Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

नीलेश राणे यांच्या प्रचारावर राष्ट्रवादीचा बहिष्कार!
सावंतवाडी, ६ एप्रिल/वार्ताहर

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आल्याने काँग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारात सहभागी होऊ नये, अशी मागणी काही जणांनी जिल्हा बैठकीत केल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रचारात सहभागी व्हा, असा शरद पवार यांचा संदेश देताच राष्ट्रवादीचे काही नेते राणे यांच्या प्रचारसभेत सहभागी झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत अनेकांनी राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस नेते नारायण राणे व त्यांच्या समर्थकांनी कायमच दुजाभाव दर्शविला. सत्तेत ५० टक्के वाटा हवा, अशा मागण्या करत नीलेश राणे यांच्या प्रचारसभांत सहभागी व्हायचे नाही, असे ठरविले.
शनिवारच्या बैठकीत हे ठरल्यानंतर प्रदेशाध्यक्ष, संपर्कमंत्र्यांशी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी चर्चा केली. राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह असल्याने राणे यांच्या प्रचारकार्यात सहभागी होण्याच्या भूमिकेबाबत दुहेरी भूमिका ठरली.
संपर्कमंत्री मुश्रीफ यांच्याशी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी भ्रमणध्वनीवरून पत्रकारांशी संपर्क साधून दिला तेव्हा मुश्रीफ म्हणाले, आघाडी धर्माचे पालन करा आणि प्रचारात सहभागी होण्याचा संदेश पवार यांनी दिला आहे. जिल्ह्यातील तंटे मिटविण्यास कोणीही नेता येण्याची शक्यता नाही, असे समजते. राणे यांच्या निवडणूक प्रचारसभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवराम जाधव, प्रवीण भोसले, दीपक केसरकर व इतरांनी सहभाग घेतला. राणे यांनी सर्वाना निमंत्रण दिले होते.