Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

अर्जासोबत शक्तिप्रदर्शन
ठाणे/प्रतिनिधी

शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय आणि समाजवादी पार्टी आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांनी आज ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले.
बहुजन समाज पार्टीचे अवनिंद्र त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पार्टी कोणती भूमिका घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असताना सपाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा घोषित केला.

एक होती वालधुनी..
प्रशांत मोरे

औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाच्या नादात नैसर्गिक साधनांची मानवाने कशी धुळदाण उडवली, याचे अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण तालुक्यातून वाहणारी वालधुनी नदी हे ठळक उदाहरण आहे. सुमारे हजार वर्षांंपूर्वी या भागात वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी कृत्रिमरीत्या जो जलस्रोत तयार केला, ती म्हणजे वालधुनी नदी असे अभ्यासकांचे मत आहे. मात्र कृत्रिम असो वा नैसर्गिक एकेकाळी या परिसरातील जमीन सुजलाम् सुफलाम् करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या वालधुनी नदीचे सध्या एका मोठय़ा सांडपाण्याच्या नाल्यात रूपांतर झाले आहे. अगदी एक होती वालधुनी.., असे म्हणण्याइतपत आजची परिस्थिती आहे.

‘सेलिब्रेशन’च्या ग्राहकांची एकजूट!
ठाणे/प्रतिनिधी

खारघर येथील सिडकोच्या ‘सेलिब्रेशन’ गृहनिर्माण योजनेत फ्लॅटची ‘लॉटरी’ लागलेले ग्राहक आता मंदीच्या पाश्र्वभूमीवर सदनिकेची किंमत कमी करावी, यासाठी एकत्रित आले असून, या ग्राहकांनी ‘सिडको सेलिब्रेशन कृती समिती’ स्थापन केली आहे. सिडकोचे मार्केटिंग मॅनेजर मूर्ती यांच्याशी या ग्राहकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. १४ एप्रिलनंतर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसमवेत या प्रश्नावर बैठक बोलविण्याचे आश्वासन मूर्ती यांनी शिष्टमंडळास दिले.

चिंतामण वनगा फक्त १५ लाखांचे धनी!
ठाणे/प्रतिनिधी

सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात अर्ज भरताना अनेक उमेदवारांनी दिलेला मालमत्तेचा तपशील थक्क करून सोडणारा आहे. टोलेजंग बंगले अन् फ्लॅटस्, भपकेबाज मोटारी,
आलिशान फार्महाऊस, सोने व हिऱ्यांचे दागिने, लाखो रुपयांचे शेअर्स, लाखमोलाच्या जमिनी.. वर्णन वाचूनच मतदारराजा बावचळून जातो. तर दुसरीकडे दोन वेळा लोकसभेवर निवडून गेलेले भाजपचे पालघरमधील आदिवासी उमेदवार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांची २५ वर्षे सार्वजनिक जीवनात राहूनही मालमत्ता आहे फक्त १५ लाखांची! दोन वेळा संसदेत जाऊनही एवढी कमी मालमत्ता असलेले राष्ट्रीय पक्षाचे ते देशातील कदाचित एकमेव उमेदवार असावेत.

पाऊस येणार धावून, नाले जाणार वाहून
भगवान मंडलिक

महापालिका क्षेत्रात ‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानां’तर्गत नाले बांधणीचे काम सुरू आहे. यामधील काही नाल्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची, निविदेतील अटी-शर्ती न पाळता सुरू असल्याचे अहवाल पालिकेच्या दक्षता आणि गुणनियंत्रण विभागाने तयार केले आहेत. नाल्यांच्या कामासाठी लागणारे सिमेंट, रेतीचे प्रमाण, पाण्याचा वापर यामध्ये प्रचंड विसंगती असून, पालिकेने ठेकेदारांबरोबर केलेल्या अटी-शर्तीचे उल्लंघन बांधकाम करताना सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे. अशाच पद्धतीने या नाल्यांची कामे पूर्ण झाली तर ती पहिल्याच मुसळधार पावसात वाहून जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दामू शिंगडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल
वाडा/वार्ताहर

पालघर मतदारसंघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार दामू शिंगडा यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करणारे राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते आज शिंगडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मात्र उपस्थित राहिले. सलग १५ वी निवडणूक लढविणारे ते एकमेव उमेदवार आहेत. शिंगडा यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कैलास जाधव यांच्याकडे दाखल करण्यात आला.

राज ठाकरे जिल्ह्यात घेणार पाच सभा!
ठाणे/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार उतरविले असून, त्यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाच सभा आयोजित केल्या जाणार असून, शेवटची सभा ठाण्यातील सेंट्रल मैदानावर भरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मनसेचे नेते सतीश प्रधान यांनी दिली. ठाणे हे सुसंस्कृत व सुशिक्षितांचे शहर आहे. शहराची वेगळी संस्कृती आहे. या संस्कृतीला साजेसे उमेदवार देणाऱ्या शिवसेनेने यावेळी ही परंपरा मोडली. परंतु, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ती परंपरा कायम ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे ठाणेकरांनी मनसेला मत द्यावे, असे आवाहन मनसे नेते सतीश प्रधान यांनी केले. मनसेतर्फे भिवंडी, कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघांत अनुक्रमे देवराज म्हात्रे, वैशाली दरेकर व राजन राजे यांना मैदानात उतरवले आहे. उमेदवारांचा परिचय आणि मनसेची भूमिका याबद्दलची माहिती सतीश प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. मनसेचे ठाणे जिल्हा संपर्कनेते मनोज चव्हाण, ठाणे अध्यक्ष हरिमाळी, ठाणे जिल्हा चिटणीस राजन गावंड आदी पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

