Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

पालघरच्या माकप उमेदवाराला लोकभारतीचा पाठिंबा
डहाणू, ६ एप्रिल/वार्ताहर

 

पालघर लोकसभा मतदारसंघातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार ल. शि. कोम यांना लोकभारती पक्षाचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.
लोकभारती पक्षाचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कॉ. ल. शि. कोम यांची चिंचणी येथे अनेक कार्यकर्त्यांंसमवेत बैठक घेण्यात आली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला लोकभारतीचे जिल्हाध्यक्ष विनित पाटील, अशोक सावे, अमोल मंत्री, विनित सावे, हर्षल सावे, अशोक जोशी, वैभव पालवे, परेश बार्टी, रामचंद्र पुरी इत्यादी नेते आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे पक्षाचे धोरण आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील डहाणू आणि पालघरच्या बंदरपट्टी भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेली ४० हजार मते आहेत. इतकेच नव्हे तर वसई आणि नालासोपारा, तसेच बोईसर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पक्षाध्यक्षांशी बोलणी करण्यात आलेली आहेत. या निवडणुकीत निश्चितपणे परिवर्तन घडेल, असे सांगून या बैठकीत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका स्पष्ट केली.