Leading International Marathi News Daily
बुधवार, ८ एप्रिल २००९
व्यापार-उद्योग

‘निटको’च्या टाइल्सची नवीन ‘नॅचरॉक’ श्रेणी
व्यापार प्रतिनिधी: निटको लिमिटेडने भिंत व जमिनीवरील फरशांमध्ये नाविन्यता व गुणवत्ता आणण्याच्या आपल्या परंपरेत सातत्य म्हणून ‘नॅचरॉक’ ही टाइल्सचा तिसरा प्रकार बाजारात दाखल केला आहे. जगातील सर्वाधिक गुळगुळीत असलेल्या या ‘नॅचरॉक’ टाइल्स प्रथमच भारतीय बाजारात प्रस्तुत होत असल्याचा कंपनीचे मुख्य प्रचालन अधिकारी कल्याण पॉल यांनी दावा केला आहे. चार वर्षांपूर्वी निटकोने सर्वप्रथम व्हिट्रिफाइड टाइल्स बाजारात आणून या क्षेत्रात अशीच उत्सुकता निर्माण केली होती, त्याचाच ‘नॅचरॉक’ हा पुढचा अध्याय ठरेल, असे त्यांनी सांगितले. या एकापरीने मॅट टाइल्स असतानाही ग्लॉसी फिनिशचा अनुभव ग्राहकांना देतील. जमिनीला नैसर्गिक रूपडे प्रदान करताना, गुळगुळीत या फरशा निसरडय़ा नसतील आणि सामान्यपणे साफसफाईस सोयीच्या ठरतील, अशी नॅचरॉकची वैशिष्टय़े त्यांनी सांगितली. या टाइल्सच्या किमतीही ग्राहकांसाठी परवडण्याजोग्या ठरतील, अशी त्यांनी हमी दिली.

टाटा नॅनो ग्राहकांसाठी ‘टाटा स्काय’ची
२० टक्के सवलतीची घोषणा
व्यापार प्रतिनिधी:
टाटा स्काय लि.ने जनतेची कार, टाटा नॅनोचे बुकिंग करणाऱ्यांसाठी विशेष योजनेची घोषणा केली आहे. या खास योजनेद्वारे आता ग्राहकांना टाटा स्कायच्या अधिकृत विक्रेत्यांकडे, टाटा नॅनो बुक केल्याचा पुरावा सादर करताच टाटा स्कायच्या नवीन जोडणीवर विशेष २० टक्के सवलत (रु. ३०० सवलत) मिळेल. टाटा स्काय लि.चे प्रमुख मार्केटिंग ऑफिसर विक्रम मेहरा म्हणाले की, नॅनोचे आगमन ही सध्याची सगळ्यांत मोठी ऐतिहासिक घटना आहे. नॅनोमुळे भारतीय वाहन उद्योग व लोकांचे राहणीमान यांचा चेहरामोहराच बदलून जाण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. त्याचप्रमाणे टाटा स्कायनेदेखील भारतीयांच्या टीव्ही बघण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणला आहे. आता एका योजनेद्वारे ग्राहकांना नॅनो आणि टाटा स्काय या दोन्हींचा आनंद लुटता येईल, असे त्यांनी सांगितले.

‘फेडएक्स’ची भारतात ‘इंटरनॅशनल इकॉनॉमी’ सेवा
व्यापार प्रतिनिधी:
अमेरिकास्थित जगातील सर्वात मोठी एक्स्प्रेस वाहतूक कंपनी फेडएक्स कॉर्पची उपकंपनी फेडएक्स एक्स्प्रेसने भारतातील आपल्या सेवेत विस्तार करताना, आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेली ‘इंटरनॅशनल इकॉनॉमी’ ही नवीन सेवा दाखल केली आहे. फेडएक्सच्या इंटरनॅशनल इकॉनॉमी या सेवेत अत्यंत किफायतशीर दरात, कस्टम्स-क्लीअर्ड व सुरक्षितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील घरपोच सेवा दोन दिवसांच्या आत पुरविली जाते. वेळेबाबत आत्यंतिक दक्ष असलेल्या ग्राहकांसाठी मात्र ‘इंटरनॅशनल प्रायॉरिटी’ असा अन्य सेवा प्रकार फेडएक्सकडे आहे. मात्र नवी सेवाही आंतरराष्ट्रीय शिपमेंट किफायतशीरपणे व अधिक खात्रीलायक बनवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम ठरेल, असा कंपनीचा दावा आहे. या सेवेअंतर्गत अमेरिका, युरोप, आखाती देश आणि आशियाई देशांमध्ये कमाल चार ते सहा दिवसांत इच्छित ठिकाणी कमाल ८६ किलो वजनापर्यंतचे पॅकेजेसची डिलिव्हरी केली जाते आणि ग्राहक आपल्या पॅकेजेसचे या दरम्यान होणाऱ्या संक्रमणाचा ऑनलाइन पद्धतीने मागही घेऊ शकेल.