Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९

सासऱ्याच्या घरावर टिप्पर चढवला
दोन ठार, पाच जखमी

चंद्रपूर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

गडचांदूरमधील घटना
झोपेतच चिरडले
झोपडी जमीनदोस्त
क्षुल्लक कारणावरून सासऱ्यासोबत झालेल्या भांडणाचा काटा जावयाने रागाच्या भरात सासऱ्याच्या घरावर टिप्पर चढवला. त्याखाली आल्याने सासरा रामचंद्र सिडाम (५०) व साळी मंगला रामचंद्र सिडाम (१७) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पाच जण जबर जखमी झाले. सदर घटना गडचांदूर येथील वॉर्ड क्र.४ मध्ये रविवारी रात्री अकरा वाजता घडली.

गृहमंत्री व पोलीस महासंचालकांची पोखरीला भेट
शांततेसाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन

पुसद, ६ एप्रिल / वार्ताहर

पुसद शहरातील प्रत्येक घडामोडीवर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. त्याचबरोबर येथील सामाजिक संघटनांनीसुद्धा शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी येथे केले. पोखरी येथील घटनास्थळाला भेट देऊन परतल्यानंतर गृहमंत्री जयंत पाटील येथे उपविभागीय कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, ज्यांनी कोणी असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यामागे कोणाचा हात आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

विकासाच्या प्रयत्नांना खोडा घालू नका -प्रफुल्ल पटेल
भंडारा, ६ एप्रिल/ वार्ताहर

भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ाच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खोडा घालण्याचा प्रयत्न झाल्यास माझ्या पेक्षा जिल्ह्य़ाचेच अधिक नुकसान होईल, असा इशारा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी लांखादूर येथे बोलताना दिला. या प्रचार सभेत बोलताना आम्हीदेखील काँग्रेस संस्कृतीचेच आहोत, असे स्मरण प्रफुल्ल पटेलांनी विरोधकांना करून दिले. मागील निवडणुकीत आमच्या कामावर आणि विश्वसनीयतेवर शंका व्यक्त केली, असे आता करू नका, असे पटेल म्हणाले.

निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेण्याचे आदिवासींना आवाहन
बुलढाणा, ६ एप्रिल / प्रतिनिधी

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासीबहुल चारवन, हनवतखेड, उमापूर, रायपूर आदी गावातील आदिवासींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करताच काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी त्यांची भेट घेऊन बहिष्कार मागे घेण्यासाठी मन वळवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास २५ ते ३० हजार लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय गेल्या ३ एप्रिलला पार पडलेल्या सभेत घेतला. या निर्णयाची दखल घेऊन डॉ. राजेंद्र भास्कर शिंगणे यांनी ६ एप्रिलला दुपारी ४ वाजता चारबन येथे जाऊन आदिवासींचे प्रश्न समजून घेण्याचे ठरवले आहे.

शहर काँग्रेस कार्यकारिणीतील गळती सुरूच
अमरावती, ६ एप्रिल / प्रतिनिधी

शहर काँग्रेसच्या नवगठित कार्यकारिणीतील आणखी एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या सहा झाली आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विश्वास देशमुख यांच्याविषयी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या गटातील नाराजीचा सूर कायम असताना कार्यकारिणीतील या गळतीने डॉ. देविसिंह शेखावत यांच्या गटात अस्वस्थता पसरली आहे.
नव्या कार्यकारिणीत पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या गटातीन एकाही काँग्रेसजनाला स्थान मिळाले नाही, त्यातच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी नवगठित कार्यकारिणीतील उपाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला.

