Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

कोकणच्या विकासासाठी नीलेशला विजयी करा -नारायण राणे
रत्नागिरी, ६ एप्रिल/ खास प्रतिनिधी

 

राज्यात शिवसेना आणि केंद्रातील भाजपाप्रणीत लोकशाही आघाडीने सतत जनतेची फसवणूक केली, याची नोंद घेऊन कोकणच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश राणे यांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा राणे यांच्या उपस्थितीत आज येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी बोलताना त्यांनी शिवसेना आणि केंद्रातील भाजपाप्रणीत लोकशाही आघाडीच्या तत्कालीन सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मराठी माणसाच्या उद्धाराचा वसा घेऊन निर्माण झालेल्या शिवसेनेने या जनतेच्या जीवनात काहीही परिवर्तन घडवले नाही. कारण शिवसेना हा राजकीय पक्ष नसून, ठाकरे कुटुंबाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. भाजपाने प्रसिद्ध केलेला लोकशाही निवडणूक जाहीरनामा फसवा आहे. शिवाय, अंतर्गत वादांमुळे कमजोर झालेली भाजपाप्रणीत आघाडी सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत या प्रदेशाच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश राणे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.
मेळाव्यात बोलताना डॉ. नीलेश म्हणाले की, सध्याच्या मंदीच्या काळात पुण्या-मुंबईतही नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत कोकणातील बेकार तरुण-तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी काम करण्याची गरज आहे. या पिढीला विकासाच्या संधी मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
चिपळूण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजून प्रचारात पूर्ण ताकदीने उतरले नसल्याच्या वृत्ताचा थेट उल्लेख न करता, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कुमार शेटय़े यांनी या निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न करणाऱ्या ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांला पक्षातून काढून टाकले जाईल, अशी तंबी याप्रसंगी बोलताना दिली.
‘म्हाडा’चे कोकण विभागीय सभापती रमेश कीर, आमदार गणपत कदम, उदय सामंत, ‘बविआ’चे अध्यक्ष सुरेश भायजे इत्यादींनीही मेळाव्यात डॉ. नीलेश यांना पाठिंबा व्यक्त केला.