Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
क्रीडा

विजयाकडे
न्यूझीलंड ४ बाद १६७ , भारताला हवेत आणखी सहा बळी

वेलिंग्टन, ६ एप्रिल / पीटीआय

तब्बल ४१ वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिकाविजय साकारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून न्यूझीलंडची ४ बाद १६७ अशी अवस्था केल्यानंतर आता विजयासाठी भारताला आणखी सहा किवी फलंदाजांना टिपायचे आहे. भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत आधीच १-० अशी आघाडी घेतलेली असल्यामुळे जरी हा सामना अनिर्णीत राहिला तरीही भारतीय संघाचा मालिका विजय निश्चित असेल. मात्र या मालिकेतील भारताचा वरचष्मा पाहता कसोटी विजयासह मालिका २-० अशी जिंकण्याच्या दिशेने भारतीय संघाची कूच सुरू आहे. भारताने पहिल्या डावात १८२ धावांची मोठी आघाडी घेतली होती. तर भारताने दुसऱ्या डावात ४३४ धावा करून ही आघाडी ६१७ धावांपर्यंत वाढवून आपली स्थिती अधिक भक्कम केली. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था ४ बाद १६७ अशी झाली मात्र मंद प्रकाशामुळे २१ षटके आधीच खेळ थांबवावा लागल्याने किवींना दिलासा मिळाला.

डाव सोडण्यात उशीर केला - मॅक्क्युलम
वेलिंग्टन, ६ एप्रिल, वृत्तसंस्था

भारताने आपला डाव सोडण्यात दिरंगाई केल्याने आम्हाला आश्चर्य वाटले, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा यष्टिरक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम याने आज व्यक्त केली. चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मॅक्क्युलम म्हणाला की, उद्या पाचव्या दिवशी पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. तसे झाले तर भारताला विजय मिळविणे शक्यच होणार नाही. म्हणूनच भारताने डाव सोडण्यात उशीर केल्याने आम्हाला आश्चर्य वाटले.

डाव घोषित करण्याचा निर्णय योग्य - युवराज
वेलिंग्टन, ६ एप्रिल/ वृत्तसंस्था

कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने भारताचा दुसरा डाव सोडण्यात मुळीच दिरंगाई केली नाही, असे भारताचा मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग याने सांगितले. चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना युवराज म्हणाला की, दुसऱ्या डावात आमची जास्तीत जास्त धावा करण्याची इच्छा होती. त्यामुळेच आम्ही ६१७ धावांचे उद्दिष्ट न्यूझीलंडपुढे ठेवले. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताकडे ५३१ धावांची आघाडी होती.

महिला क्रिकेट : ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संभाव्य ३० जणांचा संघ जाहीर
नवी दिल्ली, ६ एप्रिल/ पीटीआय
महिलांची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जून महिन्यात इंग्लंडमध्ये रंगणार असून त्यासाठी ३० संभाव्य खेळाडूंची यादी आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये दुखापतीमुळे नोव्हेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकलेल्या अनुभवी सलामीवीर जया शर्माला संधी देण्यात आली आहे.

मरेने जिंकले मयामी ओपनचे जेतेपद
मयामी, ६ एप्रिल/ पीटीआय

ब्रिटनच्या चौथ्या मानांकित अ‍ॅन्डी मरेने सर्बियाच्या तिसऱ्या मानांकित नोवाक जोकोविचला अंतिम सामन्यात नमवून सोनी एरीक्सन खुल्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले आहे. मरेने जोकाविचला ६-२, ७-५ असे नमवित कारकिर्दीतले अकरावे तर या मोसमातील तिसऱ्या एटीपी जेतेपदाला गवसणी घातली आहे.

