Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

आदर्श कलाशिक्षक गणपत वाळवेकर यांचे मुंबईत चित्रप्रदर्शन
अलिबाग, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

 

सातत्याने चित्रकलेचा ध्यास घेतलेले निवृत्त कलाशिक्षक गणपत वाळवेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीसमोरील आर्ट प्लाझा येथे १३ ते १८ एप्रिल २००९ या कालावधीत भरणार आहे. सकाळी ११ ते ५ या वेळेत सर्वाना पाहण्याकरिता खुले राहणार आहे. मुंबईतील कलादालनात आपल्या कलाकृती प्रदर्शनाच्या माध्यमातून सादर करणारे निवृत्त आदर्श कलाशिक्षक वाळवेकर हे रायगड जिल्ह्यातील पहिलेच आहेत.
अलिबाग तालुक्यातील हाशिवरे हायस्कूल येथे आपल्या कलाशिक्षक पेशास प्रारंभ केलेल्या वाळवेकर यांनी पुढे अलिबाग येथील को.ए.सो.ज.अ. वैद्य हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून सेवा केली. या शाळेत कार्यरत असताना शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी घडवून शासकीय ड्रॉइंग ग्रेड परीक्षांची सुविधा उपलब्ध करून दिली. दहावी-बारावीनंतर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेताना ड्रॉइंग ग्रेड परीक्षांच्या गुणांना प्राधान्य असते याची जाणीव पालकांना करून देऊन, अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी या संधीचा लाभ करून दिला. शाळेतील सकाळी ११ ते ५ अशी कलाशिक्षक म्हणून त्यांनी केवळ नोकरी केली नाही, तर २४ तासांचा एक कला मार्गदर्शक म्हणून ते सातत्याने कार्यरत राहिल्याने, विद्यार्थीच नव्हे तर पालकवर्गातही लोकप्रिय झाले. वैद्य हायस्कूलमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर चित्रकलेचे सातत्य राखूनच त्यांनी छायाचित्रणाचा आपला छंद पूर्णवेळ जोपासून, सेवानिवृत्तीनंतर ते एक छायाचित्रकार अशी एक आपली नवी ओळख सर्वाना करून दिली, हे वैशिष्टय़पूर्णच म्हणावे लागेल.
वाळवेकर यांना २००३ मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श कलाशिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले, तर कलाध्यापक महामंडळातर्फे आदर्श कलाध्यापक म्हणून २००३ मध्येच राज्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आह़े कलाध्यापक संघातर्फे झालेल्या निसर्गचित्र स्पध्रेत २००२ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक संपादन केला आहे. कोकण एज्युकेशन सोसायटी सेवक चित्र स्पध्रेत सन १९७८ व १९८७ मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला़ ‘लोकसत्ता’ आयोजित ‘गाथा बालवीरांची’ या स्पध्रेचे सन २००१ मध्ये त्यांनी परीक्षण केल़े रायगड जिल्हाधिकारी आयोजित रायगड जिल्हा एड्स जनजागृती स्पध्रेचे २००२ साली परीक्षण केल़े गणेशोत्सवात सजावट व परीक्षण केल़े यांचे अनेक विद्यार्थी नामांकित कलावंत म्हणून कार्यरत आहेत़ निसर्गरम्य अशा अलिबाग परिसरातील बहुतांश निसर्गचित्रे मुंबईतील प्रदर्शनात आता पाहता येणार आहेत.
सकाळी ११ ते ५ या वेळेत सर्वाना पाहण्याकरिता खुले राहणार आहे.