Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

चिपळूण तालुक्यात कुक्कुटनिर्मिती प्रकल्प
धीरज वाटेकर
चिपळूण, ६ एप्रिल

 

कुक्कुटपालन या विषयात कोकणात असलेला दुष्काळ संपण्याची दाट चिन्हे दिसून येत आहेत. कोकणात पहिला कुक्कुट निर्मितीचा प्रकल्प चिपळूण तालुक्यात सुरू होत आहे. त्यासाठी शासनाने ४.५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातील २.५० कोटीचा पहिला हप्ता येथील पशुधन विकास विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे लवकरच कळंबस्ते येथे अत्याधुनिक सुविधेने अंडी व पक्षी निर्मिती केली जाणार आहे. यामुळे या व्यवसायातील विक्रेत्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.
कळंबस्ते येथे महाराष्ट्र शासन पशुधन विकास विभागाची विविध कार्यालये आहेत. यामध्ये पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र व कुक्कुट विकास प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. तेव्हापासून या प्रकल्पाद्वारे कुक्कुट व्यवसाय करणाऱ्यांना व गरजू व्यक्तींना पाळीव पक्षी शासकीय किंमतीत दिले जात आहेत. रोजगाराच्या दृष्टीने हा प्रकल्प अनेकांसाठी उपयुक्त ठरला असून येथील अधिकारीही त्यासाठी प्रयत्न करीत होते. यामध्ये दोन पोल्ट्री बांधण्यात आल्या असून त्यांची पार दुरवस्था झाली आहे. या पोल्ट्रीतील पाऊण भाग हा सध्या निधीअभावी ओस पडला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला काहीशी उतरती कळा आली असून तो बंद होण्याच्या मार्गावर होता. याबाबत पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी लक्ष घालून एका कार्यक्रमासाठी आलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यांना तेथील जागेची पाहणी करण्याची विनंती केली. त्यानुसार शासनाने पशुधन विकास कार्यालये व कुक्कुट निर्मिती प्रकल्पांसाठी ४.५० कोटी मंजूर केले. या प्रकल्पात आणण्यात येणारे पक्षी हे कोल्हापूर, पुणे येथून आणावे लागत होते. २१० रुपयांच्या किंमतीत चार कोंबडय़ा व एक कोंबडा अशी त्यांची विक्री केली जात होती. कोकणात अशा पक्ष्यांची व त्यांच्या अंडय़ांची निर्मिती करणारा एकही प्रकल्प नसल्याने त्यावर शासनाला लाखो रुपये खर्च करावा लागत आहे, तसेच कुक्कुट व्यावसायिकांचीही मोठी गैरसोय होत होती. मात्र शासनाने हा निधी उपलब्ध केल्याने या कार्यालयांच्या सुशोभीकरणाबरोबरच कुक्कुट निर्मितीचा प्रकल्प उभा राहणार असल्याने कुक्कुट व्यवसाय करणाऱ्यांसाठी तो एक दिलासा ठरला असून आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळणार आहे. या निधीतून पक्षी व त्यांची अंडय़ांच्या निर्मितीसाठी जनरेटर व विविध यंत्र खरेदी करण्यात येणार आहेत. या प्रकल्पातून यापुढे प्रजनन केलेले पक्षी, खायची अंडी व प्रजननासाठी वापरण्यात येणाऱ्या अंडय़ांची विक्री केली जाणार आहे.