अख्तरला पीसीबीची दुहेरी भेट
ट्वेन्टी-२० विश्वचषकासह ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतही अख्तरची निवड
कराची, ६ एप्रिल/ पीटीआय
वादाशी जवळीक साधणारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आज दुहेरी भेट दिली आहे. दुबई आणि अबूधाबी येथे २२ एप्रिल ते ७ मे दरम्यान होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अख्तरला संधी देण्यात आली असून ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी म्निवडण्यात आलेल्या संभाव्य ३० जणांच्या यादिमध्येही शोएबची निवड करण्यात आलेली आहे.

विश्व तिरंदाजी स्पर्धेत भारतीय त्रिकूटाला सुवर्णपदक
चाम्पिया, तालुकदार आणि बॅनर्जी यांनी केली सुवर्ण कामगिरी
कोलकाता, ६ एप्रिल/पी.टी.आय.
मंगल सिंग चाम्पिया, जयंता तालुकदार आणि राहुल बॅनर्जी या भारतीय त्रिकुटाने विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारताला सांघिक स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवून दिले. डॉमिनिकन प्रजासत्ताकाच्या सॅन्टो डॉमनिगो येथील या स्पर्धामध्ये या त्रिकुटाच्या सलग दुसऱ्या सुवर्णपदकासह भारताने एकूण तीन पदके पटकावली.

इंग्लंडच्या ट्वेन्टी २० संघातून कर्णधार स्ट्रॉसलाच अर्धचंद्र
लंडन, ६ एप्रिल/ पीटीआय

आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी २० क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या इंग्लंडच्या संभाव्य ३० खेळाडूंच्या संघातून कसोटी व एकदिवसीय संघाचा कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसलाच अर्धचंद्र देण्यात आला आहे. या स्पर्धेचे यजमान असलेल्या इंग्लंडने आपला संभाव्य संघाची घोषणा उशिरानेच केली असून कर्णधाराचे नावही अद्याप निश्चित केलेले नाही. रॉबर्ट के व दिमित्री मस्कॅरिन्हास यांच्यात कर्णधारपदासाठी चुरस आहे.

एमसीएच्या वातानुकूलित क्लबमध्ये ‘पंचतारांकित’ दराने फुटतोय घाम!
मुंबई, ६ एप्रिल/क्री.प्र.

गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील रिक्रिएशन सेंटरच्या बाबतीत सदस्यांमध्ये नाराजीचा सूर उमटायला लागला आहे. नाराजीचे प्रमुख कारण आहे, तेथील अवास्तव दर आणि क्रीडा सुविधांसाठी आकारण्यात येणारी प्रचंड फी. पंचतारांकित हॉटेलच्या बरोबरीचे दर असणारे मेनू कार्ड पाहून सर्वच सदस्यांना घाम फुटला आहे आणि आता त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठविला आहे. त्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे तक्रारी करण्यात आल्या असून संघटना आणि रिक्रिएशन सेंटरचे संचालक यांच्याशी त्यासंदर्भात बोलणी सुरू आहेत.

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना वाचविणाऱ्या बसचालकाचे कौतुक
कोलंबो, ६ एप्रिल / पीटीआय

पाकिस्तान दौऱ्यादरम्यान केवळ बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे श्रीलंकेचे क्रिकेटपटू बचावले होते. त्याच बसचालकाचा सत्कार श्रीलंका क्रिकेट बोर्डातर्फे आज करण्यात आला. मेहेर मोहम्मद खलील या बसचालकाने त्यावेळी श्रीलंका संघाला घेऊन जाणारी बस गद्दाफी स्टेडियममध्ये सुरक्षित ठिकाणी वळविली होती. त्यामुळे हे सर्व खेळाडू दहशतवाद्यांच्या गोळ्या चुकवून मृत्युच्या दाढेतून परतले होते. खलील आणि त्यांची पत्नी यांचा श्रीलंका क्रिकेटतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांना १० लाखांचा धनादेश देण्यात आला तसेच २५०० अमेरिकन डॉलरचे खास इनामही देण्यात आले. क्रीडा मंत्री गामिनी लोकुगे, श्रीलंकेचे अनेक क्रिकेटपटू व बोर्डाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय संघ खरे तर यादरम्यान पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होता, पण तो दौरा रद्द झाल्यानंतर श्रीलंकेने दौऱ्यावर जाण्याची तयारी दर्शविली. त्याची आठवण करून दिल्यावर खलील म्हणाले की, धोनीचा संघदेखील याठिकाणी असता तरी मी अगदी हेच केले असते.

