Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
व्यक्तिवेध

अलीकडेच संपलेल्या ‘जी २०’ देशांच्या परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख डॉमिनिक स्ट्रॉस कान्ह यांनी जागतिक पातळीवर आलेल्या मंदीचे सावट दूर करण्यासाठी १०० अब्ज डॉलरचा निधी गरीब देशांना पुरविण्याचे आश्वासन दिले. आजवरच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या इतिहासात एवढी मोठी रक्कम देण्याची ही पहिलीच वेळ. एवढया मोठय़ा मदतीचा आराखडा तयार केला तो डॉमिनिक स्ट्रॉस कान्ह यांनी. गरीब देशांविषयी आपुलकी असलेले हे डॉमिनिक स्ट्रॉस कान्ह उर्फ डी.एस.के. आहेत तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडेल. २५ एप्रिल १९४९ रोजी जन्मलेले डी.एस.के. हे नामवंत फ्रेंच अर्थतज्ज्ञ,वकील व राजकारणी म्हणून ओळखले जातात. फ्रान्समधील सोशालिस्ट पक्षाचे सदस्य असलेल्या डी.एस.के. यांची २८ सप्टेंबर २००७ रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झाली.

 

फ्रान्समधील लिओनिल जॉस्पिन यांच्या सोशालिस्ट पार्टीच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. २००७ मध्ये त्यांनी सोशालिस्ट पार्टीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांचा त्यात पराभव झाला. डी.एस.के. यांचे व्यक्तिमत्व तसे चौफेर आहे. नॅशनल अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन स्कूल व एच.ई.सी. स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथे ते काही काळ प्राध्यापकही होते. पॅरिस शहरात ज्यू कुटुंबात जन्मलेल्या डी.एस.के. यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. बालपणीचा काही काळ मोरोक्कोत गेला. १९६० साली तेथे भूकंप झाल्यावर ते मोनॅको या देशात गेले. शालेय जीवनात डी.एस.के. नेहमी सर्वच बाबतीत आाडीवर असत. त्यांच्या उत्कृष्ट करियरची सुरुवात शालेय कालखंडातच सुरू झाली. पॅरिसमध्ये त्यांनी राज्यशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रात पी.एच.डी. केली. १९७७ मध्ये त्यांनी पॅरिसमधील विद्यापीठात अर्थशास्त्राची प्राध्यापकी सुरू केली. त्यापूर्वी १९७१ मध्ये पॅरिसमधील संशोधन केंद्रात काही काळ संशोधन केले. त्यानंतर फ्रान्समध्ये तसेच जगात अनेक मानाची पदे भूषविली तरी त्यांनी अध्यापन क्षेत्राशी कधी फारकत घेतली नाही. पूर्ण वेळ शक्य नसले तरी वेळ मिळेल तसे ते अनेक विद्यापीठांत आर्वजून व्याख्यानासाठी जाणे पसंत करतात. प्राध्यापक म्हणून नोकरी करीत असतानाच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. १९७० च्या दरम्यान ते कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांच्या चळवळीशी जोडले गेले होते व तेथे बराच काळ सक्रियही होते. १९८१ साली फ्रान्सच्या अध्यक्षपदी मितराँ यांची निवड झाल्यावर ते काही काळ सरकारच्या बाहेर होते. नंतर काही काळाने ते साोशालिस्ट पक्षाच्या जवळ आले. याच दरम्यान त्यांची फ्रान्सच्या नियोजन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. १९९१ मध्ये त्यांची उद्योग व व्यापार खात्याच्या मंत्रिपदी निवड झाली. १९९३च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर त्यांनी व्यापारविषयक कायदेशीर सल्ले देणारी ‘डी.एस.के.कन्सलटण्ट’ ही कंपनी स्थापन केली. पुढच्याच वर्षी त्यांना रेनॉल्ट या वाहन उद्योगातील कंपनीने त्यांना सल्लागार म्हणून आमंत्रित केले. १९९५ मध्ये त्यांची सारसेल्स शहराच्या महापौरपदी निवड झाली. त्याच वर्षी ते नामवंत टी.व्ही. पत्रकार अ‍ॅनी सिल्चेर यांच्याशी विवाहबद्ध झाले. याच दरम्यान त्यांची नियुक्ती अर्थमंत्रिपदी झाल्यावर त्यांनी महापौरपद सोडले. त्यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाच्या काळात आर्थिक सुधारणा राबविण्यास सुरुवात केली. सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा प्रयोग हाती घेतला. फ्रान्स टेलिकॉमची खुली समभाग विक्री त्यांच्याच काळातली. त्यांनी हाती घेतलेल्या सुधारणांमुळे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला चांगलीच तरतरी आली. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढले, तर बेकारी व सरकारचे कर्ज कमी झाले. परिणामी अर्थमंत्री म्हणून ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. फ्रान्सने युरो चलन स्वीकारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अशा प्रकारे फ्रान्सला नवी दिशा देणारा डी.एस.के.यांच्यासारखा अर्थतज्ज्ञ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर आल्याने गरीब देशांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. यंदाच्या ‘जी २०’ देशांच्या परिषदेच्या निमित्ताने या अपेक्षा त्यांनी काही प्रमाणात पूर्ण केल्या आहेत.