Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

आयुष क्लस्टर योजनेंतर्गत धामणी येथे १३ कोटींचा प्रकल्प
जितेंद्र पराडकर
संगमेश्वर, ६ एप्रिल

 

भारतीय वैद्यक विभागातील औषधांची होणारी वार्षिक उलाढाल पाच हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तरीही जागतिक व्यापारात भारताचे स्थान नगण्यच आहे. आयुर्वेदाचे मूळ भारतात असताना चीनने या व्यापारात घेतलेली आघाडी पाहता केंद्र सरकारने सन २००७ मध्ये आयुष क्लस्टर योजना हाती घेतली. या योजनेंतर्गत कोकणसाठी मंजूर झालेल्या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच धामणी येथे ‘कोकण आयुष क्लस्टर’ समूहाच्या वतीने करण्यात आले. या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्याची ग्वाही समूहातर्फे देण्यात आली.
‘आयुष क्लस्टर’ ही योजना संपूर्ण देशात राबविली जाणार असून कोकणात दुर्मिळ आयुर्वेदिक वनौषधी असतानाही तेथे हा प्रकल्प राबविण्यासाठी कोणीही पुढे येण्याचे धाडस करत नव्हते. या प्रकल्पासाठी आयुर्वेदिक वनौषधींद्वारा उत्पादन घेणाऱ्या १५ उद्योगांची समूह होण्यासाठी गरज असल्याने कोकणातील आर्यवेद, श्रीराम औषधालय, श्रीकृष्ण औषधालय, लक्ष्मीकेशव औषधशाळा, कृपा औषधालय, सिद्धगिरी फार्मा, सिमको, दवे आयुर्वेद भवन, कमल प्रॉडक्टस्, शक्ती उद्योग, सुखदा प्रॉडक्टस्, अनंतानंद, सुदर्शन आयुर्वेद, श्री धन्वंतरी फार्मसी, पीतांबरी उद्योग समूह या १५ उद्योग समूहांनी एकत्र येऊन ‘कोकण आयुष क्लस्टर’ची स्थापना केली व अनंत अडचणींवर मात करत केंद्र सरकारची परवानगी मिळविली.
प्रकल्पांतर्गत चालू असणाऱ्या उद्योगांच्या क्षमतावाढीसाठी कच्चा माल संकलित करणे, साठवणे, प्रमाणीकरण प्रयोगशाळा, संशोधन व औद्योगिक विकास केंद्र, ग्रंथालय संशोधन व प्रमाण नोंदणीकृत केंद्र, औषधी निर्माण संदर्भात बहुआयामी क्षमतावाढ प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश आहे.
या प्रकल्पामुळे किमान ५०० व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून एक हजार हेक्टर क्षेत्रावर आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जाणार आहे. लागवडी पश्चात खरेदीची हमी दिली जाणार असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. वनौषधी संवर्धन, संकलन, साठवण प्रक्रिया विस्तार योजना, बागायती शेतीमालावरील मूल्यवर्धन प्रक्रिया योजना यासह येथील संशोधन केंद्रात विशेष चिकित्सा केंद्र, विविध आरोग्य योजना, आयुर्वेद व योग प्रचार-प्रसार योजना, आयुर्वेद ग्राम योजना, माता-बाल आरोग्यदायी योजना आदींचा समावेश आहे. या योजनेमुळे कोकण विभागातील १३० उत्पादकांचा मिळून असणारा औषध व्यापार सध्या जो ७५ ते १०० कोटींचा आहे; तो पाच वर्षांत दुप्पट होईल. विविध बागायती व औषधी उत्पन्नांवर संशोधन व उत्पादन विकास, स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजार व्यवस्थेत स्थान, शेतीला जोड उत्पन्न व किफायतशीर पर्यायांचा मागोवा, मूल्यवर्धन प्रक्रियांवर संशोधन व प्रमाणीकरण, अनेक आरोग्यदायी व किफायतशीर आयुर्वेदोपचार योजना, विशेष बहुविध व बहुआयामी प्रशिक्षण केंद्र आदी सुविधा धामणी येथे लवकरच उपलब्ध होणार असल्याची ग्वाही समूहाने दिली.