--------------------------------------------------------------------------

‘अर्थपूर्ण’ राजकारण
नितीन तोटेवार

निवडणुका म्हणजे अफाट खर्च, असे जणू समीकरणच झाले आहे. १९७० पर्यंत काही अपवादात्मक मतदारसंघ वगळता सर्वत्र जेमतेम खर्च असायचा पण, गेल्या तीन दशकात चित्र बदलले आहे. खर्चाचा आवाका वाढत वाढत अफाटपर्यंत पोहोचला! लोकसभा निवडणुकीतील उमेदवार अधिकृतरीत्या जेमतेम २५ लाख रुपये खर्च करू शकतो परंतु, ही मर्यादा वास्तवावर आधारित असल्याचे दिसत नाही. एखाद्या मतदारसंघातील सर्व मतदारांशी छापील पोस्ट कार्डद्वारे संपर्क साधतो म्हटल्यास सरासरी १५ लाख मतदारांसाठी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मैदानात राहण्यासाठी किमान दोन कोटी रुपये खर्च करावे लागतात, असे या प्रक्रियेशी संबंधितांना वाटते पण, आयोगाच्या वक्रदृष्टीतून (व्हिडिओ शुटिंग) हा खर्च सुटतो, यातच सारे कौशल्य आहे.

एसएमएस, रिंगटोनद्वारे पक्षांचा प्रचार
नागपूर, ६ एप्रिल / प्रतिनिधी

निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्वच पक्षांनी मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी मोबाईलचा खुबीने वापर चालवला आहे. ‘एसएमएस’ तसेच रिंगटोनद्वारेही प्रचाराची आगळी पद्धत राबवली जात आहे. विशेष म्हणजे निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेला मोबाईल प्रचाराचा खर्च देणे टाळता येत असल्याने आता मोबाईलचा अधिक वापर करण्यावर सर्वच पक्षांनी चांगलाच भर दिला आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता चांगलीच वाढली असल्याने बाहेर फारशी वर्दळ नसते. सकाळीच महत्त्वाची कामे उरकून घेतली जातात. गरज असेल तरच बाहेर फिरणे वा प्रवास करणे सुरू आहे. एकीकडे हे चित्र असताना, निवडणूक प्रचाराच्या पातळीवर मात्र वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात असल्याचे दिसते.

एक आगळीवेगळी निवडणूक
मनोज जोशी

हल्ली लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांची समीकरणे इतकी गुंतागुंतीची असतात, की कोण कोणाला केव्हा दगा देईल आणि सरकार पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वच निवडणुका सारख्या तोंडवळ्याच्या झालेल्या आहेत. पण एक निवडणूक तिच्या वेगळेपणामुळे सर्वाच्याच लक्षात राहिली. किंबहुना सर्वाच्याच आठवणीत राहावी अशीच ती निवडणूक होती. मी बोलतोय १९७७च्या निवडणुकीबद्दल. आज चाळिशी गाठलेल्या सर्वानाच ही निवडणूक आठवत असेल. बांगलादेश युद्ध जिंकल्याच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या १९७१च्या निवडणुकीत काँग्रेसला भरघोस बहुमत मिळाले होते.

हरिभाऊंसाठी माणिकरावांची प्रतिष्ठा पणाला
१० एप्रिलला सोनिया गांधी यांची सभा

यवतमाळ, ६ एप्रिल / वार्ताहर

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार हरिभाऊ राठोड यांचा विजय प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रतिष्ठेचा बनवला असून राठोड यांच्या प्रचारासाठी थेट सोनिया गांधी यांनाच निमंत्रित करण्यात आले आहे. १० एप्रिलला सोनिया गांधी यांची सभा यवतमाळात होणार आहे. उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे कमालीचे नाराज असलेले माजी खासदार उत्तमराव पाटील यांची नाराजी अजूनही गेली नाही. पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तेव्हा काँग्रेस उमेदवार गुलाम नबी यांचा पराभव या मतदारसंघाने अनुभवलेला आहे. १९९६ मध्ये यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसचे गुलाम नबी आझाद हे हेवीवेट उमेदवार असूनही भाजपच्या राजाभाऊ ठाकरेंकडून पराभूत झाले होते.

