Leading International Marathi News Daily
मंगळवार, ७ एप्रिल २००९
विविध

अतिरेकी केवळ पैशासाठीच स्फोट घडवितात
पाकिस्तानची प्रथमच कबुली

इस्लामाबाद, ६ एप्रिल/पीटीआय

पाकिस्तानातील अतिरेकी केवळ पैशासाठीच स्वत:च्या देशात आत्मघाती बॉम्बस्फोट घडवितात आणि देशवासीयांचा बळी घेतात अशी कबुली प्रथमच पाकिस्तानने दिली. यासंदर्भात पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक यांनी सांगितले की, या घातपाती कारवाया भाडोत्री हल्लेखोरांकरवी पार पाडल्या जातात. मलिक पुढे म्हणाले की, नगण्य रकमेच्या मोबदल्यात भाडोत्री हल्लेखोरांकडून आत्मघाती बॉम्बस्फोटासारख्या घातपाती कारवाया काही लोक घडवून आणतात.

सौम्या विश्वनाथनच्या खूनप्रकरणी फरारी आरोपी अजय सेठीला अटक
नवी दिल्ली, ६ एप्रिल/ पीटीआय

एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या वृत्तविभागातील निर्मात्या सौम्या विश्वनाथन आणि आयटी क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी जिगीषा घोष यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आज एका वाहनचोराला हरयाणातील फरिदाबाद जिल्हय़ातून अटक केली. गेल्या २० वर्षांत त्याने एक हजारावर वाहनांची चोरी केली आहे. अजय सेठी असे त्याचे नाव असून, सौम्या विश्वनाथन यांचा खून करण्यासाठी सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्याने गुंड रवि कपूरची टोळी वापरत असलेली मोटार चोरून आणली होती.

७० हजार नागरिकांच्या सुटकेसाठी आता श्रीलंका लष्कराची मोहीम
कोलंबो, ६ एप्रिल/पीटीआय

तामिळी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या अखेरच्या बालेकिल्ल्यावरही श्रीलंका लष्कराने कब्जा मिळविल्यानंतर आता या बंडखोरांनी मल्लाईतत्तिवू या छोटय़ा टापूत आश्रय घेतला आहे. या टापूत अडकलेल्या ७० हजार नागरिकांची सुटका करण्यासाठी श्रीलंका लष्कर आता मोहीम हाती घेईल. यासंदर्भात श्रीलंकेच्या संरक्षण खात्याने म्हटले आहे की, एलटीटीईचे प्राबल्य असलेल्या बहुतांश भागावर श्रीलंका लष्कराने कब्जा केला आहे.

पाकिस्तान आगामी सहा महिन्यांत उद्ध्वस्त होईल; अमेरिकी तज्ज्ञाचा अहवाल
न्यूयॉर्क, ६ एप्रिल/पी.टी.आय.

पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये मर्यादेपेक्षा वाढ झाली असल्याने हा देश आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत उद्ध्वस्त होऊ शकतो असा अहवाल गनिमी कावा या युध्दशैलीचे तज्ज्ञ आणि अमेरिकी शासनाचे सल्लागार डेव्हिड किलकुलेन यांनी दिला आहे. अमेरिकेचे मिलिटरी कमांडर जनरल डेव्हिड पेट्रियस यांचे किलकुलेन हे सल्लागार होते व पेट्रियस यांनीही अमेरिकी काँग्रेससमोर मागील आठवडय़ात हेच विचार बोलून दाखविले.

‘शिंडलर्स लिस्ट’ सापडली ऑस्ट्रेलियाच्या ग्रंथालयात
सिडनी, ६ एप्रिल/पी.टी.आय.

‘ऑस्कर शिंडलर’ या व्यावसायिकाने हिटलरच्या निर्घृण नरसंहारातून वाचविलेल्या ८०१ ‘ज्यू’ नागरिकांच्या नावाची यादी सिडनेमधील एका ग्रंथालयातील पुस्तकात सापडली. या यादीने एका जगप्रसिद्ध कादंबरीला जन्माला घातले असून, त्यावर तयार करण्यात आलेल्या ‘शिंडलर्स लिस्ट’ चित्रपटाने अनेक ऑस्कर पुरस्कार पटकावले आहेत.

‘वरुणला रोलरखाली चिरडले असते’
नवी दिल्ली, ६ एप्रिल/वृत्तसंस्था

मी जर देशाचा गृहमंत्री असतो तर मुस्लिमांविषयी द्वेषमूलक वक्तव्ये केल्याबद्दल वरुण गांधी याला रोलरखाली चिरडलेच असते, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आज काढले.
वरुणवरील कारवाईचे श्रेय घेण्यासाठी बसप नेत्या मायावती आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू असतानाच लालूप्रसाद यादव यांनी ‘जर-तर’ची भाषा करीत आपलेही घोडे पुढे दामटले आहे.
दरम्यान, सध्या इहाट येथील तुरुंगात असलेले भाजपचे लोकसभेचे उमेदवार वरुण गांधी यांनी काल आपल्या आवाजाचा नमुना देण्यास पोलिसांना नकार दिला. आपले वकील हजर नाहीत त्यांच्या उपस्थितीतच आपण ध्वनीमुद्रणासाठी आवाज देऊ, असे ते म्हणाले.

