसी, आले, कांदा, कोथिंबीर, पपई इत्यादी देखील लोकप्रिय आह़े अन्य औषधी व आयुर्वेदिक उद्योगामध्ये या पदार्थाची भुकटी वापरण्यात येत़े तसेच इतर पदार्थाना मुल्यवर्धित करण्यासाठी देखील यांचा उपयोग करण्यात येतो़ या सर्व प्रक्रीयेत सौर उर्जेवर आधारित उपकरणांचा प्रभावी वापर करता येवु शकतो. कोकण प्रदेशाला ७२० कि.मी. लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आह़े सुमारे ३.५ लाख टन सागरी पदार्थाचे सरासरी उत्पन्न दरवर्षी मिळत़े सागरी पदार्थापैकी जवळपास ३० पदार्थ पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) वाळलेल्या स्वरूपात विकण्यात येतात़

'परमानन्द माधवम्'
मध्यप्रदेशातील चांपा येथील भारतीय कुष्ठ निवारक संघाच्या श्री रामकृष्ण सेवा आश्रमाचे संस्थापक सदाशिव गोविंद कात्रे तथा कात्रे गुरूजी यांचे मराठी जीवनचरित्र 'परमानन्द माधवम्' आज डोंबिवलीत प्रकाशित होत आहे. याआधी सुनील किरवई यांनी लिहिलेले हेच जीवनचरित्र हिंदीतून याच नावाने प्रकाशित झाले होते. परंतु या आश्रमाला मदत करणाऱ्या हितचिंतकांमध्ये मराठी भाषिकांचे प्रमाण मोठे असल्याने जीवनचरित्राची मराठी आवृत्ती प्रसिद्ध करावी, अशी मागणी भारतीय कुष्ठ निवारक संघाकडे केली जात होती. ती आता पुरी होत आहे. कात्रे घराणे मूळचे संगमेश्वरजवळच्या चोरवणे गावचे. बुंदेलखंडाच्या छत्रसाल महाराजांच्या काळी कात्रे कुटुंब कोकणातून झांशी, छतरपूर, शिवपुरी, अरौन या मघ्यप्रदेशातील गावी आले, तिथेच स्थायिक झाले. २३ नोव्हेंबर १९०९ हा कात्रेगुरूजींचा जन्मदिवस. २००८ ते २००९ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. ४३ साली रा. स्व. संघाशी संबंध आलेल्या गुरूजींवर ४८च्या संघबंदीनंतर एकापाठोपाठ एक अरिष्टे आली. पत्नीचा सर्पदंश होऊन मृत्यु झाला, त्या मृत्युचा ठपका ठेवून पोलिसांनी अटक केली, तुरुंगात जावे लागले, शेवटी त्या केसमधून निर्दोष सुटकाही झाली. परंतु आईचे निधन, मुलीवर ओढवलेले प्रकृती अस्वास्थ्य, त्यातच त्यांना स्वत:ला जडलेला कुष्ठरोग, मुलीला बहिणींच्या ताब्यात देऊन घराबाहेर पडताना बहिणींनी दाखवलेला अविश्वास, घरातील कोणतेही सामान घेऊन जाण्यास केलेला विरोध अशा कितीतरी गोष्टी. सहकारी-परिचित आणि समाजाने तिरस्कारल्यानंतर कात्रे गुरुजी, मिशनऱ्यांनी चालवलेल्या कुष्ठ रुग्णालयात दाखल झाले. या रुग्णालयात धर्मातराचे काम चाले. कात्रे यांनी तत्कालीन राज्यपाल हरिभाऊ पाटसकर यांची भेट घेऊन त्यांचेकडे रीतसर तक्रार केली. पाटसकरांनी त्याची दखल घेत म्हटले, केवळ तक्रारीने काही होणार नाही, ते सातासमुद्रापलीकडून भारतात येतात, उपचार करतात, आपल्याला तसे काम उभे करावे लागेल. त्या एका झणझणीत अंजनाने कात्रे जागे झाले. अमरावतीच्या डॉ. शिवाजीराव पटवर्धनांच्या जगदंब कुष्ठ आश्रमात दाखल झाले. तिथे राहून संस्था चालविण्याच्या कामाचा अनुभव त्यांनी घेतला आणि थेट बिलासपूर गाठले. बिलासपुरात तेव्हा कुष्ठरोग्यांची वस्तीही होती आणि गैरमिशनरी सेवाकार्याची गरजही होती. कात्रेंनी तिथे श्री रामकृष्ण सेवा आश्रम स्थापन केला. तीन रुग्ण, एक झोपडी यासह आश्रम सुरू झाला. आज ६०-६२ एकर जागेत रुग्णालय, कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन, निरोगी बालकांसाठी सुशील विद्यार्थी गृह, माधवसागर हा बाराही महिने पाणी देणारा तलाव, त्याकाठी ४० एकरांवर असलेली शेती, त्यात राबणारे कुष्ठमुक्त आश्रमवासी असा विस्तार झाला आहे. बाबा आमटे, मनोहर दिवाण, शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोगनिर्मूलनाचे कार्य केले, पण ते स्वत: कुष्ठप्रकोपी नव्हते. कात्रे हे पहिलेच कुष्ठप्रकोपी सेवाभावी कार्यकर्ते. पुढे दामोदर बापट हे वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते त्यांना येऊन भेटले. त्यांच्या कामात सहभागी झाले. तेव्हा ३५ वर्षे वयाचे असलेले बापट आता पंचाहत्तरीत आहेत. बापटजींनी संस्थेच्या सचिव पदावरून निवृत्ती घेतल्यानंतर सुधीर देव हे संस्थेचे नवे सचिव झाले आहेत. स्वत: कुष्ठरुग्ण नसतानाही केवळ सेवाभावनेने आणि संघाने दिलेल्या आदेशावरून घरदार-करिअर-नोकरीव्यवसाय-लग्नादी बंधनात गुंतून न पडता त्यांनी बापटांच्या पावलांवर पाऊल टाकले आहे. 'परमानन्द माधवम्' ही अशा कर्तव्यबुद्धीतून चालवलेल्या सेवा वाटचालीची प्रेरणादायी गाथा आहे. ती वाचताना आपण किती लहान, संकुचित, आत्मकेंद्रीत आहोत याचीच जाणीव सातत्याने होत राहते.