कुछ फरक नही पडता..
क ट्टयावर तासन्तास उभे राहून, चहाचा एक घोट घेत गप्पा मारत राहण्याची फॅशन गेल्या काही वर्षांत दिसून येत नसली तरी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मात्र शहरातील विविध भागातील कट्टयांवर सध्या निवडणुकीविषयी जास्त चर्चा होताना दिसून येते. मुळात कट्टा ही संस्कृती पुण्या-मुंबईला जास्त प्रचलित आहे. विदर्भात मात्र कट्टा म्हणजे कुठल्या तरी चौकातील पानठेल्यावर किंवा चहाच्या टपरीवर बसून चर्चा करण्याची गेले अनेक वर्षांंची परंपरा आहे. शहीद चौकातील गोपाळरावच्या पानठेल्यावर सायंकाळच्या वेळी इतवारीमधील पाच सहा व्यापारी एकत्र उभे होते.

मनोहर जोशी यांची आज सभा
अमरावती, ६ एप्रिल / प्रतिनिधी

अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या दोन सभांचे आयोजन उद्या, ७ एप्रिलला करण्यात आले आहे. चांदूर बाजार येथील गुळाची साथ येथे सायंकाळी ६ वाजता मनोहर जोशी यांची सभा होणार आहे तर, रात्री ८ वाजता अमरावतीत दसरा मैदान येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांना खासदार अनंत गुढे, आमदार जगदीश गुप्ता, संजय बंड, माजी मंत्री विनायक कोरडे, आमदार साहेबराव तट्टे, माजी आमदार अरुण अडसड, ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हा प्रमुख नाना नागमोते, दिगंबर डहाके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तुषार भारतीय, भाजपचे शहर अध्यक्ष डॉ. प्रदीप श्िंागोरे, माजी जिल्हा प्रमुख सोमेश्वर पुसदकर, शहर प्रमुख दिनेश बूब, भाजपचे किरण पातुरकर व जयंत डेहनकर हे उपस्थित राहणार आहेत.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा
चंद्रपूर, ६ एप्रिल/प्रतिनिधी

भारिप बहुजन महासंघ-रिपाइं खोब्रागडे युतीचे उमेदवार देशक खोब्रागडे यांच्या प्रचारार्थ भारिपचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची उद्या, ७ एप्रिलला जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. देशक खोब्रागडे हे पतंग चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी इतर प्रमुख उमेदवारांच्या तोडीस तोड प्रचार सुरू केला असून जाहीर सभांवर विशेष भर दिला आहे. स्थानिक नेत्यांच्या प्रचारसभांचा झंझावात सुरू असून ७ एप्रिलला दुपारी तीन वाजता सिद्धार्थ नगरातील सिद्धार्थ स्पोटिर्ंग क्लबच्या मैदानावर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची विशाल जाहीरसभा आयोजित केली आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे पक्षाचे एकमेव स्टार प्रचारक असून त्यांनी स्वत:सह महाराष्ट्रात ४८ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. प्रचारासाठी उपलब्ध असलेल्या अल्प कालावधीत या सर्व उमेदवारांचा प्रचार व्हावा म्हणून अ‍ॅड.आंबेडकर हेलिकॉप्टरने येथे येत आहेत. या सभेला मतदारांनी बहुसंख्येने हजर राहण्याचे आवाहन देशक खोब्रागडे, मधू वानखेडे, बंडू नगराळे, कुशल मेश्राम, सोहमप्रभू मुंजमकर, भारत थुलकर, दिलीप वाळके, अंकुश वाघमारे, बंडू देशकर, दिलीप कांबळे, किशोर रायपुरे, रामाजी हस्ते, वंदना चांदेकर, मीर अब्दुल, अजीज हाशमी, शीला थुलकर, सुनील खोब्रागडे, ज्योती भगत, अनिल वनकर, मदन बुरपुंडे, विद्याधर लाडे यांनी केले आहे. देशक खोब्रागडे यांच्या उमेदवारीमुळे दलित मतदार त्यांच्याकडे वळण्यात होण्याची चर्चा सुरू आहे. तसे देशक खोब्रागडे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकरांच्या सभेकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.
----------------------------------------------------------------------------

विकास कामांना गती देण्यासाठी काँग्रेसच्या विजयाचे आवाहन
गडचिरोली, ६ एप्रिल / वार्ताहर

चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघाच्या खोळंबलेल्या विकासाला चालना देण्यासाठी अनुभवी नेत्याची आवश्यकता आहे. तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मारोतराव कोवासे यांचा दीर्घ अनुभव लक्षात घेता, या भागाच्या विकासासाठी त्यांना विजयी करण्याचे आवाहन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइं युतीचे उमेदवार मारोतराव कोवासे यांच्या गडचिरोली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार होते. यावेळी उमेदवार मारोतराव कोवासे, माजी आमदार हरिराम वरखेडे, पेंटा रामा तलांडी, देवराव भांडेकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश इटनकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अरुण हरडे, डॉ. हेमंत अप्पलवार, गजानन निखारे, गो.ना. मुनघाटे, हेमंत जंबेकर, नगर परिषदेच्या शिक्षण सभापती माधुरी मडावी आदी उपस्थित होते. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, या लोकसभा मतदारसंघातील अनेक समस्या केंद्र शासनाशी निगडित आहेत. त्यात सिंचन प्रकल्प, रेल्वे, रस्ते इत्यादी समस्यांचा अंतर्भाव असून हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी अनुभवी नेत्यांची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

सत्ता जनसेवेसाठीच असते -पटले
भंडारा, ६ एप्रिल/ वार्ताहर

कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करून जनतेची दिशाभूल करायची आणि निवडून आल्यावर सत्तेचा उपभोग घ्यायचा हीच सत्तारूढ नेत्याची नीती आहे. मात्र, जनतेने मिळवून दिलेली सत्ता जनसेवेसाठीच असते, असे मत खासदार शिशुपाल पटले यांनी व्यक्त केले. पवनी येथील लक्ष्मीरमा सभागृहात भाजप कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी धनंजय मोहकर, हरीश मोरे, डॉ. उल्हास फडके, मोहन सूरकर, अनिल मेंढे, संदीप नंदरधने आदी उपस्थित होते.
खासदार पटले पुढे म्हणाले पाच वर्षे सरकारच्या तिजोरीतून लुटलेला पैसा निवडणुकीत खर्च करून वाममार्गाने निवडून येण्याचे दिवस आता संपले आहेत. योग्य जनप्रतिनिधी अशाप्रकारे मत मागण्याऐवजी जनतेच्या दरबारात जाऊन हक्काने मत मागतो. मात्र, काही नेत्यांत ही कुवत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान मोहाडी येथे भाजपच्या या सभेत भाजप उमेदवार शिशुपाल पटले यांनी पक्षात शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फळी आहे. साधन नाही म्हणून भाजपचा कार्यकर्ता घरी बसणार नाही, असे सांगितले. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नाना पटोले यांनी लाखांदूर येथे बोलताना मी ‘आम आदमी’चा प्रतिनिधी आहे. भूमिपुत्र आहे, असे सांगितले.

मेळघाटातील रोजगार हमीची कामे बंद पाडण्याचा प्रयत्न
धारणी, ६ एप्रिल / वार्ताहर

मेळघाटात सुरू असलेली रोजगाराची कामे बंद पाडण्यात येत असल्यामुळे आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. आचारसंहितेपूर्वीच आदिवासी मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासनाने आदिवासी भागात अनेक रोजगाराची कामे सुरू केली आहेत. ही कामे विविध भागात सुरू आहेत. परंतु, रोजगाराचीही कामे रोखण्याचा प्रयत्न होत असल्याने आदिवासी मजुरांचे स्थलांतर सुरूच आहे. युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी रविवारी बुलुम गव्हाण परिसरात सुरू असलेली अनेक कामे बंद पाडल्याचा आरोप होत आहे. काँग्रेस-रिपब्लिकन आघाडीचा उमेदवार डॉ. राजेन्द्र गवई यांच्या प्रचारासाठी गेलेल्या काही कार्यकर्त्यांनी आदिवासी मजुरांना हाकलून दिले, तर शिवसेना कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन कामे सुरू करण्याचे सांगून राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न केला.

मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीवरून पालिकेतील सत्तारूढ गटात मतभेद
कळमेश्वर, ६ एप्रिल / वार्ताहर

नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवरून सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील मतभेद विकोपाला गेले आहेत. कळमेश्वर नगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. शासनाने येथे प्रथमच महिला मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नगराध्यक्षांनी २७ फेब्रुवारी २००९ ला विशेष सभा घेऊन मुख्याधिकारी विकास कामात वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असल्याचा ठपका ठेवून त्यांची बदली करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला. यावर सत्तारूढ गटातील काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी आक्षेप घेतला व राज्य सरकारकडे वेगळे निवेदन पाठवून मुख्याधिकाऱ्यांची पाठराखण केली. नगर विकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव व जिल्हाधिकारी नागपूर यांनाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.नवीन मुख्याधिकारी यांनी पालिकेतील भोंगळ कारभारावर (प्रतिबंध लावल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर काँग्रेसचे शिक्षण सभापती सिद्धार्थ बागडे, पुंडलिक कामठी, कुंदा बोरकर, पालिका उपाध्यक्ष ललिता भागवत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जातीय सलोखा कायम ठेवण्याचे भावना गवळींचे आवाहन
यवतमाळ, ६ एप्रिल / वार्ताहर

पुसद येथे रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान, घडलेल्या अप्रिय घटनेमागे काँग्रेसचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रतिपादन यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील सेनेचे उमेदवार खासदार भावना गवळी यांनी केले. खासदार भावना गवळींनी पुसदला तातडीने भेट दिली. घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून या घटनेचा निषेध करीत असल्याचे त्या म्हणाल्या. मुस्लिम काँग्रेसपासून दूर गेल्याने काँग्रेसमध्ये पराभवाचे भय पसरले आहे. पुसद येथील वसंत नगर भागात भेट देण्यासाठी गेल्या असता त्यांना प्रशासनाने मनाई केली. पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान, पुरेसा बंदोबस्त ठेवला नव्हता याबद्दलही गवळी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून जनतेने जातीय सलोखा ठेवावा, असे आवाहन केले.

पाणीटंचाईमुळे अकोल्यात नागरिक त्रस्त
अकोला, ६ एप्रिल/प्रतिनिधी

पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या जुन्या शहरातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. माजी नगराध्यक्ष पांडुरंग कवडे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. जुन्या शहरातील वॉर्ड क्रमांक ३२ मधील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त झाले आहेत. वारंवार निवेदने देऊनही महापालिका प्रशासनाने येथील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पुरेसे लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेली चार वर्ष या भागातील नागरिक पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत. अखेर त्रस्त होऊन लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. माजी नगराध्यक्ष पांडुरंग कवडे यांनी बहिष्कारासाठी नागरिकांच्या स्वाक्षरी अभियानास सुरुवात केली आहे. परिसरतील तीन हजाराहून अधिक नागरिकांनी निवडणुकीवरील बहिष्काराच्या या निर्णयाच्या बाजूने स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. गणेश मंदिर, काळा मारुती, विठ्ठल मंदिर, ईस्लामपुरा या भागातील नागरिकांमध्ये पाणीटंचाईमुळे तीव्र असंतोष पसरला आहे.

भंडारा शहरात पाणीटंचाई
भंडारा, ६ एप्रिल / वार्ताहर

शहराला एकूण ४४ लाख लीटर पाण्याची गरज असता, नगरपालिका फक्त ११ लाख लीटर पाण्याचा पुरवठा करीत असल्याने येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरातील काही भागात मात्र २४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. जलशुद्धीकरण केंद्र ते जलकुंभापर्यंत जाणाऱ्या जलवाहिनीवरील बहुतेक नळ २४ तास सुरू असतात. अनेक ठिकाणी खेच पंपाच्या साह्य़ाने पाणी ओढले जात असल्यामुळे परिसरातील नळांना नगण्य पाणी येते. नागरिकांनी अनेकदा अर्ज-विनंत्या करून सकाळी ७ ते ८ या नळाच्या वेळेस गावातील वीजपुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली, परंतु या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. पाणी नाही, तर पाण्याचा कर का द्यावा? असा नागरिकांचा प्रश्न आहे.