इराणपासूनच खरा धोका; क्षेपणास्त्र संरक्षण कवच उभारणारच-ओबामा
प्राग, ६ एप्रिल/पीटीआय

रशियाचा विरोध असला तरीही मध्य युरोपमध्ये क्षेपणास्त्र संरक्षण कवच उभारण्याच्या निर्णयावर अमेरिका ठाम आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. इराणपासून खरा धोका आहे असेही ते पुढे म्हणाले. ओबामा यांनी सांगितले की, इराणचा धोका नष्ट झाल्यानंतरच पोलंड व झेकोस्लाव्हाकियामध्ये रडार यंत्रणा उभारण्याची व संरक्षणासाठी १० क्षेपणास्त्रे तैनात ठेवण्याची योजना रद्द करता येईल.‘अण्वस्त्र प्रसारबंदी’ या विषयावर प्राग येथे रविवारी केलेल्या भाषणादरम्यान ओबामा यांनी सांगितले की, इराण राबवित असलेला अणुकार्यक्रम तसेच क्षेपणास्त्रनिर्मिती प्रकल्पामुळे केवळ अमेरिकेलाच नव्हे तर आमच्या सहकारी देशांना तसेच इराण शेजारील देशांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. इराणच्या या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या देशात क्षेपणास्त्र यंत्रणा बसविण्याची तयारी दाखविल्याबद्दल पोलंड व झेकोस्लाव्हाकियाचे ओबामा यांनी आपल्या भाषणात कौतुक केले.ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अणुकार्यक्रम राबवीत असल्याचे समर्थन इराणने वारंवार केले आहे. इराणमुळे निर्माण झालेल्या धोक्यापासून वाचण्यासाठी क्षेपणास्त्र संरक्षण कवच उभारण्याची योजना अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आली. या योजनेला रशियाचा विरोध आहे.

निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी चिदम्बरम यांनी मुदत वाढवून घेतली
नवी दिल्ली, ६ एप्रिल/खास प्रतिनिधी

निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटिसचे उत्तर देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी मंगळवारपर्यंत मुदत वाढवून मागितली आहे. चिदम्बरम यांची विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. मार्चअखेर राजस्थानच्या दौऱ्यात निवडणुकीशी संबंधित सुरक्षेचा आढावा घेताना पाकिस्तानातील विस्थापित हिंदूूंना भारताचे नागरिकत्व देण्याची तसेच मतदानाचा अधिकार देण्याची व थार एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांना अतिरिक्त सुविधा देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल चिदम्बरम यांच्या विरोधात भाजपतर्फे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे एन. गोपालस्वामी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय निवडणूक आयोगाने चिदम्बरम यांना नोटीस बजावून सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते.

पाँडिचेरीचे नायब राज्यपाल गोविंदसिंह गुर्जर यांचे निधन
नवी दिल्ली, ६ एप्रिल/पी.टी.आय.

पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल गोविंदसिंह गुर्जर यांचे आज येथील अपोलो रुग्णालयात निधन झाले. गुर्जर हे हृदयरोग आणि किडनीच्या विकाराने काही दिवसांपासून आजारी होते व अपोलो रुग्णालयाचे प्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नरेश त्रेहन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र सोमवारी सकाळी सव्वा पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली. राजस्थानच्या बालकानानगल गावी त्यांचा १९३२ साली जन्म झाला होता. १९८१ ते ८५ या दरम्यान राजस्थानात ते मंत्री होते. जुलै २००८ मध्ये त्यांची पाँडिचेरीचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

आवाजाचा नमुना देण्यास वरुण गांधींचा नकार
इटाह, ६ एप्रिल/पीटीआय

मुस्लिमविरोधी वक्तव्य केल्याच्या आरोपावरून सध्या येथील तुरुंगात अटकेत असलेले भाजपचे लोकसभेचे उमेदवार वरुण गांधी यांनी स्वत:च्या आवाजाचा नमुना देण्यास पोलिसांना नकार दिला.
पिलभितच्या पोलिसांनी काल, रविवारी तुरुंगात जाऊन वरुणची भेट घेतली आणि मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांच्या आवाजाचा नमुना आणि निवेदन देण्याची मागणी केली; परंतु आपले वकील अनुपस्थित असल्याचे कारण सांगून वरुणने त्यांची मागणी फेटाळून लावली. आपले वकील उपस्थित असतील तेव्हाच आपण निवेदन देऊ आणि आवाजाचे ध्वनिमुद्रण करण्यास परवानगी देऊ, असेही त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले. वरुणच्या इच्छेविरुद्ध त्याचे निवेदन नोंदवून घेऊ नये, असेही आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. वरुण गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रसारण टीव्ही चॅनेलवरून झाल्यानंतर वरुण गांधी यांनी ते साफ फेटाळून लावून आपण हे शब्दच वापरले नव्हते व आपला हा आवाज नाही, असे म्हटले आहे.

