Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

ठाणे जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांमुळे पोलीस दलात नाराजी
नालासोपारा, ६ एप्रिल/वार्ताहर

 

ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांची जागा रिकामी, जिल्ह्यात गुन्हेगारीत झालेली वाढ अशा परिस्थितीत अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, पोलीस दलातही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी त्यांच्या जागेवर कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यांचे काम प्रभारी अधीक्षक म्हणून वसईचे अतिरिक्त अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर हे पाहात आहेत. ठाणे जिल्ह्यात विशेषत: वसई तालुक्यात गुन्ह्यांचे प्रमाण अतोनात वाढले आहे. गेल्या महिन्यात फक्त नालासोपारा शहरातच तीन-चार खून झाले. इतर गुन्हे तर अनेक आहेत. मीरा रोड, भाईंदरही त्यात मागे नाही. अशा परिस्थितीत पोलीस खात्याला एखादे चांगले नेतृत्व देण्याऐवजी पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात ५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत आणि १३ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकांची जागा आहे. असे असतानाही मीरा रोड येथील पोलीस निरीक्षक पिंगळे यांची बोईसर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. अशा प्रकारे सहाय्यक पोलीस निरीक्षक वडमारे, पाटील यांच्यासह अनेकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ अधिकारी असतानाही त्यांच्या बदल्या करण्यात न आल्यामुळे डॉ. शशिकांत महावरकर यांनी स्वत:च्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना हवे ते पोलीस स्टेशन दिल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.