खारमध्ये टेबल-टेनिस प्रशिक्षण शिबीर
मुंबई, ६ एप्रिल/क्री.प्र.

सेंटर फॉर एक्सलन्स इन टेबल टेनिस आणि खार एज्युकेशन सोसायटीच्या श्री मुंबादेवी विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल ते ४ जून या कालावधीत टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्युनियर भारतीय टेबल टेनिस संघाचे प्रशिक्षक जगदीप भिवंडकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ शिबीरार्थीना होणार असून दोन-दोन आठवडय़ांच्या चार शिबीरात मुलांच्या गुणवत्तेप्रमाणे सकाळ व सायंकाळच्या सत्रात त्यांची विभागणी करण्यात येईल. १० ते २३ एप्रिल, २४ एप्रिल ते ७ मे, ८ ते २१ मे आणि २२ मे ते ४ जून या कालावधीत होणाऱ्या या शिबीरांत प्रगत, नियमित आणि नवोदित तसेच १२ वर्षांखालील मुले अशी विभागणी करण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. या शिबीरासाठी १८० रुपये शुल्क आकारण्यात येणार असून महाराष्ट्र किंवा जिल्हा संघाचे किंवा १२ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसाठी शिबीर शुल्कात ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९८२१२०७००७/ ९९८७३३१८८८ येथे संपर्क साधावा.

कबड्डी प्रशिक्षण शिबीर
मुंबई, ६ एप्रिल/क्री.प्र.
ओम कबड्डी प्रबोधिनी व कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १८ एप्रिल या कालावधीत १६ वर्षांखालील मुला-मुलींकरिता मोफत कबड्डी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार क्रीडा मंडळ- एलफिन्स्टन येथील भव्य क्रीडांगणावर घेण्यात येणाऱ्या या शिबिरात अर्जुन पुरस्कार प्राप्त माया मेहेर-आक्रे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सिताराम साळुंखे, तारक राऊळ, शेखर शेट्टी, एन.आय.एस. प्रशिक्षक जीवन पैलकर, राष्ट्रीय खेळाडू चंदाराणी बोबाटे, राजू कवळे आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.सायंकाळी ४.०० ते ७.०० या वेळेत घेण्यात येणाऱ्या या शिबिरात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रमोद पेंडुरकर (९८६९४४२४५४), अनिल नागवेकर (९८९२७२८०८४), रमेश लांबे (९८६९५७२३००), शशिकांत राऊत (९८६९५००४०१) यांच्याशी ९ एप्रिलपर्यंत संपर्क साधावा. सर्व सहभागी खेळाडूंनी १० एप्रिल रोजी ५ वाजता नावनोंदणीकरिता कामगार कल्याण मंडळ, एल्फिन्स्टन येथे उपस्थित राहावे, असे प्रबोधिनीचे कार्यवाह जीवन पैलकर यांनी कळविले आहे. प्रवेश अर्ज- प्रमोद पेंडुरकर, १८३/१८९, रामजी माधवजी चाळ, लोअर परळ, वंदेमातरम क्रीडा मंडळ येथे उपलब्ध होतील.

