Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
राज्य

कोकणच्या विकासासाठी नीलेशला विजयी करा -नारायण राणे
रत्नागिरी, ६ एप्रिल/ खास प्रतिनिधी

राज्यात शिवसेना आणि केंद्रातील भाजपाप्रणीत लोकशाही आघाडीने सतत जनतेची फसवणूक केली, याची नोंद घेऊन कोकणच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश राणे यांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा राणे यांच्या उपस्थितीत आज येथे आयोजित करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीत संवेदनाक्षम केंद्रे निश्चित
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, ६ एप्रिल

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत संवेदनाक्षम मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दलाचे कर्मचारी असतील. प्रत्येक मतदाराचे स्वतंत्र फोटो घेण्याची तजवीजही केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भारताच्या निवडणूक आयोगाने कडक धोरण अवलंबिले आहे. काही मतदान केंद्रांवर सर्वाधिक मतदान एकाच राजकीय पक्षाला होते. त्याची नोंद आयोगाने घेतली आहे.

नीलेश राणे यांच्या प्रचारावर राष्ट्रवादीचा बहिष्कार!
सावंतवाडी, ६ एप्रिल/वार्ताहर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आल्याने काँग्रेस आघाडीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारात सहभागी होऊ नये, अशी मागणी काही जणांनी जिल्हा बैठकीत केल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रचारात सहभागी व्हा, असा शरद पवार यांचा संदेश देताच राष्ट्रवादीचे काही नेते राणे यांच्या प्रचारसभेत सहभागी झाले.

आयुष क्लस्टर योजनेंतर्गत धामणी येथे १३ कोटींचा प्रकल्प
जितेंद्र पराडकर
संगमेश्वर, ६ एप्रिल

भारतीय वैद्यक विभागातील औषधांची होणारी वार्षिक उलाढाल पाच हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तरीही जागतिक व्यापारात भारताचे स्थान नगण्यच आहे. आयुर्वेदाचे मूळ भारतात असताना चीनने या व्यापारात घेतलेली आघाडी पाहता केंद्र सरकारने सन २००७ मध्ये आयुष क्लस्टर योजना हाती घेतली. या योजनेंतर्गत कोकणसाठी मंजूर झालेल्या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच धामणी येथे ‘कोकण आयुष क्लस्टर’ समूहाच्या वतीने करण्यात आले.

सासऱ्याच्या घरावर टिप्पर चढवला; दोन ठार, पाच जखमी
चंद्रपूर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

क्षुल्लक कारणावरून सासऱ्यासोबत झालेल्या भांडणाचा काटा जावयाने रागाच्या भरात सासऱ्याच्या घरावर टिप्पर चढवला. त्याखाली आल्याने सासरा रामचंद्र सिडाम (५०) व साळी मंगला रामचंद्र सिडाम (१७) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पाचजण जबर जखमी झाले. गडचांदूर येथील सिंचन वसाहतीत सिडाम यांचे घर आहे. रविवारी रात्री तिघेही झोपले असताना जावई सीताराम देवकर याने दारूच्या नशेत परिसरात धिंगाणा घातला. व टिप्पर चालवत थेट सिडाम यांच्या झोपडीवर चढवला. टिप्पर वेगात असल्याने झोपडी जमीनदोस्त झाली व झोपडीतील गाढ झोपेत असलेल्या रामचंद्र सिडाम व त्यांची मुलगी मंगला यांना चिरडले. काही कळायच्या आत या धावपळीत घराशेजारील शीला तनोडे यांची झोपडी उध्वस्त झाली. या घटनेत रामचंद्र व मंगला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

बॉम्बच्या अफवेने नागपूर विमानतळावर धावपळ
नागपूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी

बॉम्बच्या अफवेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सकाळी तासभर धावपळ उडवून दिली. विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ सकाळी एक प्लास्टिकची पिशवी बराचवेळ पडून होती. हळूहळू ही बाब विमानतळावरील सुरक्षा रक्षकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत पसरली. विविध विमान कंपन्यांचे कर्मचारीही तेथे होते. त्या पिशवीत बॉम्ब तर नसेल ना, या शंकेने सर्वाच्याच काळजाचे ठोके चुकले. येणारे-जाणारे सर्वच त्या पिशवीकडे साशंकतेने बघत होते. विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सोनेगाव पोलीस ठाण्याला हे कळवले. त्यावेळी विमानतळावर प्रवाशांची गर्दी होती. खबरदारीचा उपाय म्हणून हे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. सोनेगाव पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाला कळवले. हे पथक तातडीने तेथे पोहोचले. पथकातील एका कर्मचाऱ्याने ती पिशवी अलगद उचलली आणि विमानतळापासून काही अंतरावर मोकळ्या भागात नेली. बॉम्बशोधक व नाशक श्वान व यंत्राने ती तपासली असता त्यात स्फोटक नसल्याचा निष्पन्न झाले. पिशवी उघडली असता त्यात ५ रोपटी होती. सर्वानीच सुटकेचा श्वास सोडला. या पिशवीने मात्र विमानतळावर तासभर धावपळ उडवून दिली.

चकमकीत दोन नक्षलवादी ठार?
गडचिरोली, ६ एप्रिल/ वार्ताहर

भामरागड परिसरातील पोयरकोठी जंगलात आज सकाळी नक्षलवादी व पोलीस पथकात चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवादी जखमी अथवा मृत झाल्याचा संशय आहे. सोमवारी सकाळी पोयरकोठी परिसरात गडचिरोली पोलीस व विशेष कृती दल नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. प्रतिउत्तरादाखल पोलिसांनीसुद्धा गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दोन जागी रक्त पडल्याचे दिसून आले. त्यावरून नक्षलवादी जखमी अथवा मृत पावल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

रायगड लोकसभा मतदारसंघात सात उमेदवारांचे अर्ज वैध
अलिबाग, ६ एप्रिल/ प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या आज झालेल्या अर्ज छाननीत सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निपुण विनायक यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरावरिल मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या वैध उमेदवारांमध्ये शिवसेनेचे अनंत गीते (रा. अंधेरी-मुंबई), इंडियन नॅशनल काँग्रेसचे बॅ. ए.आर. अंतुले (रा. अंबेत-म्हसळा) व बहुजन समाज पार्टीचे किरण बाबुराव मोहिते (रा. नाशिक ) यांचा समावेश आहे. तर अन्य उमेदवारांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे एकनाथ अर्जुन पाटील (रा. दादर-पेण), अपक्ष अ‍ॅड़ प्रवीण मधुकर ठाकूर (रा. अलिबाग), अपक्ष डॉ़ सिद्धार्थ पाटील (वाशी-पेण) व अपक्ष सुनील भास्कर नाईक (सायन कोळीवाडा-मुंबई) यांचा समावेश आहे.