Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

लोकसभा निवडणुकीत संवेदनाक्षम केंद्रे निश्चित
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, ६ एप्रिल

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत संवेदनाक्षम मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दलाचे कर्मचारी असतील. प्रत्येक मतदाराचे स्वतंत्र फोटो घेण्याची तजवीजही केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भारताच्या निवडणूक आयोगाने कडक धोरण अवलंबिले आहे. काही मतदान केंद्रांवर सर्वाधिक मतदान एकाच राजकीय पक्षाला होते. त्याची नोंद आयोगाने घेतली आहे. अशा मतदान केंद्रावरही केंद्रीय सुरक्षा दलाचे कर्मचारी ठेवले जातील. तसेच मतदानास येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे फोटो घेऊन बारकाईने निरीक्षण केले जाणार आहे. या निवडणुकीत प्रथमच फोटो मतदार यादी वापरली जाणार आहे. या यादीतील काही स्थलांतरित मतदार बोगस मतदान करतील, अशी खात्री बाळगून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. स्थलांतरित मतदार आणि फोटो न काढलेले मतदार केंद्रातील मतदारसंख्या जास्त असतील ती मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’ (संवेदनाक्षम) मतदान केंद्रे म्हणून ओळखण्यात येणार आहेत. यापूर्वी एकाच पक्षाला एखाद्या मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदान होणारी केंद्रे, स्थलांतरित व फोटो नसणारी केंद्रे ‘क्रिटिकल’ म्हणून संबोधिण्यात आल्याने तेथे केंद्रीय सुरक्षा दलाचे कर्मचारी व सूक्ष्म निरीक्षण करणारी व्यवस्था तैनात करण्यात येणार आहेत. ‘क्रिटिकल’ मतदान केंद्रांवर फोटो काढले जातील, तसेच मतदाराची सही अगर अंगठा उठविला जाणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांना दिसेल आणि समजेल अशी मतदान यंत्राची प्रतिकृती ठेवली जाईल. त्यातून अशिक्षित मतदारांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगण्यात येणार आहे. अशा अनेक बदलांनी आयोगाने मतदारांना सुविधा दिल्या आहेत.