मुंबई रेल प्रवासी संघटनेची कल्याणात सभा
ठाणे/प्रतिनिधी-
मुंबईतील रेल प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध अशा ३० प्रवासी संघटना कार्यरत आहे. त्यातील मुंबई रेल प्रवासी ही सर्वात मोठी संघटना आहे. बरीच वर्षे या सर्व संघटना वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करीत असल्याने त्यांना इच्छित परिणाम मिळत नसल्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी, रेल्वे प्रशासनाविरुद्ध प्रभावीपणे लढण्यासाठी आणि सर्व संघटनांना एकत्रित करण्यासाठी ७ एप्रिल रोजी कल्याण येथील दत्ता देशमुख हॉल येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला सर्व संघटनांनी हजर राहावे, असे आवाहन मुंबई रेल प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन, सचिव रामचंद्र कर्वे, वांगणी प्रवासी संघटनेचे विश्वराम धात्रप यांनी केले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ९८६९१४१४३३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

पालघरच्या माकप उमेदवाराला लोकभारतीचा पाठिंबा
डहाणू/वार्ताहर

पालघर लोकसभा मतदारसंघातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार ल. शि. कोम यांना लोकभारती पक्षाचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. लोकभारती पक्षाचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कॉ. ल. शि. कोम यांची चिंचणी येथे अनेक कार्यकर्त्यांंसमवेत बैठक घेण्यात आली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला लोकभारतीचे जिल्हाध्यक्ष विनित पाटील, अशोक सावे, अमोल मंत्री, विनित सावे, हर्षल सावे, अशोक जोशी, वैभव पालवे, परेश बार्टी, रामचंद्र पुरी इत्यादी नेते आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे पक्षाचे धोरण आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील डहाणू आणि पालघरच्या बंदरपट्टी भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेली ४० हजार मते आहेत. इतकेच नव्हे तर वसई आणि नालासोपारा, तसेच बोईसर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पक्षाध्यक्षांशी बोलणी करण्यात आलेली आहेत. या निवडणुकीत निश्चितपणे परिवर्तन घडेल, असे सांगून या बैठकीत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

हत्येच्या कटप्रकरणी युवक काँग्रेसचा सरचिटणीस गजाआड
ठाणे/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर समाजवादी पार्टीचा नेता व माजी नगरसेवक रामनयन यादव याने केलेल्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट रचणाऱ्या ठाणे युवक काँग्रेसचे सरचिटणीस रमेशचंद्र गिरी व प्रकाश गिरी या दोघांना चार अग्निशस्त्र व आठ जिवंत काडतुसांसह उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली आहे. खून, दंगल, खुनाचे प्रयत्न, हाणामारी अशा प्रकारचे १४ गंभीर गुन्हे दाखल असलेला माजी नगरसेवक रामनयन यादव व त्याच्या सहकाऱ्यांनी नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत गुलाल उधळण्याच्या कारणावरून घडविलेल्या दंगलीत काँग्रेसचे कार्यकर्ते विजय ठाकूर यांची हत्या केली होती, तर रमेश गिरीसह अन्य कार्यकर्ते जखमी झाले होते. या खूनप्रकरणी फरारी झालेल्या यादव यांच्यावर सूड उगविण्यासाठी रमेश गिरी यांनी उत्तर प्रदेशातून चार अग्निशस्त्रे, आठ जिवंत काडतुसे आणली होती. या खुनाच्या कटाची माहिती पोलिसांना मिळताच उल्हासनगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने वैतीवाडीत सापळा रचून आरोपींना गजाआड केले. या आरोपींवर नौपाडा आणि श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत बुरडे यांनी दिली.

‘ब्रह्मांड कट्टा’चा शुभारंभ
ठाणे/प्रतिनिधी

ब्रह्मांड आझादनगर बस प्रवासी संस्थेतर्फे नुकताच ‘ब्रह्मांड कट्टा’चा शुभारंभ ब्रह्मांड फेज-६ अनमोल सृष्टी या सोसायटीमध्ये पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते दाजी पणशीकर यांनी केले. अध्यक्षस्थानी पत्रकार मिलिंद बल्लाळ, अभिनेते विघ्नेश जोशी हे होते. आसावरी पालवणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विजयनगरीचे अजय जोशी, भास्कर कॉलनी अत्रे कट्टय़ाच्या संपदा वागळे आदींनी ब्रह्मांड कट्टय़ाला शुभेच्छा दिल्या. महेश जोशी यांनी पणशीकर यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष बल्लाळ यांनी सांगितले की, नुसत्या उत्तुंग इमारती असून उपयोगाच्या नाहीत, तर त्याचबरोबर तेवढय़ाच उंचीच्या तोलामोलाच्या व्यक्तिमत्त्वांची आवश्यकता आहे. अशा व्यक्ती ठाण्यामध्ये असून त्याचा लाभ आपण सर्वानीच घेणे ही काळाची गरज आहे. आपल्या हिंदू संस्कृतीचा ऱ्हास कसा होत चाललेला आहे, याबाबत पणशीकर यांनी सोदाहरण स्पष्ट करून दाखविले, तसेच ब्रह्मांड कट्टय़ाला जी काही मदत लागेल त्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महेश जोशी यांनी आभार मानले.