इंडोनेशियात लष्करी विमान कोसळून २४ ठार
बांडुंग, ६ एप्रिल/पी.टी.आय.

खराब हवामानामुळे या शहरात लष्कराचे फोकर-२७ जातीचे एक विमान अपघातग्रस्त होऊन त्यातून प्रवास करणारे एकूण २४जण मृत्युमुखी पडले. सहा कर्मचारी, एक प्रशिक्षक व १७ विशेष प्रशिक्षणार्थी असे २४ जण विमानात होते. या विमानाच्या अपघाताचे नक्की कारण सांगण्यास लष्करी प्रवक्त्याने असमर्थता दर्शविली. अपघातानंतर मृतांना हलविण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका आणण्यात आल्या.

इटलीमध्ये शक्तिशाली भूकंपात ९२ ठार
ला- क्विला, ६ एप्रिल/एएफपी

मध्य इटलीमध्ये आज झालेल्या शक्तिशाली भूकंपामध्ये ९२ जण मृत्युमुखी पडले. मध्य इटलीच्या अबरुझ्झू प्रांतात आज पहाटे हा भूकंप झाला.‘रिश्टर स्केल’वर या भूकंपाची तीव्रता ६.३ इतकी नोंदविली गेली. यात हजारो इमारती आणि घरे कोसळली असल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर रोमपासून १०० किलोमीटरजवळ असणाऱ्या ला- क्विला या भागामध्ये आज पहाटे साडेतीन वाजता भूकंप झाला. भूकंपाच्या हादऱ्यांमुळे ६० हजारांहून अधिक नागरिक रस्त्यांवरून सैरावैरा पळू लागले. अनेक इमारती या भूकंपामुळे संपूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे किमान १० हजार नागरिकांना बेघर व्हावे लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, पंतप्रधान सिल्व्हिओ बर्लूस्कोनी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून, जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच लहान मुलांसह एकूण ५० जण भूकंपात गाडले गेल्यामुळे ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वरुणला राजकीय आणि कायदेशीर पाठिंबा देण्याची भाजपची ग्वाही
इटाह, ६ एप्रिल/ पीटीआय

वरुण गांधी यांच्यावर सध्या होत असलेल्या टीकाटिप्पणीला न जुमानता, त्यांना राजकीय आणि कायदेशीर पाठिंबा देण्याची नि:संदिग्ध ग्वाही आज भारतीय जनता पक्षाने दिली.पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज इटाहला येऊन वरुण गांधींची तुरुंगात भेट घेतली. मुस्लिमविरोधी वक्तव्य केल्याच्या आरोपावरून सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. वरुणची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, वरुणच्या बाबतीत राजकारण केले जात असून त्याची छळवणूक सुरू असल्यामुळेच आम्ही त्याला राजकीय आणि कायदेशीर पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष वरुण प्रकरणातून राजकीय फायदा उठवू पाहात आहे का, असे विचारताच त्यांनी ताडकन उत्तर दिले, की वरुण भाजपचा उमेदवार आहे हे विसरू नका. वरुणप्रकरणी आपले लालकृष्ण अडवाणी यांच्याही कोणतेच मतभेद नाहीत. वरुणच्या होत असलेल्या छळवणुकीला भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे. संपूर्ण देशाला हे माहीत आहे, असेही राजनाथ सिंह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

बगदादमध्ये ‘कारबॉम्बस्फोटां’च्या मालिकेत १८ ठार
बगदाद, ६ एप्रिल/पी.टी.आय.

बगदादमध्ये रहदारीच्या विविध जागांवर दहशतवाद्यांकडून आज करण्यात आलेल्या ‘कारबॉम्बस्फोटां’च्या मालिकेत १८ ठार, तर ५८ नागरिक जखमी झाले आहेत.
शिया पंथीयांचे वर्चस्व असणाऱ्या साद्र शहरामधील बाजार परिसरात स्फोटकांनी लादलेल्या वाहनातून पहिला स्फोट घडविण्यात आला. यात १० ठार, तर २८ जण जखमी झाल्याचे, अंतर्गत मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. दुसरा स्फोट अलावी जिल्ह्यात घडविण्यात आला. त्यात ४ जण मृत्युमूखी पडले, तर १५ जण गंभीररीत्या जखमी झाले. मृत आणि जखमींमध्ये बहुतांश वेठबिगार असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. दक्षिणेकडील न्यू बगदाद प्रांतात असलेल्या दूतावासाजवळ अंतर्गत मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लक्ष्य करून ‘कारबॉम्बस्फोट’ घडविण्यात आला. यात तो अधिकारी बचावला, मात्र पोलिसासह दोघे ठार, तर सहा जखमी झाले. इशान्य बगदादमधील हुसेनिया भागातही अशाच प्रकारच्या स्फोटात २ जण ठार झाले. इराक आणि अमेरिकेच्या संयुक्त फौजांनी २००७ पासून दहशतवादी संघटना ‘अल् काईदा’च्या विरोधात मोहीम उघडल्यानंतर या भागामध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.