हॅडलीकडून स्तुती हा सुखद धक्का - सचिन
वेलिंग्टन, ६ एप्रिल / वृत्तसंस्था

न्यूझीलंडचा महान अष्टपैलू खेळाडू रिचर्ड हॅडली याने केलेली स्तुती हा माझ्यासाठी सुखद धक्काच होता, असे मनोगत सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले. क्रिकेट विश्वातील सार्वकालिक महान फलंदाज अशा शब्दांत हॅडलीने सचिनची प्रशंसा केली होती. हॅडलीने सचिन हा ब्रॅडमनपेक्षाही महान असल्याचे म्हटले होते. सचिन म्हणाला की, हॅडलीसारख्या सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूने माझी प्रशंसा करावी, ही माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. आतापर्यंत कोणीच मला इतक्या उंचीवर नेऊन ठेवले नव्हते. त्यामुळे हॅडलींचे वक्तव्य वृत्तपत्रांतून वाचल्यावर मला खूप आनंद झाला.

संघाचा एकच कर्णधार असावा- मॅक्ग्रा
नवी दिल्ली, ६ एप्रिल/ पीटीआय
जॉन बुकानन यांची एकापेक्षा जास्त कर्णधार खेळविणयाची ‘थिअरी’ पटणारी नसून प्रत्येक संघाचा एकच कर्णधार असावा, असे मत ऑस्ट्रेलियाचा महान मध्यमगती गोलंदाज आयपीएलमधील दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाताल अनुभवी खेळाडू ग्लेन मॅक्ग्रा याने व्यक्त केले आहे. बुकानन जेव्हा ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक होते तेव्हा त्यांचे मार्गदर्शन मला लाभले होते. त्यामुळे मी त्यांच्या या सर्व थिअरी मला चांगल्याच माहिती आहेत. मला माहित नाही त्यांना या सर्व कल्पना कशा काय सुचतात. हे सारे अनाकलनीय असून मी संघाचा एकच कर्णधार असावा या मताचा आहे, असे मॅक्ग्राने सांगितले. संघाचा कर्णधार हा त्याच्याकडे असलेला अनुभव संघातील युवा खेळाडूंसमोर मांडत असतो. ज्यामधून संघातील युवा खेळाडूंना बरेच काही शिकण्यासारखे असते. तो जरी युवा खेळाडूंशी सहजपणे वागत असला तरी दिवसाच्या शेवटी तो एक कर्णधार असतो. संघात असा एकच खेळाडू असायला. नाही तर बरेच जणांचे ऐकल्यानंतर त्या युवा खेळाडू गोंधळून जाऊ शकतो, असेही त्याने सांगितले.

बुकानन यांची ‘थिअरी’ समजण्यास कठीण- फ्लेमिंग
चेन्नई, ६ एप्रिल/ पीटीआय
कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षक जॉन बुकानन यांनी एकापेक्षा जास्त कर्णधार नेमण्याची वेगळीच ‘थिअरी’ मांडलेली असून ती समजण्यास कठीण आहे. ती समजून घेण्यासाठी वाट पहावी लागेल. बुकानन हे सतत काही ना काही तरी प्रयोग करत असतात. कधी त्यांच्या प्रयोगांना यश येते किंवा कधी ते फसतातही. या प्रयोगाचे काय होते हे पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे, असे मत न्यूझीलंडचा कर्णधार स्टीफन फ्लेमिंग याने मांडले आहे.

अझलन शाह हॉकीतील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात
मलेशियाने इजिप्तला ४-१ असे नमविले
इपोह, ६ एप्रिल / पीटीआय
पाठोपाठ स्वीकाराव्या लागलेल्या पराभवांमुळे पाकिस्तान हॉकी संघाचे अझलन शाह हॉकी स्पर्धेतील आव्हान अकाली संपुष्टात आले आहे. न्यूझीलंडकडून २-३ अशा फरकाने पाकिस्तानचा पराभव झाला. काल मलेशियाकडूनही त्यांना याच फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.दरम्यान, आज मलेशियाने इजिप्तचा ४-१ असा पराभव करीत अंतिम फेरीच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकले आहे. पाच राष्ट्रांतील या स्पर्धेची अंतिम फेरी १२ एप्रिलला होणार आहे. न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यातील लढत अटीतटीची झाली, पण अखेर न्यूझीलंडने ६८व्या मिनिटाला बरोबरी फोडणारा गोल करीत विजय निश्चित केला.